Raj thackeray  Sarkarnama
विश्लेषण

MNS 18th Foundation Day : एकखंबी तंबू हीच राज ठाकरेंची अडचण

Arvind Jadhav

MNS News : राज ठाकरे या नावाचे गारुड अद्याप कायम आहे. पक्ष स्थापनेपासून पक्षाला पहिल्या काही वर्षांत मिळालेले यश आता अपयशात बदलले आहे. मात्र, तरीही त्यांचा एकखांबी तंबू तग धरून आहे. या तंबूला वेळेवर टेकू लागले नाहीत. राज ठाकरे आपले वलय टिकवण्यात यशस्वी ठरले असले तरी पक्ष संघटनेचे काय, असा प्रश्न उपस्थित होतो. पक्षातील गटबाजी, रस्सीखेच अनेकदा चव्हाट्यावर आली. हे पहिले इंजेक्शन. सुधारणा झाली नाही तर नाशिकला ऑप्शनला टाकलेच म्हणून समजा, ही ठाकरे यांची धमकी पक्षाच्या एकंदरीत व्यवस्थेचे चित्र स्पष्ट करते.

पक्ष स्थापन झाल्यापासून मनसेची धुरा राज ठाकरे यांच्याकडे आहे. त्यात गैर काही नाही. मात्र, अधिकारांचा झरा झिरपून सर्वसामन्य कार्यकर्त्यांकडे पोहाेचवा. त्यांना मोठे होता येईल, असे वातावरण क्वचितच निर्माण झाले. कार्यकर्ता स्तरावर सुरू झालेली गटबाजी आतापर्यंत कायम आहे. राज ठाकरे, बाळा नांदगावकर यांनी ही खंत बोलून दाखवली. मात्र, या गटबाजीवर तसेच कार्यकर्त्यांना बांधून ठेवण्याच्या रणनितीवर राज ठाकरे काय तोडगा काढतात, हे पाहणे महत्त्वाचे आहे.

राज्यातील प्रमुख पक्षांचा विचार केला असता पक्षाकडून विभाग, प्रदेश, राज्य, जिल्हा अशा स्तरांवर नेतृत्व निर्माण करून त्यांना पुढे वाव दिला जातो. मनसेचे नेमके उलटे झाले. पक्ष निर्माण झाला त्यावेळी त्यांच्याकडे खंदे कार्यकर्ते होते. विशेष म्हणजे हे मनसैनिक शिवसेनेतूनच बाहेर पडले होते. निवडणुका झाल्यात. काही ठिकाणी घवघवीत यश मिळाले तर काही ठिकाणी निसटता पराभव पक्षाच्या हाती आला. नाशिकपुरता विचार केला असता मनसेला भुतो ना भविष्यती यश मिळाले. निवडून आलेल्या नगरसेवकांपैकी अनेकांनी महापालिकेत प्रथमच नगरसेवक म्हणून प्रवेश केला. (MNS 18th Foundation Day News)

नवखे लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते आणि राज ठाकरे यांच्यात दुवा साधणारी यंत्रणा त्यावेळी उभीच राहिली नाही. त्यावेळचे आमदार वसंत गिते हे राज ठाकरे यांच्या गळ्यातील ताईतच बनले होते. महापौर म्हणून राज ठाकरे यांनी सुशिक्षित आणि शांत प्रतिमा असलेल्या यतीन वाघ यांची निवड केली. मात्र, हळूहळू सत्तेची फळे काही जणांना मिळतात, अशी तक्रार पुढे येऊ लागली. त्यातूनच मनसेत दुफळी निर्माण झाली. एक गट थेट राज ठाकरे यांच्याकडे तक्रारी घेऊन जाऊ लागला. त्यावर राज ठाकरे काही निर्णय घेणार तोपर्यंत दुसरा गट तक्रारींची यादी घेऊन ठाकरेंसमोर हजर व्हायचा. राज ठाकरेंना शहरासाठी करायची कामे या गटबाजीतच हरवून गेली.

महापालिकेच्या सत्ता काळात हा ताण कमी करण्याची जबाबदारी राज ठाकरे यांनी संपर्कप्रमुख अविनाश अभ्यंकर यांच्याकडे सोपवली. मात्र, तोपर्यंत बराच उशीर झाला होता. आमदार आपल्यापरीने तर, नगरसेवक आपल्या हिशेबाने काम करू लागले. २०१४ मध्ये सुरू झालेल्या मोदी लाटेनंतर तर मनसेला सावरणे शक्यच झाले नाही. माजी आमदार वसंत गिते, नितीन भोसले, तत्कालीन शहराध्यक्ष राहुल ढिकले, यतीन वाघ, अतुल चांडक, सचिन ठाकरे आदींनी पक्षाला राम राम ठोकला.

राज ठाकरे यांनी डॅमेज कंट्रोलसाठी प्रयत्न केलेत. मात्र, गटबाजी थांबण्यास तयार झाली नाही. ही गटबाजी आजही कायम आहे. मागील महिन्यात राज ठाकरे नाशिक दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी सर्वच पदाधिकाऱ्यांना निर्वाणीचा इशारा दिला. गटबाजी थांबली नाही तर नाशिक ऑप्शनला टाकलेच समजा असा दमच त्यांनी दिला.

आजच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमादरम्यानसुद्धा माजी आमदार बाळा नांदगावकर (Bala Nandgavkar) यांनी गटबाजी थांबवा आणि पक्षाला चांगले दिवस आणा अशी हाक दिली. वास्तविक राज ठाकरे यांची क्रेझ कमी नाही ही वस्तुस्थिती आहे. दुर्दैवाने राज ठाकरे आपल्यानंतरची फळी तयार करू शकले नाही.

नाशिकमध्ये एक नेतृत्व हवे जे सर्वसमावेशक असेल. कार्यकर्ते आणि राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यात प्रत्येक निवडणुकीनंतर एक दरी तयार होते. ही दरी हळूहळू वाढत जाते. आगामी काळात जिल्हा व शहरनिहाय नेतृत्व उभे करणे आणि त्यातून कार्यकर्त्यांची सांगड घालणे हेच राज ठाकरे यांच्यासमोरील सर्वात मोठे आव्हान आहे.

(Edited By : Sachin Waghmare)

R

SCROLL FOR NEXT