raj thackeray amol mitkari ajit pawar.jpg sarkarnama
विश्लेषण

Amol Mitkari Vs MNS : विचारांची लढाई दगड-धोंड्यांवर आली, महाराष्ट्राची राजकीय संस्कृती लयाला गेली

अय्यूब कादरी

महाराष्ट्रातील समंजसपणाची, सौहार्दाची, एकमेकांचा आदर करण्याची राजकीय संस्कृती लयास जात आहे, हे गेल्या पाच वर्षांत अनेकवेळा समोर आले आहे. राज ठाकरे यांनी अजितदादा पवार यांच्यावर केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांच्या कारवर अकोल्यात मनसे कार्यकर्त्यांकडून झालेला हल्ला असहनशीलतेचे भयावह चित्र आहे. बिहारमध्ये जंगलराज आहे, असे मागे म्हटले जायचे. महाराष्ट्रातही गेल्या काही वर्षांपासून असे वेदनादायी चित्र दिसू लागले आहे.

महाराष्ट्राची राजकीय संस्कृती कशी होती, यासाठी मागे वळून पाहावे लागेल. राजकारणात विरोध, टीका-टिपण्णी, आरोप-प्रत्यारोप त्या काळी नव्हते, असे नाही. मात्र, त्याला एक मर्यादा होती भाषेची, व्यवहाराची. एक काळ होता, महाराष्ट्रातील सर्वपक्षीय नेत्यांकडे पाहिले की अभिमान वाटायचा. यशंवतराव चव्हाण, वसंतराव नाईक, वसंतदादा पाटील, उद्धवरावदादा पाटील, शरद पवार, प्रमोद महाजन, विलासराव देशमुख, गोपीनाथ मुंडे.... ही यादी आणखी वाढू शकते. या नेत्यांनी शह-काटशहाचे राजकारण केले, मात्र मर्यादा सोडली नाही. आज काय परिस्थिती आहे, राजकीय नेत्यांबद्दल समाजात काय बोलले जात आहे? याचा कानोसा घेतल्यास लोकांच्या तोंडून त्यांच्या उद्धाराची भाषा ऐकायला मिळते.

टीका, आरोप-प्रत्यारोपांच्या पुढे जाऊन मिटकरी यांच्या वाहनावर हल्ला करण्यात आला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे ( Raj Thackeray ) यांनी अजितदादा पवार यांच्यावर टीका केली. त्याला अमोल मिटकरी यांनी त्याच भाषेच प्रत्युत्तर दिले. मनसेच्या कार्यकर्त्यांना त्यांच्या साहेबांवरील टीका झोंबली आणि त्यांनी मिटकरी यांच्या वाहनावर हल्ला केला. टीका सहन होत नसेल तर आपणही ती करायची नाही, हे मनसे कार्यकर्त्यांना कळायला हवे. प्रकरण थांबायला तयार नाही. मिटकरी यांनीही आता हिशेब चुकता करणार, असा इशारा मनसेला दिला आहे.

लोकसभेच्या निवडणुकीत राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता. महायुतीत अजितदादा पवार यांच्या पक्षाचाही समावेश आहे. आता विधानसभेची निवडणूक स्वबळावर लढण्याची घोषणा राज ठाकरेंनी केली आहे. दोन महिन्यांतच राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा आपली भूमिका बदलली आहे. अजितदादा पवार सत्तेत आहेत. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हेही सत्तेत आहेत. असे असतानाही राज ठाकरे यांच्या टीकेच्या केंद्रस्थानी अजितदादा पवारच असतात. अजितदादांवर करतात तशी विखारी, खोचक टीका राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदे किंवा देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली आहे का, याबाबत शंकाच आहे. महाराष्ट्रात राजकारण करायचे असेल तर, पवार कुटुंबीयांवर टीका करणे क्रमप्राप्त झाले आहे, हा भाग वेगळा.

लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला आणि महायुतीच्या अपयशाची चर्चा सुरू झाली. अजितदादा पवार ( Ajit Pawar ) यांना सोबत घेतल्यामुळे भाजपची 'ब्रँड व्हॅल्यू' कमी झाली, असा लेख राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुखपत्रात प्रसिद्ध आला. अजितदादा महायुतीत नको, अशी मागणी भाजपच्या दुसऱ्या, तिसऱ्या फळीतील नेत्यांनी जाहीर कार्यक्रमांमध्ये केली. हे सर्व सुरू असताना पहिल्या फळीतील नेते अजितदादांची पाठराखण करत राहिले. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अजितदादांची साथ सडली तर काय होईल, असा संभ्रम भाजपच्या नेत्यांमध्ये असावा. त्यामुळे अजितदादांना कायम अस्थिर ठेवायचे, असा तर प्रयत्न महायुतीत सुरू नाही ना, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.

अजितदादा परत शरद पवार यांच्याकडे येतील का, अशी चर्चाही सुरू झाली आहे. बारामती लोकसभा मतदारसंघातून सुप्रियाताई सुळे यांच्या विरोधात अजितदादांच्या सौभाग्यवती सुनेत्राताई पवार या रिंगणात होत्या. शरद पवार यांना बारामतीच्या बाहेर पडता येऊ नये, यासाठी भाजपने खेळलेली ही चाल होती, मात्र ती भाजप आणि अजितदादांच्या अंगलट आली. निवडणुकीच्या काळात अजितदादांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार, पुतणे युगेंद्र पवार हे सुप्रियाताई यांच्यासोबत होते. विधानसभा निवडणुकीसाठी बारामती मतदारसंघात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून युगेंद्र पवार यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. एका अर्थाने, अजितदादा यांच्या कुटुंबातही भाजपच्या खेळीमुळे राजकीय कलह निर्माण झाला आहे.

पुण्यातील पूरस्थितीवरून राज ठाकरे यांनी अजितदादा पवार यांच्यावर आक्षेपार्ह टीका केली. अजितदादांनी शरद पवार यांची साथ सोडली, त्यावेळीही राज ठाकरे यांनी दोघे काका-पुतणे आतून एकच असल्याची टीका केली होती. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांच्यामुळे राज्यात जातीपातीचे राजकारण सुरू झाले, असा राज ठाकरे यांचा आरोप जुनाच आहे. राज ठाकरे हे दोन धर्मांत फूट पाडण्याचा, गैरसमज निर्माण करण्याचा, ध्रुवीकरणाचा सतत प्रयत्न करत आहेत. शरद पवार यांच्यावर टीका करत असताना आपण काय करतो, याचा विसर राज ठाकरे यांना पडलेला असतो.

राज ठाकरे यांनी जशी अजितदादांवर टीका केली, त्याच भाषेत अमोल मिटकरी यांनी तो हल्ला राज ठाकरे यांच्यावर परतवून लावला. अजितदादा यांनी काही वर्षांपूर्वी धरणाशी संबंधित एक वक्तव्य केले होते. याबाबत त्यांनी माफीही मागितली होती, मात्र ते वक्तव्य त्यांना चिकटून राहील, याची काळजी त्यांची विरोधकांनी घेतली आहे. पुण्यातील पूरस्थितीवरून राज ठाकरे यांनी त्याचा संदर्भ देत टीका केली. त्याला प्रत्युत्तर देताना अमोल मिटकरी यांनी राज ठाकरे यांच्या नेहमीच बदलणाऱ्या भूमिकांवरून त्यांच्यासाठी शेलकी विशेषणे त्यांचे नाव न घेता वापरली.

एकमेकांवर झालेली टीका दोन्ही पक्षांच्या नेत्यांना, कार्यकर्त्यांना झोंबणारी होती. मात्र मनसेच्या कार्यकर्त्यांनी संयम सोडत मिटकरी यांच्या वाहनावर हल्ला करून खळखट्याक संस्कृती अद्याप कायम असल्याचा संदेश दिला. मिटकरी यांनीही हिशेब चुकता करणार असल्याचा, इशारा दिला आहे. अशा पद्धतीने महाराष्ट्राच्या समृद्ध राजकीय संस्कृतीचा ऱ्हास सर्वांच्या डोळ्यांदेखत होत आहे.

( Edited By : Akshay Sabale )

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT