Mahayuti Politics : दावोसला गेलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर रविवारी नामुष्की ओढवली. काही तासांपूर्वी झालेल्या पालकमंत्री पदाच्या नियुक्त्यांना स्थगिती देण्याचा निर्णय त्यांना घ्यावा लागला. शिवसेना म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दबावापुढे फडणवीस झुकल्याची टीका आता विरोधक करू लागले आहेत. सध्याची राजकीय स्थिती पाहता त्यात तथ्यही आहे.
रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्र्यांच्या नियुक्त्यांवरून महायुतीमध्ये चांगलीच धुसफुस सुरू आहे. रायगडमध्ये आदिती तटकरे आणि नाशिकमध्ये गिरीश महाजन यांच्या नियुक्त्यांना शिवसेनेच्या नेत्यांनी जोरदार विरोध केला होता. रायगडमध्ये भरत गोगावले आणि नाशिकमध्ये दादा भुसे इच्छुक होते. पण या दोघांकडे कोणत्याही जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आली नाही.
मंत्रिमंडळाच्या शपथविधीवरूनही आधीच अनेक नेत्यांनी उघ़डपणे नाराजी व्यक्त केली होती. आता दोन जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती दिल्याने महायुती सरकारमध्ये सर्व काही आलबेल नसल्याचे पुन्हा स्पष्ट झाले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दरे गावी गेले आहेत. ते नाराज असल्याच्या चर्चेने पुन्हा जोर धरला आहे. फडणवीस यांच्यावर दबाव वाढवण्याची ही रणनीती असल्याची चर्चा आहे. त्यात त्यांना यशही आले आहे.
शपथविधीवेळी एकनाथ शिंदे यांनी सुरूवातीला शपथ न घेण्याचा पवित्रा घेतला होता. काही महत्वाच्या खात्यांसाठी ते आग्रही होते, अशी चर्चा त्यावेळी रंगली होती. आता नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रिपदावरून कलगीतुरा रंगला आहे. सध्या स्थगिती दिली असली तरी या जिल्ह्यांचे पालकमंत्रिपद कोणत्या मंत्र्यांकडे जाणार, हे आताच सांगता येणार नाही. मात्र, स्थगितीचा निर्णय घ्यावा लागणे, हेच फडणवीसांसाठी आव्हान असल्याची चर्चा आता रंगली आहे.
महायुती सरकारमधील भांडणे यानिमित्ताने चव्हाट्यावर आली आहेत. त्यामध्ये भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांची चढाओढ दिसते. गिरीश महाजन हे फडणवीसांचे अत्यंत विश्वासू नेते, संकटमोचक मानले जातात. पण त्यांच्याच नियुक्तीला स्थगिती द्यावी लागणे, हा फडणवीसांसाठी धक्काच आहे. कदाचित त्यांचे यामागेही काही डावपेच असतील, पण सध्यातरी त्यांना एक पाऊल मागे घ्यावे लागेल, हा संदेश राज्यभर पोहचला आहे.
दुसरीकडे आदिती तटकरे यांची नियुक्तीला स्थगिती म्हणजे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांना आव्हान देण्यासारखे आहे. आधीच धनंजय मुंडे यांच्यासारख्या नेत्याला एकाही जिल्ह्याचे पालकमंत्रिपद देण्यात आलेले नाही. छगन भुजबळ मंत्रिपदापासून वंचित आहेत. त्यात तटकरे यांनाही आता झटका बसला आहे. त्यामुळे शिंदे यांनी एकाचवेळी फडणवीसांसह अजितदादांनाही एकप्रकारे आव्हान दिल्याचे दिसते. यातून मार्ग काढताना फडणवीसांच्या नेतृत्वाचा कस लागणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.