Loksabha Election 2024 : देशात गांधी परिवार हा राजकारणात राजघरण्यातील परिवार अशीच काय ती ओळख आहे. पण, याच राजघराण्यातील राजपुत्राने एक नव्हे दोन दोन भारत जोडो यात्रा काढत देशवासीयांची मने जिंकले. एकीकडे मोदी यांची एकाधिकारशाही आहे, तर दुसरीकडे गांधी यांनी रस्त्यावर उतरत स्वतःला ग्राउंड कनेक्ट केले. यातून देशातील लोकांच्या समस्या तर राहुल गांधी यांना ज्ञात झाल्याच त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात स्थानिक काँग्रेस, राज्यस्तरीय पक्षांसोबत त्यांची मैत्री वाढली. भविष्यात काँग्रेसला राज्यराज्यांत मित्र शोधताना त्याचा निश्चित फायदा होईल आणि मदतच होईल. राजकारणात कधी कोण मदतीला धावून जाईल हे सांगता येत नाही. तशा मैत्रीची परिस्थिती राहुल गांधी यांनी निर्माण केली. या दोन्ही भारत जोडो यात्रेचे मोठे यश हे राहुल गांधी यांची पप्पू म्हणून होणारी हेटाळणी थांबविणारी ठरली आहे. त्याचबरोबर काँग्रेसच्या राजकीय विरोधकांना राहुल गांधी यांची पप्पू ही इमेज जास्त काळ पुढे नेता येणार नाही, इतकी प्रगल्भता या यात्रेतून राहुल गांधी यांनी दाखविली. त्याचा निश्चितच काँग्रेस आणि राहुल गांधी यांना फायदा होईल.
काँग्रेसचा कॅडर संपत चालला ही ओरड गेल्या अनेक वर्षांपासून आहे. काँग्रेस सेवादल न राहता केवळ पक्षाच्या नावाने मेवा खाणारा मेवादल आता काँग्रेसमध्ये राहिला का, याचाही तपास यानिमित्त राहुल गांधी यांनी केला. काँग्रेसमध्ये व्यापक सुधारणा भविष्यात राहुल गांधी यांच्या नेतृत्वात संघटनेत नक्कीच दिसेल. काँग्रेसची शतकांची परंपरा आणि राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा ही आधुनिक भारतीय राजकारणातील मोठी घडामोड आहे. कन्याकुमारी ते कश्मीर ही भारत जोडो यात्रा काँग्रेस नेते राहुल गांधी आणि त्यांच्या सहकार्यांनी पायी काढली. पहिल्याच यात्रेतून राहुल गांधी यांनी काँग्रेस नेत्यांना जमिनीशी जुळण्याचे अप्रत्यक्षपणे सांगितले. जो ग्राउंडवर्क करणार नाही, त्याला राजकारणात स्थान राहणार नाही, असाच काय तो धडा राहुल गांधी यांनी काँग्रेस नेत्यांना दिला. त्यात तेलंगणा येथे रेवंथ रेड्डी यांनी सत्ता आणत ते सिद्ध केले. रेवंथ रेड्डी यांनीदेखील एक मोठी यात्रा तेलंगणात काढली होती. हात से हात जोडो यात्रा, त्याच बरोबर पहिल्या भारत जोडो यात्रेचा फायदा काँग्रेसला तेलंगणा आणि कर्नाटकमध्ये झाला. त्यामुळेच या दोन राज्यांत काँग्रेसची सत्ता आली. राजस्थानमध्ये पक्षांतर्गत गेहलोत आणि पायलट यांच्यात मैत्री न झाल्याने काँग्रेचा पराभव झाला. मध्य प्रदेशात काँग्रेस हरली. पहिली भारत जोडो यात्रा कन्याकुमारी येथून सुरू झाल्यानंतर हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसची सत्ता आली होती.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
भारत जोडो न्याय यात्रा लोकसभा निवडणुकीच्या अगदी तोंडावर तब्बल 66 दिवस 15 राज्यांतून गेली. यात्रेत राहुल गांधी यांनी 6700 किमीचा प्रवास केला. तेही विशेष म्हणजे हिंदी भाषिक प्रांतातून ही यात्रा गेली. या यात्रेला बिहारमध्ये व्यापक यश आले. याच यात्रेत बिहारमध्ये पटनाच्या 'जनविश्वास महारॅली'चा उल्लेख तेजस्वी यादव यांनी त्यांच्या भाषणात मुंबईत केला. ती 'जनविश्वास महारॅली' हिंदी भाषिक राज्यात गेमचेंजर ठरू शकते. लोकसभेच्या सर्वाधिक जागा असलेल्या उत्तर प्रदेशात काँग्रेसने यात्रेवर फोकस करत समाजवादी पार्टीला सर्वाधिक जागा दान केल्या. यातून समाजवादी पार्टी मोठा मित्र पक्ष हा काँग्रेससोबत जोडला गेला. इतकेच नाही तर महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आणि वंचित बहुजन आघाडी हे एकाच मंचावर आणण्यात यात्रेचे यशच अधोरेखित होते. प्रकाश आंबेडकर हे राष्ट्रीय राजकारणातील मोठे नाव आहे. ते पहिल्यांदाच काँग्रेसच्या मंचावर गेल्याचे चित्र काँग्रेससाठी देश पातळीवर मोठा आधार देणारे आहे.
या भारत जोडो न्याय यात्रेत न्यायाच्या हक्काची लढाई ही थिम होती. त्यातून मोठ्या प्रमाणात तरुणांना जोडले गेले. बेरोजगारी ही देशाची समस्या आहे. ती या यात्रेतून समोर आणल्या गेली आणि मांडल्यादेखील गेली. अग्निवीर या समस्येवर येणाऱ्या कुठल्याही सरकारला तोडगा काढावा लागेल. त्याचबरोबर तरुणांच्या हाताला रोजगार यासाठी काँग्रेसने व्यापक अभियान आणि निर्णयाची घोषणा केली. देशातील तरुणांना काँग्रेसकडे ओढण्याचा यातून मोठा प्रयत्न झाला. इतकेच नाही तर मणिपूर येथून यात्रा सुरू करत मणिपूर येथील महिला अत्याचाराचा मुद्दा काँग्रेसने राष्ट्रीय स्तरावर नेला. या मुद्द्याकडे भाजपने जरी दुर्लक्ष केले असले तरी महिलांची सुरक्षा हा विषय राहुल गांधी यांनी अधोरेखित केला, त्यात त्यांना निश्चित यश आले. काँग्रेसने देशभरातील शेतकऱ्यांच्या मूळ समस्येला हात घातला आहे. शेतीमालाला मिळणाऱ्या किमान आधारभूत किंमत (MSP) गॅरंटीची मागणी या भारत जोडो यात्रेतून पुढे आली. या विषयावर उत्तरेतील राज्यातील मोठ्या आंदोलनास काँग्रेसने समर्थन दिले.
भारत जोडो न्याय यात्रेतून सर्वात मोठा फायदा हा राजकीय तरुणांना झाला. या यात्रेतून राहुल गांधी यांचे तरुण नेतृत्व आणि क्षमता आपसूक देशाला दिसली. ज्येष्ठ राजकीय नेत्यांच्या मांदियाळीत तरुण राजकारणी देशाला दिशा दाखवू शकतात, हे तेजस्वी यादव यांच्या आक्रमक भाषण आणि पटनाच्या महारॅलीच्या यशातून समोर आले. राहुल गांधी यांच्या खांद्याला खांदा लावून अखिलेश यादव हे तरुण राजकारणी हिंदी बेल्टमध्ये स्वतःच्या क्षमतांच्या आधारावर काम करताना दिसतात. त्यांनी काँग्रेस या बलाढ्य पक्षाला जागावाटपात मागे ठेवले. वयाने ज्येष्ठत्व प्राप्त राजकारणी भारतासारख्या तरुण देशात जनतेने अद्याप टाळणे सुरू केले नाही. जेव्हा तशी परिस्थिती निर्माण होईल तेव्हा राजकारणातील तरुणांचा पर्याय निश्चित लोकांच्या डोळ्यांसमोर राहील.
पहिली कन्याकुमारी ते काश्मीर भारत जोडो यात्रा आणि दुसरी भारत जोडो न्याय यात्रा या लोकसभा निवडणूक 2024 ला डोळ्यांसमोर ठेवून सुरू केलेल्या राजकीय यात्रा होत्या. काँग्रेस या यात्रांना राजकीय यात्रा मानत नसले तरी त्या राजकीय यात्राच होत्या. देशात सुरू झालेल्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकांमध्ये भारत जोडो यात्रा ही काही टक्के मतदानाचा प्रभाव टाकू शकली, तर देशाच्या राजकारणाचे चित्र हे वेगळे असू शकते. त्यात भाजप विरोधकांना नुकताच इलेक्ट्राेल बाँडचा मुद्दा मिळाला आहे. भाजपला मिळालेल्या कोट्यवधींच्या देणग्या हा लोकसभा निवडणुकीतील महत्त्वाचा आणि कळीचा मुद्दा असेल. तो सामान्य मतदारांपर्यंत पोहाेचविण्यात भाजपविरोधी पक्ष किती यशस्वी होतात. यावरच लोकसभा निवडणुकीचे चित्र देशात स्पष्ट होईल. या भारत जोडो यात्रेतील टॅगलाइन असलेल्या 'नफरत के बाजार मे मोहब्बत की दूकान' याचादेखील विचार भाजपला करावा लागेल. कारण धार्मिक कट्टरता आणि द्वेषाचे राजकारण धर्मनिरपेक्ष भारतात जास्त दिवस टिकू शकणार नाही. देशातील मतदार तरुण आहे. सूज्ञ आहे. देशातील मतदारांच्या बोटांनी ईव्हीएमचे दबले जाणारे बटन उमेदवारांचा विजय निश्चित करेल. मतदारांच्या बोटांची शक्ती हेच कुठल्याही राजकीय यात्रांचे यश, फलित मानावे लागेल. राहुल गांधी यांनी महात्मा गांधी, प्रभू श्रीराम आणि गौतम बुद्धांचा 'नफरत की बाजार मे मोहब्बत' चा संदेश किती यशस्वी होईल यासाठी 4 जूनची वाट सर्वांना पाहावी लागणार आहे.
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.