Anil Deshmukh Vs Devendra Fadnavis : भाजप नेत्यांचा अतिउत्साह अन् 'परसेप्शन'च्या लढाईत फडणवीसांचा पाय खोलात...

Mahavikas Aaghadi Vs Mahayuti News : शंभर कोटी वसुलीच्या आरोपाच्या जुन्याच प्रकरणाला पुन्हा फोडणी मिळाली आहे. या प्रकरणात देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत गौप्यस्फोट करणाऱ्या अनिल देशमुखांना पुन्हा कारागृहात पाठवा, अशी मागणी भाजपच्या काही अतिउत्साही नेत्यांनी केली आणि परसेप्शनच्या लढाईत अनिल देशमुख, त्यांचे पुत्र सलील देशमुख आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी भाजपवर मात केली.
Anil Deshmukh, Devendra Fadnavis
Anil Deshmukh, Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Political News : महाविकास आघाडीचे सरकार पाडून महायुतीचे सरकार आल्यानंतर उपमुख्यमंत्रिपदावर समाधान मानावे लागलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्या अडचणी लोकसभा निवडणुकीत महाऱाष्ट्रात मिळालेल्या अपयशानंतर मोठ्या प्रमाणात वाढल्या. त्यात भर म्हणून आता माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी फडणवीस यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे.

शरद पवार, तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनीच 100 कोटी वसुलीचे आदेश दिले होते, असे लिहून द्या, तुमची सुटका होईल, असा निरोप देऊन फडणवीस यांनी समित कदम यांना आपल्याकडे पाठवले होते, असा गौप्यस्फोट देशमुख यांनी केला आहे. तो फडणवीस यांच्या अंगलट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

महाविकास आघाडी सरकारमधील गृहमंत्री अनिल देशमुख यांनी 100 कोटी रुपये वसूल करून आपल्याला द्यावेत, असा आदेश दिला होता, असा आरोप मुंबईचे तत्कालीन पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी केला होता. त्यानंतर अनिल देशमुख यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यांना 13 महिने कारागृहात राहावे लागले होते.

माजी गृहमंत्री देशमुख यांच्याविरोधात पुरावे नसल्याचे सांगत न्यायालयाने त्यांना जामीन दिला होता. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हे प्रकरण पुन्हा तापले आहे. अनिल देशमुख यांच्या गौप्यस्फोटामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या भूमिकेबाबंत संशय निर्माण झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघाले आहे.

Anil Deshmukh, Devendra Fadnavis
MNS Kishor Shinde : 'आम्ही महायुतीचा भाग नाही आहोत, राजसाहेबांनी...' ; मनसे नेत्याने स्पष्टच सांगितलं!

शिवसेना-भाजपची युती 2019 मध्ये तुटली आणि महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. अगदी पहिल्या दिवसापासून ते सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न भाजपकडून सुरू होता, कारण सर्वाधिक आमदार असूनही भाजपला विरोधी पक्षात बसावे लागले होते. सरकार अस्थिर करण्याचा भाग म्हणूनच तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले होते, असा दावा त्यावेळी महाविकास आघाडी सरकारकडून करण्यात आला होता.

तत्कालीन पोलिस आय़ुक्तांनी त्यावेळचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून देशमुख यांनी 100 कोटी रुपये वसूल करण्याचे आदेश दिले आहेत, असा आरोप केल्याने त्याचे गांभीर्य वाढले होते. या आरोपांची पुष्टी करणारे ठोस पुरावे यंत्रणांना देता आले नाहीत, असा निष्कर्ष नोंदवत मुंबई उच्च न्यायालयाने अनिल देशमुख यांना जामीन मंजूर केला होता. न्यायमूर्ती चांदीवाल आयोगानेही देशमुखांना क्लीन चिट दिली होती. देशमुखांना जामीन मिळेपर्यंत महाविकास आघाडीचे सरकार कोसळले होते.

शंभर कोटी वसुलीचा आरोप झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याकडे काही लोक पाठवले होते. त्यांच्याजवळ असलेल्या चिठ्ठीत धक्कादायक मजकूर होता. शंभर कोटी वसुलीचा आदेश शरद पवार, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी दिला होता, असे शपथपत्रावर लिहून दिल्यास तुमच्यावर ईडी, सीबीआयची कारवाई होणार नाही, असा देवेंद्र फडणवीस यांचा निरोप घेऊन ते लोक आले होते, असा दावा अनिल देशमुख यांनी केला आहे.

तसे त्यांनी आधीही सांगितले होते. आता मात्र चिठ्ठी घेऊन आलेल्या एका व्यक्तीचे नावही त्यांनी जाहीर केले आहे. समित कदम असे त्यांचे नाव असून, ते जनसुराज्य पक्षाशी संबंधित आहेत. समित कदम हे जनसुराज्य पक्षात असले तरी फडणवीस यांच्याशी त्यांची जवळीक आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

Anil Deshmukh, Devendra Fadnavis
Eknath Shinde News : अजितदादांच्या जागांवर शिंदे शिवसेनेचा डोळा ? 'या'आठ ठिकाणी नेमले निरीक्षक, भाजपच्या जागा सोडल्या

अनिल देशमुखांनी गौप्यस्फोट केल्यानंतर हे प्रकरण हाताळताना भाजपच्या काही अतिउत्साही नेत्यांकडून गफलत झाली आहे. परिणय फुके यांच्यासह भाजपच्या अन्य काही नेत्यांनी अनिल देशमुख यांचा जामीन रद्द करून त्यांना कारागृहात पाठवण्याची मागणी केली आहे. मुळात अशी मागणी करता येते का, असा प्रश्न आहे. शिवाय, तपासयंत्रणांकडे पुरावे नसल्याचे सांगत उच्च न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला होता.

देशमुख यांचे पुत्र, जिल्हा परिषदेचे सदस्य सलील देशमुख यांनीही अचूक टायमिंग साधत या मुद्द्यावरून भाजपवर प्रहार केला आहे. भाजपच्या धमक्यांना आम्ही घाबरत नाही, जामीन मेरिटवर मिळाला आहे, असे प्रत्युत्तर त्यांनी दिले आहे. परसेप्शनच्या लढाईत अनिल देशमुख, सलील देशमुख आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी भाजपवर मात केली आहे.

अनिल देशमुख यांनी केलेल्या आरोपांचा समित कदम यांनी इन्कार केला आहे. अनिल देशमुख यांनीच आपल्याला बोलावून घेऊन कारवाई होऊ नये, यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मध्यस्थी करण्याची विनंती केली होती, असा दावा त्यांनी केला आहे.

देशमुखांना जामीन देताना न्यायालयाने नोंदवलेल्या निष्कर्षामुळे समित कदमांच्या विधानावर लोकांचा विश्वास बसेल का, असा प्रश्न आहे. अनिल देशमुख यांना पुन्हा कारागृहात पाठवा, अशी मागणी फुके यांनी केल्यामुळे जामीन कशाच्या आधारे मंजूर करण्यात आला होता, हे पुन्हा एकदा जाहीर करण्याची संधी सलील देशमुख यांना मिळाली.

Anil Deshmukh, Devendra Fadnavis
Raju Shetti News : एकापेक्षा एक मातब्बर नेत्यांनी 'स्वाभिमानी' सोडली ; शेट्टींपुढे आता शेतकरी चळवळ टिकवण्याचं आव्हान

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीही संधी साधत भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला घेरले आहे. समित कदम यांचे फडणवीस आणि आरएसएसशी संबंध आहोत, असा दावा राऊत यांनी केला आहे. अजितदादा पवार, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अनिल परब यांच्यावर आम्ही सांगतोय ते आरोप करा, असा फडणवीस यांचा निरोप घेऊन समित कदम हे अनिल देशमुख यांच्याकडे गेले होते, असे राऊत यांनी म्हटले आहे.

अजितदादा, परब आणि आदित्य ठाकरे यांच्यावर विविध प्रकारचे आरोप भाजपने केले होते. ते सर्व खोटे होते, असे परसेप्शन तयार करण्यात राऊत यांनाही बऱ्यापेकी यश आले आहे. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस फोडल्याचे खापर भाजपच्या डोक्यावर फुटले आहे. त्याचा परिणाम लोकसभा निवडणुकीच्या निकालात दिसून आला आहे. देशमुखांच्या या ताज्या प्रकरणामुळे फडणवीस आणि भाजपची कोंडी झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

Anil Deshmukh, Devendra Fadnavis
Sandip Gawai News : उमरेडवरुन टफ फाईट; दोन पारवेंच्या लढाईत संदीप गवईंनी घेतली उडी

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com