Pune ZP Election Sarkarnama
विश्लेषण

BJP defeat : वारं फिरलंच नाही! महापालिकेत ऐतिहासिक विजय मिळविलेल्या भाजपला ZP निवडणुकीत दारूण पराभव

Pune Zilla Parishad Election Result : एकूण ७३ जागांपैकी अजितदादांच्या राष्ट्रवादीला जवळपास ५० हून अधिक जागा मिळण्याची शक्यता आहे. मागील निवडणुकीत दादांच्या पक्षाला ४४ जागा मिळाल्या होत्या.

Rajanand More

Ajit Pawar NCP victory : राज्यातील १२ जिल्हा परिषदांच्या निवडणुकीत सर्वाधिक जागांवर विजय मिळवत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. नगरपरिषद, नगरपंचायत आणि महापालिका निवडणुकीतही भाजपने नंबर वन मिळविला होता. पुणे महापालिकेत भाजपने ऐतिहासिक विजय मिळवत सलग दुसऱ्यांदा सत्ता काबीज केली. त्यानंतर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भाजप करिष्मा दाखविणार का, याबाबत उत्सुकता होती.

महापालिकेतील विजयानंतर भाजप नेत्यांनी जिल्हा परिषदेसाठी जय्यत तयारी केली होती. पुणे जिल्हा परिषदेत मागील अनेक वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रसचे वर्चस्व राहिले आहे. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर ही पहिलीच निवडणूक होती. या निवडणुकीत अजित पवार आणि शरद पवार यांचे पक्ष एकत्र आले होते. महापालिकेप्रमाणेच झेडपीतच भाजप विरूध्द राष्ट्रवादी असा थेट सामना होता.

अजित पवार यांनी पुन्हा सत्ता काबीज करण्यासासाठी कंबर कसली होती. मात्र, प्रचारादरम्यान अजितदादांचे विमान अपघातात निधन झाले आणि पुणे जिल्ह्यासह महाराष्ट्राला मोठा धक्का बसला. त्यामुळे जिल्ह्यात भाजप आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी प्रचाराता फारसा रस घेतल्याचे दिसून आले नाही. पुणे हा दादांचा गड होता, तो कायम राहणार, असाच अंदाज वर्तविला जात होता. निकालानंतर त्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

एकूण ७३ जागांपैकी अजितदादांच्या राष्ट्रवादीला जवळपास ५० हून अधिक जागा मिळण्याची शक्यता आहे. मागील निवडणुकीत दादांच्या पक्षाला ४४ जागा मिळाल्या होत्या. यावेळी त्यामध्ये वाढ झाली आहे. राष्ट्रवादीने पुन्हा एकहाती सत्ता काबीज करत महापालिकेतील निवडणुकीचा जणू वचपा काढला आहे. भाजपला जेमतेम १० जागा मिळण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची वाताहात झाली असून चारच जागा पदरात पडल्या आहेत.

महापालिकेप्रमाणे जिल्ह्यात सत्ता मिळविण्यासाठी भाजपने माजी आमदार संजय जगताप आणि संग्राम थोपटे यांना पक्षात घेतले होते. त्याचप्रमाणे राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकरही भाजपमध्ये आले होते. इंदापूरसह अन्य भागातील काही पदाधिकारीही भाजपच्या गळाला लागले होते. पण अजितदादांच्या पक्षाने आपणच पुणे जिल्ह्यात ‘दादा’ असल्याचे दाखवून दिले आहे.

मागील निवडणुकीत भाजपला केवळ सात जागा मिळाल्या होत्या. त्यामध्ये आता केवळ तीन जागांची भर पडण्याची शक्यता आहे. सर्वाधिक फटका शिवसेना आणि काँग्रेसला बसला आहे. शिवसेनेच्या जवळपास १० जागा कमी झाल्या असून काँग्रेसला भोपळाही फोडता आलेला नाही. या जागा राष्ट्रवादीच्या पदरात पडल्या आहेत. अजितदादांच्या निधनानंतर राष्ट्रवादीच्या उमेदवारांसाठी काही प्रमाणात सहानुभूती मिळाल्याचेही निकालात आढळून आले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT