
नेत्यांचा फिटनेस : राजकारण, समाजकार्य आणि लोकसेवा या क्षेत्रांमध्ये यशस्वी ठरण्यासाठी केवळ बौद्धिक क्षमता नव्हे, तर शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्तीही तितकीच आवश्यक असते. हे सिद्ध करून दाखवले आहे मावळचे आमदार सुनील शंकरराव शेळके यांनी. दिवसाची सुरुवात नियमित व्यायामाने करणारे शेळके सांगत आहेत तंदुरुस्त राहण्यासाठी ते करत असलेले प्रयत्न...
शरीर निरोगी तर मन शांत आणि विचार स्पष्ट!’ या सूत्रावर माझी श्रद्धा आहे. माझ्या दैनंदिन वेळापत्रकात सकाळी ५ किलोमीटर चालणे, धावणे, सूर्यनमस्कार, जोर, बैठका आणि योग यांचा नियमित समावेश असतो. मी घरातच अत्याधुनिक व्यायाम साहित्य उपलब्ध ठेवले आहे. अत्यंत व्यग्र दिनचर्येतूनही व्यायामाला प्राधान्य देत असतो. त्यामुळे सर्वार्थानं शिस्त अंगी बाणते. तसेच ऊर्जा मिळते.
मला शालेय जीवनापासून व्यायाम अन् खेळाची विशेष आवड आहे. मी १९९३ ते १९९७ दरम्यान पुण्यातील गराडे तालीममध्ये निवासी प्रशिक्षण घेतले आहे. तसेच महाराष्ट्रातील कुस्तीचा गड समजल्या जाणाऱ्या कोल्हापूरच्या मोतिबाग तालीममध्येही कुस्तीचा सराव केला आहे. यात्रा-उत्सवांतील कुस्तीच्या आखाड्यात मी यशस्वीरीत्या सहभागीही झालो आहे.
प्रशासकीय कामासाठी मुंबईत गेलो तरी, दिवसभराचे काम आटपून ‘मरीन ड्राईव्ह’वर व्यायाम करण्यावर माझा भर असतो. लोकांमध्ये मिसळणं, त्यांच्यासोबत व्यायाम करणं मला आवडतं. माझ्या मतदारसंघाला म्हणजेच मावळला ‘आरोग्यदायी आणि सशक्त मावळ’ करण्याचे माझे स्वप्न आहे. त्यासाठी मावळमध्ये अनेक क्रीडा स्पर्धा, योग शिबिरे, सायकल रॅली, आरोग्य तपासणी शिबिरे आयोजित करून आरोग्याविषयी जनजागृतीचा प्रयत्न सुरू असतो. त्यामुळेच ४६ गावांमध्ये व्यायामशाळांची उभारणी, ४ कोटींपेक्षा अधिक क्रीडासाहित्याचे वाटप, शालेय विद्यार्थ्यांसाठी क्रीडा साहित्य अन् स्पर्धांचे आयोजन केले.
युवा पिढीच्या शारीरिकदृष्ट्या सदृढ होण्यासाठी वडगावमध्ये १५ एकरात नवीन क्रीडा संकुलासाठी प्रस्ताव केला आहे. वडगाव शहराच्या क्रीडा क्षेत्राला नवे बळ देणारा असा हा ऐतिहासिक निर्णय आहे. शहरात १५ एकर क्षेत्रामध्ये भव्य क्रीडा संकुल उभारण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. या प्रस्तावामुळे युवकांना दर्जेदार क्रीडा सुविधा मिळणार आहेत. प्रस्तावित क्रीडा संकुलात फुटबॉल मैदान, हॉकी ग्राउंड, मल्टिपर्पज इनडोअर हॉल, टेनिस कोर्ट, जलतरण तलाव, व्यायामशाळा, धावपटूंसाठी ट्रॅक तसेच प्रेक्षकांसाठी बैठकीची विशेष व्यवस्था करण्यात येणार आहे.
या संकुलामुळे वडगावमधील युवकांना शहरातच जागतिक दर्जाच्या सुविधा मिळतील. हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्णत्वास जावा, यावर माझा भर आहे. हा प्रस्ताव सध्या जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयाच्या मान्यतेसाठी पाठवण्यात आला आहे. तालुक्यातील क्रीडाप्रेमींनी या प्रकल्पासाठी पाठिंबा दर्शविला आहे.
शहराच्या विकासासाठी आणि युवा पिढीच्या शारीरिकदृष्ट्या सदृढ होण्यासाठी हा क्रीडा संकुलाचा प्रकल्प एक मैलाचा दगड ठरणार आहे. जांभुळ येथेही सात एकरांवर मावळातील पहिले क्रीडासंकुल साकारले जाणार आहे. यासाठी पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर झालेला आहे. या नियोजित क्रीडा संकुलामध्ये खेळाडूंना सराव करण्याच्या साधनांसह विविध सुविधा उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे युवा पिढी तंदुरुस्त होण्यास माझ्या माध्यमातून थोडाफार हातभार लागेल.
(शब्दांकन : विजय सुराणा)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.