
Bihar Political News : सिंघम अधिकारी म्हणून नावलौकिक मिळवलेले महाराष्ट्राचे सुपुत्र शिवदीप लांडे यांनी बिहारच्या राजकारणात उडी घेतली आहे. जवळपास १८ वर्षे IPS अधिकारी राहिलेल्या लांडे यांच्या या नव्या इनिंगवरून आता तर्कवितर्क लढवले जाऊ लागले आहेत. बिहारच्या राजकारणात आधीच मातब्बर नेत्यांचे पक्ष चाचपडत असताना त्यांनी कुणाच्या बळावर नवा पक्ष काढला, याबाबत चर्चांना उधाण आले आहे.
शिवदीप लांडे हे मुळचे अकोल्याचे आहोत. तिथेच त्यांचे शालेय शिक्षणही झाले. तर शिवसेनेचे आमदार विजय शिवतारे यांचे ते जावई आहेत. शिवतारे यांची कन्या ममता आणि शिवदीप यांचा 2014 मध्ये विवाह झाला आहे. ममता या डॉक्टर असून या दोघांना एक मुलगीही आहे. माजी मंत्री सासरे असूनही लांडे यांनी बिहारमध्ये राजकारणात नशीब आजमवण्याचा निर्णय घेतला आहे.
मागील वर्षीच शिवदीप लांडे यांनी स्वेच्छानिवृत्तीचा निर्णय घेतला. त्यामुळे महाराष्ट्रात ते निवडणूक लढवणार का, अशा चर्चा सुरू झाल्या होत्या. यावर्षी जानेवारी महिन्यांत त्यांचा राजीनामा स्वीकारण्यात आल्यानंतर पुन्हा त्यांच्या राजकीय एन्ट्रीची चर्चा सुरू झाली अन् त्यांनी मंगळवारी हिंद सेना या नव्या पक्षाची घोषणा केली.
महाराष्ट्रात राजकीय बळ मिळण्याची शक्यता अधिक असताना लांडे यांनी बिहारचे मैदान निवडण्यामागे अनेक कारणे आहेत. लांडे हे २००६ मध्ये आयपीएस बनले. त्यावेळी त्यांनी बिहार केडर मिळवले होते. जवळपास १८ वर्षे त्यांनी बिहारमध्ये विविध जिल्ह्यांत महत्वाची कामगिरी बजावली आहे. बिहारची राजधानी पाटणासह अररिया, पूर्णिया या जिल्ह्यांचे अधिक्षक म्हणून त्यांनी काम केले आहे.
राज्यपालांच्या सुरक्षेची जबाबदारीही लांडे यांच्या खांद्यावर काहीकाळ होती. या कालावधीत प्रामुख्याने युवकांसाठी लांडे यांचे काम प्रेरणादायी ठरले. त्यांचा गुन्हेगारांवरील दरारा, झटपट कारवाई अशा कारणांनी ते युवकांमध्ये लोकप्रिय आहेत. त्यामुळे सिंघम अधिकारी म्हणून त्यांची ओळख बनली. स्वेच्छानिवृत्ती घेतल्यानंतर ती ओळख कायम आहे.
बिहारमधील युवकांसह इतर घटकांमध्ये असलेली लोकप्रियता हेच लांडे यांच्या बिहारमधील राजकारणात उतरण्यामागचे कारण सांगितले जात आहे. तसेच संकेतही त्यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिले. युवकांना रोजगार आणि स्थलांतर याबाबत त्यांनी भाष्य केले होते. काही महिन्यांवर आलेल्या विधानसभा निवडणुकीत राज्यातील सर्व २४३ मतदारसंघात उमेदवार उतरवणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले आहे.
लांडे यांची बिहारमधील वाटचाल तेवढी सोपी नाही. काही महिन्यांपूर्वीच प्रशांत किशोर यांनी राजकीय पक्ष काढत जोमाने तयारी सुरू केली आहे. राज्यभरात पक्षाच्या नियुक्त्या झाल्या असून संघटनात्मक बांधणीही करण्यात आली आहे. पोटनिवडणुकीतही त्यांच्या पक्षाने नशीब आजमावले. मात्र, त्यांना अपेक्षित यश मिळाले नाही. प्रशांत किशोर यांनीही बेरोजगारी आणि स्थलांतराचा मुद्दा हाती घेतला आहे.
बिहारमध्ये संयुक्त जनता दल, भाजप, राष्ट्रीय जनता दल, काँग्रेस यांसह काही प्रादेशिक पक्षांची ताकद आहे. त्यांच्यावर प्रशांत किशोर यांनी आव्हान उभे केल्याची चर्चा होती. आता त्यात शिवदीप लांडे यांची भर पडली आहे. पण ते मातब्बर पक्ष, नेत्यांना कसे भिडणार, त्यांना कुणाचे पाठबळ मिळणार, कोणत्या पक्षासोबत युती करणार, आदी प्रश्नांची उत्तरे पुढील काही दिवसांतच मिळतील.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.