Satara, 25 November : महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री (स्व.) यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन करण्यासाठी आलेले अजित पवार यांनी साताऱ्याला ‘गुड न्यूज’ दिली आहे. राज्याच्या आगामी मंत्रिमंडळात साताऱ्याला निश्चितपणे मंत्रिपद मिळेल, असा शब्दच अजितदादांनी प्रीतिसंगमावर देऊन टाकला आहे. त्यामुळे साताऱ्यातून कोणाला मंत्रिपदाची संधी मिळणार, याची उत्सुकता वाढली आहे.
(स्व.) यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन घेतल्यानंतर माध्यमांशी बोलताना अजित पवार (Ajit Pawar) यांनी सातारा जिल्ह्याच्या मंत्रिपदाबाबत भाष्य केले आहे. सातारा जिल्ह्याला राष्ट्रवादी काँग्रेसकडून मंत्रिपदाची संधी आहे का, असा प्रश्न विचारण्यात आल्यानंतर अजित पवार यांनी ‘हो आहे,’ अशा शब्दांत साताऱ्याला मंत्रिपदाबाबतचा शब्द जाहीरपणे दिला आहे.
सातारा जिल्ह्यातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन जागा निवडून आल्या आहेत. यात वाईतून मकरंद पाटील (Makrand Patil) आणि फलटणमधून सचिन पाटील हे निवडून आले आहेत. यातील सचिन पाटील हे प्रथमच विधानसभेवर निवडून आलेले आहेत, त्यामुळे मकरंद पाटील यांचे मंत्रिपद निश्चित मानले जात आहे.
मागील महायुतीच्या मंत्रिमंडळात मकरंद पाटील यांना मंत्रिपदाची अपेक्षा होती. मात्र, शेवटपर्यंत मंत्रिमंडळाचा विस्तार न झाल्याने मकरंद पाटील यांना संधी मिळू शकली नव्हती. तत्पूर्वी महाविकास आघाडीत बाळासाहेब पाटील यांना सहकार मंत्रिपदावर काम करण्याची संधी मिळाली होती. आता पुन्हा महायुतीची सत्ता आल्याने मकरंद पाटील यांना मंत्रिपद मिळणार का, याकडे सातारकरांचे लक्ष असणार आहे.
मंत्रिपदाबाबत अजित पवार म्हणाले, मंत्रिपदाचा फार्म्युला अजून ठरलेला नाही. आमच्याकडून कोणाला संधी द्यायची, हे आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील सर्व आमदार आणि नेतेमंडळी मिळवून ठरवू. भाजप आणि शिवसेनेकडून कोण मंत्री होणार, हे त्या पक्षाचे नेतेमंडळी ठरवतील.
माझं साताऱ्याकडे कायम लक्ष राहिलं आहे. मी साताऱ्याचा पालकमंत्री होतो. येथील जनता, कार्यकर्ते आणि पदाधिकारी अतिशय चांगले आहेत, त्यामुळे मला साताऱ्यात काम करायला कायमच आवडतं. मी ज्या ज्या वेळी अर्थमंत्री म्हणून काम केले आहे, त्या त्या वेळी साताऱ्याला निधी देण्याबाबत झुकते माप दिलेले आहे. साताऱ्याला झुकते माप देण्याचे काम कालही करत आलो आहे, आजही करतोय आणि उद्याही करत राहणार आहे, असे अजित पवार यांनी स्पष्टपणे सांगितले.
विरोधी पक्षनेतेपद रिक्त राहणार
विरोधी पक्षनेते 29 आमदार असल्याशिवाय मिळत नाही. लोकसभेतही असा प्रकार 2019 मध्ये घडलेला आहे, त्यामुळे विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद कसे मिळेल, असा सवाला अजित पवार यांनी केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.