raju shetti sarkaranama
विश्लेषण

Raju Shetti News : शेट्टींचा पराभव, प्रदेशाध्यक्षांचा राजीनामा; 'बॅकफूट'वर गेलेली स्वाभिमानी कधी 'अ‍ॅक्टिव्ह' होणार ?

Sampat Devgire

Raju Shetti's Swabhimani Shetkari Sanghatana News: स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांनी अखेर राजीनामा दिला. त्यामुळे राज्यातील आणि विशेषत: नाशिक जिल्ह्यातील संघटना सक्रिय होईल का?. असा प्रश्न निर्माण झाला आहे.

पश्चिम महाराष्ट्रात सक्रिय असलेल्या माजी खासदार राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेला नवा प्रदेश अध्यक्ष मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. यानिमित्ताने सर्वाधिक संधी असूनही नाशिकमध्ये निष्क्रिय असलेली ही संघटना प्रभावी होईल का? किमान तशी शक्यता आता निर्माण झाली आहे.

ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर अतिशय आक्रमक लढा उभारण्याचे काम या संघटनेने केले आहे. त्यामुळे राजू शेट्टी(Raju Shetti) यांना राज्याच्या अन् देशाच्या राजकारणातही एक वेगळे स्थान निर्माण झाले. सहकारी साखर कारखान्यांच्या बलाढ्य नेत्यांना अभ्यास आणि गाव पातळीवर कार्यकर्ते निर्माण करून शेट्टी यांनी आपले जाळे पक्के केले होते.

राजू शेट्टी यांना मानणारा मोठा वर्ग नाशिक जिल्ह्यात आहे. त्यांच्या उपस्थितीत अनेक आंदोलने झाली आहे. शेट्टी यांचे ऊस उत्पादकांप्रमाणेच द्राक्ष आणि कांदा उत्पादकांचे सुद्धा एक वेगळे क्लस्टर आणि संघटना निर्माण करण्याचे स्वप्न होते.

माजी खासदार शेट्टी यांनी यासंदर्भात नाशिक जिल्ह्याचा दौरा केला होता. निफाड येथे एक परिषदही घेतली होती. मात्र दोन वर्ष होऊनही त्यात काहीही प्रगती झाली नव्हती. याची सल सामान्य कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांनाही होती. त्या दृष्टीने नाशिकचे असूनही फारसे काम प्रदेशाध्यक्ष जगताप करू शकले नव्हते.

कांदा हा नाशिक जिल्ह्याचा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. कांदा उत्पादकांच्या अनेक अडचणी असताना. त्यावर अनेक किरकोळ व स्थानिक संघटना आक्रमक होत होत्या. राजकीय पक्षांचे आंदोलन उभे राहत होते. मात्र त्यात कुठेही स्वाभिमानी शेतकरी संघटना दिसली नाही.

माध्यमांतही स्वाभिमानी शेतकरी संघटनेला स्थान नव्हते. प्रदेशाध्यक्ष जगताप अधूनमधून व्हिडिओ काढून ते व्हायरल करण्यापलीकडे ग्राउंड लेव्हलला काम उभे करू शकले नव्हते.

या संदर्भात असंख्य तक्रारी कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांनी शेट्टी यांच्याकडे केल्या होत्या. त्यातूनच जगताप यांचा राजीनामा झाल्याचा अंदाज आहे. या निमित्ताने कांदा आणि द्राक्ष उत्पादकांच्या पट्ट्यात नाशिकला नवे नेतृत्व मिळेल अशी शक्यता दिसू लागली आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT