MNS Controversy : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे काही दिवसांपासून पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. मराठी भाषेचा मुद्दा त्यांनी पुन्हा हातात घेतला आहे. परप्रांतीयांना विरोधाच्या मुद्द्यावरून ते मागेही चर्चेत आले होते. याच मुद्द्यावरून उत्तर भारतातील काही लोकांना मनसेच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली होती.
राष्ट्रीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष, भाजपचे माजी खासदार बृजभूषण शरण सिंह यांनी राज ठाकरे यांना आव्हान देत त्यांच्या मुद्द्यातील हवा काढून घेतली होती. बृजभूषण शरण सिंह पुन्हा एकदा सक्रिय झाले आहेत. त्यांच्यापाठोपाठ बिहारमधील एका खासदाराने मनसेची मान्यता रद्द करण्याची मागणी संसदेत केली आहे.
गेल्या काही महिन्यांपासून राज्यात राजकीय गोंधळाची परिस्थिती आहे. महाराष्ट्रात असे वातावरण यापूर्वी कधीही नव्हते, असे जाणकार सांगत आहेत. महापालिकांसह अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका व्हायच्या आहेत. या पार्श्वभूमीवर मनसेने पुन्हा एकदा मराठी भाषेचा मुद्दा हाती घेतला आहे.
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी मनसे महायुतीसोबत लढणार की स्वतंत्र लढणार, हे अद्याप निश्चित झालेले नाही. गेल्या काही वर्षांत मनसेने सातत्याने बदललेल्या भूमिका पाहिल्या तर आता काय होणार, यााबत निश्चित असे काही सांगता येणार नाही. अशा परिस्थितीत मनसेला चर्चेत आणण्याची रणनीती तर आखली गेली नाही ना, असेही जाणकारांना वाटत आहे.
अयोध्येत प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची गेल्यावर्षी प्रतिष्ठापणा झाली. त्यावेळीही बृजभूषण यांनी राज ठाकरे यांच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतला होता. उत्तर भारतीयांची माफी मागितल्याशिवाय राज ठाकरे यांना रामलल्लाचे दर्शन घेऊ देणार नाही, असे त्यांनी जाहीर केले होते. त्यानंतर लोकसभेच्या निवडणुकीत राज ठाकरे यांनी भाजपला बिनशर्त पाठिंबा दिला.
मनसेचा एकही उमेदवार रिंगणात न उतरवता त्यांनी महायुतीच्या काही उमेदवारांसाठी प्रचारसभा घेतल्या. त्यामुळे आता बृजभूषण आपली शस्त्रे म्यान करतील, असे वाटले होते. विधानसभा निवडणुकीत मनसेने स्वबळावर उमेदवार उभे केले होते. त्यामागील रणनीतीचीही चर्चा झाली. काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी कुंभमेळ्यातील पाण्याबाबत एक विधान केले होते.
त्याला भाजपकडून (BJP) जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले. गंगेचे पाणी अशुद्ध आहे, मी ते पिणार नाही, आशयाचे ते विधान होते. टीका झाल्यानंतरही त्यांनी या विधानाची पुनरावृत्ती केली. त्यानंतर बृजभूषण यांनी पुन्हा इशारा दिला आहे, हा योगायोग असावा की परस्परसंबंध असावा, असाही प्रश्न महाराष्ट्राला पडला आहे.
मुंबईत इंग्रजीत बोलल्यामुळे दोन महिलांना मारहाण झाल्याचा प्रकार ताजाच आहे. मनसेच्या भूमिकेमुळेच असा प्रसंग उद्भवला, असे म्हणण्यास वाव आहे. मराठी भाषेचा आग्रह असावा, मात्र त्यासाठी महिलांना मारहाणीचे समर्थन केले जाऊ शकत नाही. हा मुद्दा संसदेत गेला आहे. बिहारमधील खगरियाचे लोकजनशक्ती पक्षाचे खासदार राजेश वर्मा यांनी मनसेची मान्यता रद्द करण्याची मागणी केली आहे.
उदरनिर्वाहासाठी महाराष्ट्रात आलेल्या उत्तर भारतीयांना मारहाण केल्याप्रकरणी मनसेवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. उत्तर भारतीय विकास सेनेचे प्रमुख सुनील शुक्ला यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून मनसेची मान्यता रद्द करण्याची मागणी केली होती. शुक्ला यांनी या प्रकरणाला हिंदू-मुस्लिम असा रंग दिला आहे. मनसेचे कार्यकर्ते उत्तर भारतीय हिंदी भाषिक मुस्लिमांना मारहाण करत नाहीत, त्यांच्याकडे वकृदृष्टी टाकत नाहीत, असे विधान शुक्ला यांनी केली आहे.
गजवा- ए- हिंदचाही त्यांनी उल्लेख केला आहे. उत्तर भारतीयांना किंवा कोणालाही भाषेच्या मुद्द्यावरून मारहाणीचे समर्थन केले जाऊ शकत नाही, मात्र मारहाण करताना मनसेचे लोक मुस्लिमांना बाजूला काढून हिंदूंना मारहाण करत असतील का? शुक्ला यांचे हे विधान तर्काला तिलांजली देणारे तर आहेच, शिवाय राज ठाकरे यांचा 'मराठी बेस' कमकुमवत करण्याच्याही प्रयत्नाचा भाग आहे.
विधानसभा निवडणुकीत मनसेचा एकही अधिक उमेदवार निवडून आला नाही. त्यामुळे राज ठाकरे हे पुन्हा मूळ मुद्द्यावर आले असावेत. महाराष्ट्रात सध्या विरोधक कमकुवत झाले आहेत. अशा परिस्थितीत मनसेला संधी आहे, असे त्यांना वाटत असावे. हे खरेही आहे, पण त्यासाठी लोकांच्या जीवनमरणाच्या मुद्द्यांवर काम करावे लागणार आहे. महायुतीचे प्रचंड बहुमताचे सरकार स्थापन झाले आहे, मात्र सरकारला अद्यापही लय सापडलेली नाही.
अशा परिस्थितीत राज ठाकरे लोकांचे खरे प्रश्न सोडून भावनिक प्रश्नांवर अधिक काम करत आहेत. निवडणुकीत त्याचा फायदा होईल का, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. मूळ मुद्द्यांवरून लोकांचे लक्ष लक्ष विचलित व्हावे, असा प्रयत्न कोणतीही सत्ताधारी व्यवस्था करत असते. महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यांपासून असे अनेक प्रसंग लोकांनी पाहिले आहेत.
निवडणुकीत दिलेली काही महत्वाची आश्वासने महायुती सरकारला पूर्ण करता आलेली नाहीत. या सरकारमधील अनेक मंत्री बेताल विधाने करत आहेत. यावरून लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी अनेक मुद्दे आले आणि गेले. मनसे आणि राज ठाकरे यांच्या माध्यमातून पुन्हा असाच खेळ तर सुरू झाला नाही ना, अशी शंका घेण्यास वाव आहे. एकंदर काय तर, सध्या महाराष्ट्रात राजकीय पातळीवर गोंधळ, गोंधळ आणि गोंधळच दिसत आहे.
२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.