Raju Shetti Sarkarnama
विश्लेषण

Raju Shetti News : एकापेक्षा एक मातब्बर नेत्यांनी 'स्वाभिमानी' सोडली ; शेट्टींपुढे आता शेतकरी चळवळ टिकवण्याचं आव्हान

Rahul Gadkar

Kolhapur News : ज्या चळवळीने गाव पातळीपासून राज्यभरात आणि राज्यातून दिल्लीच्या तख्तापर्यंत मजल मारली. तीच चळवळ आता संपणार की काय अशी भीती सर्वसामान्य शेतकऱ्यांना पडू लागली आहे. शेतकरी नेते शरद जोशी यांच्या शेतकरी संघटनेच्या चळवळीतून बाहेर पडून माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी बाहेर पडून स्वतःची स्वाभिमानी शेतकरी संघटना चळवळ सुरू केली. त्याच चळवळीला आता संघटन वाढवणारा चेहरा नको झाला की काय? असा समज गैरसमज निर्माण होऊ लागला आहे.

शिवारापासून ते संसदेपर्यंत दोनवेळा मजल मारलेल्या माजी खासदार राजू शेट्टी यांचा सलग दोनवेळा पराभव झाला. अशातच संघटनेच्या स्थापनेपासून ते आतापर्यंतच्या कालावधीत माजी आमदार उल्हास पाटील, माजी मंत्री आमदार सदाभाऊ खोत आणि रविकांत तुपकर यांच्यापुढं कार्यकर्त्यांनी संघटनेकडे फिरवलेली पाठ ही आगामी चळवळीची भरकटलेली दिशा स्पष्ट करत आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर यश मिळवण्यापेक्षा चळवळ टिकवण्याचे मोठे आव्हान स्वाभिमानी शेतकरी संघटनेपुढे आहे.

शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांच्या मुशीत तयार झालेले राजू शेट्टी, उल्हास पाटील सदाभाऊ खोत, रविकांत तुपकर यांनी आपली शेतकऱ्यांची नाळ तोडलेली नाही. मात्र, शरद जोशी यांच्या शेतकरी संघटनेसमोरच आव्हान उभे करत शेट्टी यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची स्थापना केली. त्यांच्यासोबत उल्हास पाटील, सदाभाऊ खोत, रविकांत तुपकर यांनी राज्यभरात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अस्तित्व नावारूपास आणले.

ऊस पट्ट्यात ऊसदरासंदर्भात आंदोलन करून शेतकऱ्यांच्या मनात आपली वीण घट्ट केली. ऊस दर किंवा दूध दर या संदर्भात जनजागृती करून शेतकऱ्यांच्या योग्य मोबदल्याचा आर्थिक फायदा त्यांना करून दिला. गावोगावी पदयात्रा आणि सभा घेत शेट्टी यांनी मांडलेली व्यथा सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या मनात घर केली.

याचाच फायदा राजू शेट्टी यांना निवडणुकीच्या काळात झाला. पहिल्यांदा लोकांनी त्यांना जिल्हा परिषद सदस्य केले. कालावधी संपण्याआधीच ते आमदार झाले. आमदारीचा कालावधी संपण्याआधीच ते एकवेळा नव्हे तर दोनवेळा खासदार झाले. मात्र, मागील दोन लोकसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला.

या वीस वर्षाच्या कालावधीत त्यांच्यासोबत असलेल्या कार्यकर्त्यांनी ही त्यांची साथ सोडली आहे. शिरोळ ची माजी आमदार उल्हास पाटील यांनी चळवळीत असतानाच शेट्टी यांची साथ सोडून शिरोळ विधानसभा मतदारसंघांमध्ये शड्डू ठोकला. आणि त्यांच्याच उमेदवाराचा पराभव करून शिवसेनेतन ते आमदार झाले.

2014 च्या लोकसभा निवडणुकीत शेट्टी यांनी भाजपला पाठिंबा दिला. त्याचे फलित राज्यात विधानसभा निवडणुकीत मिळाले. युतीतून त्यांना एक विधान परिषदेची जागा आणि राज्यमंत्रीपद मिळाले. सदाभाऊ खोत हे विधान परिषदेवर गेल्यानंतर त्यांना राज्यमंत्रीपदाची लॉटरी लागली. खांद्याला खांदा लावून लढणारे हे दोघे सच्चे मित्र यानिमित्ताने एकमेकांपासून वेगळे झाले.

सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी सातत्याने शेट्टी यांच्यावर टीकास्त्र सोडून त्यांचे मागील दोन लोकसभा निवडणुकीत वस्त्रहरण केले आहे. त्याचाच तोटा लोकसभा निवडणुकीत बसत आला आहे. तर त्याचबरोबर यंत्रमाग महामंडळाचे अध्यक्ष पद रविकांत तुपकर यांना मिळाले. छोट्या मोठ्या कारणावरून तुपकर आणि शेट्टी यांचे कधीच जमले नाही. अखेर तुपकर यांना संघटनेतून बाहेर काढण्यात आले.

इतकेच नव्हे तर 2019 च्या विधानसभा निवडणुकीत मोर्शी - वरुड विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे एकमेव आमदार देवेंद्र भुयार यांच्याशी संघटनेतील वागणूक टोकाची राहिली आहे. मागील दोन लोकसभा निवडणुकीमध्ये चळवळीला लागलेल्या ग्रहणामुळेच आणि शेट्टी यांच्या भूमिकेमुळेच त्यांना अपयश मिळत गेले आहे.

अलिकडच्या काळात राजू शेट्टी यांनी सुरू केलेले आंदोलन तितक्या ताकतीने होत नसल्याचे चित्र जाणवते. त्याला संघटनेत पडलेली फुटही तितकीच जबाबदार आहे. तर लोकसभा निवडणुकीत अनेक मातब्बर कार्यकर्त्यांनी संघटने कडे पाठ फिरवल्याचे चित्र आहे. आगामी विधानसभा आणि पंचायत समिती नगरपालिका निवडणुकीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अस्तित्व टिकवण्यासाठी मोठे आव्हान शेट्टी यांच्यासमोर आहेच, पण शेतकरी चळवळीचा मुख्य हेतूला धरून चळवळ टिकवण्याचं मोठे आव्हान शेट्टी यांच्यासमोर आहे.

लोकांसाठी लढताना त्यांच्याकडून अपेक्षाभंग

पद असो किंवा नसो राजू शेट्टी यांनी सातत्याने शेतकऱ्याच्यां भूमिकेत जाऊन त्यांना न्याय दिला आहे. दोन वेळा संसदेत असताना यंत्रमाग कामगार, सर्वसामान्यांच्या अनेक घटकांना न्याय मिळवून द्यायचा काम शेट्टी यांच्याकडून झाले आहे. शैक्षणिक फी, महागाई या संदर्भात लढा देत असताना शेट्टी यांनी सर्वसामान्यांचा आवाज दिल्लीपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं आहे. अशावेळी लोकांच्यासाठी लढत असताना दोन वेळा जनतेने नाकारलं. त्यामुळे संघटनेच्या कार्यकर्त्याचे मनोबल खचले आहे. त्याची खंत कार्यकर्त्यांनी शेट्टी यांच्यासमोर बोलून दाखवली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT