Raj and Uddhav Thackeray’s unity hurt Congress Sarkarnama
विश्लेषण

Maharashtra Congress: राज-उद्धव याचं एकत्र येणं काँग्रेसच्या पथ्थावर पडेल का?

Raj and Uddhav Thackeray’s unity hurt Congress? ठाकरे बंधू मराठी विजय दिवस साजरा करीत असताना काँग्रेस नेत्यांची अनुपस्थिती आणि त्यांचे मौन यावरुन हे स्पष्ट आहे की, हा मुद्दांवरुन काँग्रेसला राजकारण करणे अवघड जात आहे.

Mangesh Mahale

Maharashtra Hindi-Marathi Politics : मराठी विजय दिवस वरळीत साजरा करण्यात आला. यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे अन् मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी दिलेल्या युतीच्या संकेतामुळे महाविकास आघाडीतून उद्धव ठाकरे बाहेर पडणार का? असा प्रश्न उपस्थित झाल्यानंतर आता काँग्रेसने उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेपासून चार हात लांब राहणे पसंत केले आहे. महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसचे नेते, पदाधिकारी नाराज असल्याचे चित्र आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ठाकरे बंधूंच्या 'आवाज मराठी'चा कार्यक्रमात सहभाग घेतला, पण काँग्रेसने या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली. काँग्रेसचा कुठलाही मोठा नेता, पदाधिकाऱ्याने या कार्यक्रमाला उपस्थिती लावली नाही. कारण ठाकरे बंधूंनी मराठी-हिंदीच्या मुद्यांवर घेतलेल्या भूमिकेवर काँग्रेस नेत्यांमध्ये एकवाक्यता नसल्याचे दिसते.

ठाकरे बंधूंची एकत्र येण्याची घोषणा ही केवळ आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी आहे. मुंबई ताब्यात ठेवण्यासाठी ठाकरे बंधूंचा हा डाव आहे, असे विरोधकांचे मत आहे. आम्ही एकत्र आहोत, एकत्र राहणार, असे ठामपणे सांगणाऱ्या उद्धव ठाकरेंच्या विधानाने महाविकास आघाडीच्या दोन्ही घटक पक्षामध्ये चलबिचल सुरु झाली आहे. बीएमसी आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी ठाकरें बंधूंचे हे महायुतीला हे आवाहन आहे.

उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेसोबत सहमती दर्शवणे हे काँग्रेसला अवघड जाईल, राष्ट्रीय पक्ष अशी काँग्रेसची ओळख आहे, याला धक्का बसेल, अशी भीती काँग्रेसला आहे. महाराष्ट्र आणि अन्य ठिकाणी अमराठी मतदार ही काँग्रेसची व्होट बँक आहे. हिंदीच्या मुद्यांवरुन उद्धव ठाकरेंना साथ दिली तर ही पारंपरिक व्होट बँक आपल्यापासून दूर जाईल, याचा फायदा भाजपला होईल, अशी भीती काँग्रेसला आहे.

हिंदी सक्तीच्या विरोधातील राज ठाकरेंचा लढा हा उद्धव ठाकरे यांच्या फायदाचा असला तरी काँग्रेससाठी अडचणीचा ठरणार आहे. या मुद्दांमुळे मुंबईत मराठी भाषिक मतदार आपल्याकडे खेचण्यात यश मिळेलही, पण दीर्घकालीन राजकारणासाठी हिंदीला विरोध करणे काँग्रेसला नुकसानीचे ठरेल. ठाकरे बंधू मराठी विजय दिवस साजरा करीत असताना काँग्रेस नेत्यांची अनुपस्थिती आणि त्यांचे मौन यावरुन हे स्पष्ट आहे की, हा मुद्दांवरुन काँग्रेसला राजकारण करणे अवघड जात आहे.

मुंबई-ठाणे परिसरात अमराठी विशेषता उत्तर भारतीय आणि मुस्लिम मतदार हे काँग्रेसचा व्होट बँक आहे. हिंदी विरोधी, मुस्लिमांच्या विरोधातील राज ठाकरे यांची विधानं या मतदारांना नाराज करु शकतात, त्यामुळे काँग्रेसचे नुकसान होण्याची शक्यता अधिक आहे. बहुसंख्य मुस्लिम मतदार हे भाजप विरोधी आहेत, भाजपचा पराभव करण्यासाठी मुस्लिम मतदारांचा पाठींबा हा महाविकास आघाडी मिळू शकतो, हेही स्पष्ट आहे.

धर्मनिरपेक्ष पक्ष म्हणून काँग्रेसची ओळख आहे. यासाठीच आतापर्यंत ठाकरे बंधूंसोबत काँग्रेस चार हात दूर आहे. पण जर राज ठाकरे आपल्या भूमिकेत लवचिकता आणतील, तर काँग्रेस याबाबतचा त्यांना टाळी देण्यासाठी कदाचित पुढे येण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण मनसेची महाराष्ट्रात स्वत:ची अशी व्होट बँक नाही, 6 ते 7 टक्के मनसेला जे मतं मिळतात ते व्यक्तीगत उमेदवारांना मिळालेली मतं असल्याचे बोलले जाते. त्यामुळे आपल्याला मनसेचा फायदा होणार नाही, हे काँग्रेसच्या नेत्यांना वाटते.

गेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस (12.43 टक्के मते) आणि शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष(10 टक्के) मते मिळाली होती. आगामी निवडणुकीत जर उद्धव ठाकरे यांची मनसेसोबतची युती काँग्रेसला आणखी कमजोर करण्यासाठी कारणीभूत ठरु शकते. कारण अमराठी मतदार हे भाजपकडे जातील, पण जा अमराठी मतदारांना आपल्याकडे खेचण्याची ताकद काँग्रेसमध्ये आहे. राज ठाकरे जर उद्धव ठाकरे यांच्यासोबत आले तर जागा वाटपावरुन महाविकास आघाडीत बिघाडी निर्माण व्हायला वेळ लागणार नाही, हे स्पष्ट आहे.

विधानसभा अधिवेशनापूर्वी काँग्रेसचे प्रभारी रमेश चैन्निथला यांनी महाराष्ट्रातील काही नेत्यांना दिल्लीत बैठकीसाठी बोलवले होते. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, विरोधीपक्ष नेते राहुल गांधी यांची भेट होईल, त्यांच्याकडे मराठी-हिंदी वादाबाबत चर्चा करता येईल, असे या नेत्यांना वाटले होते, पण या दोन्ही नेत्यांनी त्यांना भेट दिली नाही.

महाराष्ट्रातील भाषिक वादावर सल्ला घेण्यासाठी दिल्लीत गेलेल्या नेत्यांना कुठलीही मार्गदर्शन मिळाले नाही. या नेत्यांना भाषिक वादापासून दूर राहण्यास सांगितले आहे.जय हिंद यात्रा आणि संविधान सन्मान संमेलन आयोजित करण्याचा सल्ला देण्यात आल्याचे विश्वसनीय सुत्रांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT