MNS News: विधानसभा निवडणुकीसाठी पोषक वातावरण होतं. तशी तयारीही करण्यात आली. स्वत: मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनीही ही निवडणूक तितकीच सिरीयसली घेत 288 पैकी 128 जागांवर उमेदवारही दिले. राज ठाकरेंनी (Raj Thackeray) आपला पुत्र अमित ठाकरेलाही मैदानात उतरवलं.
राज ठाकरेंनी निवडणुकीच्या घोषणेआधी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला. बैठका, मेळावे घेत उमेदवार फायनल केले. ही सुरुवात यशात परावर्तित होईल असं वाटलं होतंं. पण प्रचाराला पुरेसा वेळ मिळूनही राज ठाकरे आणि त्यांच्या मनसेला पुन्हा एकदा निराशाजनक पराभवाला सामोरे जावे लागले. 2014 आणि 2019 ला एक आमदार निवडून आलेल्या मनसेच्या खात्यात या निवडणुकीत तर भोपळाच जमा झाला.
मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविषयीचा तो अंदाज पुन्हा एकदा खरा ठरला. त्यांच्या सभांना दिसणारी तुडुंब गर्दी मतात परिवर्तित करण्यात त्यांना पुन्हा एकदा अपयश आले. राज ठाकरेंच्या सभांना मिळणारा प्रतिसाद आणि त्यांनी महायुतीबाबत दाखवलेला सॉफ्ट कॉर्नर कुठेतरी मनसेसाठी आशेचा किरण ठरेल आणि राज ठाकरे पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणात जोरदार कमबॅक करतील अशी आशा मनसेसह त्यांच्या समर्थकांना होती. त्यांना अमित ठाकरेंच्या विजयासह कमीत कमी 5 तरी जागा मिळतील असा अंदाज वर्तवला जात होता.पण तसं काही झालंच नाही.
मनसेचे एकमेव आमदार असलेल्या राजू पाटील यांचाही कल्याण ग्रामीण मतदारसंघातून पराभव झाला.एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या राजेश मोरे यांनी 66 हजार 396 मतांनी राजू पाटलांना पराभवाची धूळ चारली.ठाण्यात अविनाश जाधवांना पराभवाला सामोरे जावे लागले.वरळीत संदीप देशपांडेही पराभूत झाले. त्यांचे एकापाठोपाठ एक शिलेदार कोसळले आणि मनसेचं इंजिन ट्रॅकवर परतलंच नाही.
खरंतर महायुतीच्या त्सुनामीसमोर महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षांची दाणादाण उडाली.तिथे मनसेच्या पराभवाचं काय असंही काहीजणांचा सूर नक्की असणार आहे.पण राज ठाकरेंसाठी ही विधानसभा निवडणूक एक गोल्डन चान्स होता.पण मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी गमावला.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत दिल्लीत झालेल्या खलबतानंतर राज ठाकरेंनी आपण लोकसभेला नरेंद्र मोदींसाठी महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला.एव्हाना त्यांनी युतीच्या काही उमेदवारांसाठी जाहीर सभाही घेतल्या.आणि एकंदरीत भाजप,शिवसेना या पक्षाच्या प्रमुख नेत्यांशी वाढती जवळीक यामुळे ते महायुतीशी जुळवून घेतील अशी आशा मनसेच्या नेते,पदाधिकारी, कार्यकर्ते यांनाही होती.पण तसं काही झालंच नाही.
राज ठाकरेंनी आपल्या स्वभावाला मुरड न घालता, राजकीय लवचिकता न दाखवता थेट मनसे विधानसभा निवडणुकीत स्वबळावर लढणार असल्याची घोषणा करुन टाकली.खरंतर विधानसभा निवडणुकीआधी मराठा आरक्षण, महाविकास आघाडीनं लोकसभेला दिलेला धक्का,लाडकी बहीणसह अनेक योजनांविषयीचा नकारात्मक प्रचार यामुळे महायुतीही टेन्शनमध्येच होती.
उद्धव ठाकरेंना मुंबई, ठाण्यासह,पुणे, नाशिक या महत्वाच्या शहरांत शह देण्यासाठी महायुतीला सोबत घेण्यासाठी खुद्द देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेही अनुकूल होते.पण एकीकडे महायुतीची जागा वाटपाची चर्चा सुरू असतानाच तिकडे राज ठाकरेंनी आपल्या जाहीर सभांमधून स्वबळाचा नारा देत एकापाठोपाठ उमेदवारांची घोषणाही करण्यास सुरुवात केली. तिथेच राज ठाकरेंची मोठी चूक झाल्याचं बोललं जात आहे.
लोकसभा निवडणुकीत बसलेल्या फटक्यानंतर भाजपनं विधानसभेसाठी मायक्रो लेव्हलला प्लॅनिंग करणं सुरू केलं होत्ं. तसेच सोबतीला राष्ट्रीय स्वंयसेवक संघानेही या निवडणुकीसाठी आपली पूर्ण ताकद पणाला लावली होती. त्यासह हिंदुत्वाच्या मुद्द्यावर अनेक संघटना भाजपसह महायुतीच्या प्रचारात अॅक्टिव्ह झाल्या होत्या.
राज ठाकरेंनीही आपल्या प्रचारात हिंदुत्त्वाचा मुद्दाच जोरदार उचलून धरला होता.त्यामुळे ते जर महायुतीसोबत आले असते तर जो फायदा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला झाला तोच राज ठाकरेंच्या मनसेलाही नक्कीच झाला असता अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
भाजपच्या पक्षश्रेष्ठींशी असलेला कनेक्ट पाहता त्यांनी राज ठाकरेंना नक्कीच काही आमदारांना निवडून आणण्याची शाश्वती दिली असती.तसेच महायुतीसोबत राज ठाकरेंच्या रुपाने बाळासाहेब ठाकरेंच्या तालमीत तयार झालेला नेता आल्याचा फायदा ओळखून तसेच त्यांच्या आक्रमक भाषणांमुळे महायुतीच्या प्रचाराला आणखीनच धार चढण्याची शक्यता होती.
ही बाब दिल्लीतील चाणाक्ष भाजप नेत्यांनी नक्कीच हेरून राज ठाकरेंसाठी पायघड्या घातल्या असत्या. जर राज ठाकरेंनी आपली ताठर भूमिका सोडून महायुतीशी सूत जुळवून घेतलं असतं तर आज नक्कीच मनसेच्या खात्यात कमीत कमी शून्य नसता असं राजकीय जाणकारांचं मत आहे.
राज ठाकरेंनी 128 उमेदवार देण्यापेक्षा महायुतीत ठराविक जागा लढवल्या असत्या तर ते फायदेशीर ठरले असते.एकतर महायुतीत अमित ठाकरेंनी निवडणूक लढवलेली माहिम, बाळा नांदगावकर यांनी लढवलेल्या शिवडी, माजी आमदार राजू पाटलांच्या कल्याण ग्रामीणसह आणखी काही मतदारसंघाचा निकाल आज वेगळा दिसून आला असता.कदाचित या जागांवर मनसेचे उमेदवार निवडून आले असते.
राजकारणात अनेकवेळा संधी साधावी लागते. हीच बाब आजचा महाराष्ट्रातला सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपनं गेल्या काही वर्षांत अनेक राज्यांत हेरली आहे.तसेच राष्ट्रीय पक्ष असलेल्या काँग्रेस,आम आदमी पक्ष, यांसह अनेक पक्षांनी राजकीय परिस्थिती ओळखून अनेकदा कॉम्प्राईज केल्या आहेत. राजकीय इतिहासात तुम्हांला याची उदाहरणेही पाहायला मिळतील. पण आपल्या भाषणात नेहमीच टायमिंग साधणार्या राज ठाकरेंनी विधानसभेचं वारं ओळखता आलं नाही अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.