Kolhapur Politics: लोकसभा निवडणुकीत सलग दोन वेळा पराभव झाल्यानंतर आणि विधानसभा निवडणुकीत अपयशाला सामोरे गेल्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेला खऱ्या अर्थाने घरघर लागली आहे. दिवसेंदिवस स्वाभिमानी शेतकरी संघटनेतील गळती सुरू असून त्या मागची कारणेही राजू शेट्टी (Raju Shetti) यांच्यासह पदाधिकाऱ्यांना माहिती आहेत.
तर शक्तिपीठ विरोधी आंदोलनाच्या निमित्ताने मुंबईत राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी, राजू शेट्टी यांनी माझे ऐकले असते तर आज ते खासदार असते. असे विधान केल्यानंतर पुन्हा एकदा शेतकरी संघटनेच्या गोटात खळबळ उडाली आहे. जयंत पाटील यांच्या या विधानामुळे पुन्हा एकदा संघटनेत कुजबूज सुरू झाली असून खरंच शेट्टी यांनी ऐकले असते तर आज जीवाभावाचे मित्र सोबत असते असा सूर उमटत आहे.
2009 ला पहिल्यांदाच खासदार झालेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी 2014 ला भाजपसोबत घरोबा करत पुन्हा एकदा लोकसभेत एन्ट्री केली. पण 2019 च्या लोकसभा निवडणुकीत आघाडीसोबत संधान बांधल्याने शेट्टी यांना पराभवाला सामोरे जावे लागले. त्यामुळे 2024 च्या लोकसभा निवडणुकीत ना युती ना आघाडीशी संबंध ठेवत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी एकला चलो ची भूमिका घेतली. मात्र पक्षातीलच पदाधिकाऱ्यांकडून कुणाची तरी सोबत करावी, असा आग्रह होता.
महाविकास आघाडीनेदेखील राजू शेेट्टींनी आपल्यात सामील होऊन लोकसभा निवडणूक लढवावी, असा आग्रह धरला होता. अनेक नेत्यांच्या गाठीभेटी देखील झाल्या होत्या. मात्र शेट्टी यांच्या 'एकला चलो' च्या भूमिकेने संघटनेतीलच जीवाभावाची मित्र नाराज झाले. त्याचाच फटका लोकसभा निवडणुकीत बसला. शेट्टी यांना पराभवाला सामोरे जावे लागले. पराभवामुळे अनेक जवळचे कार्यकर्ते दुरावले. शेट्टी घेत असलेले एकतर्फी निर्णय यामुळे कार्यकर्त्यांच्या संताप निर्माण झाला होता.
विधानसभा निवडणुकीत संघटनेच्याच कार्यकर्त्यांचा बळी देऊन उपऱ्या उमेदवारांना टस्वाभिमानीटकडून राजू शेट्टी यांनी उमेदवारी दिली. लोकसभेतील भूमिकेमुळे नाराज झालेले पदाधिकारी यांनी महायुतीला पाठिंबा दिला. स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष जालिंदर पाटील, भगवान पाटील, सावकार मादनाईक यांच्यासह असंख्य बिनीचे शिलेदार महायुती गोठात दाखल झाले. आता शेट्टी यांचा स्वतःशीच संघर्ष सुरू झाला आहे.
लोकसभा निवडणुकीत कार्यकर्त्यांची भावना समजून घेऊन शेट्टी यांनी विचार केला असता तर आज शक्ती लोकसभेचे सदस्य असते. असे म्हणायला तीळमात्र शंका देखील उरत नाही. कारण हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील माने हे थोडक्यात मताने विजयी झालेले आहेत.
शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार धैरशील माने यांना 5 लाख 20 हजार 190, महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील सरूडकर यांना 5 लाख 6 हजार 764 तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांना 1 लाख 79 हजार 850 इतकी मते मिळाली.
धैर्यशील माने अवघ्या 13426 मतांनी विजयी झाले आहेत. महाविकास आघाडीने देखील शेट्टी यांना घेण्यास सहमती दाखवली होती. पण ठाकरेंच्या शिवसेनेकडून शिवसेनेत प्रवेश करूनच उमेदवारी घेण्यात यावी असा आग्रह होता. कारण 2014 आणि 2019 चा काळ पाहता शेट्टी यांनी घेतलेली सोयस्कर भूमिका अडचणीची ठरू शकेल. असा अंदाज ठाकरेंच्या शिवसेनेला होता.
तर दुसरीकडे महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील सरूडकर यांची देखील लोकसभा निवडणूक लढवण्याची मानसिकता नव्हती. जर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी हे महाविकास आघाडीचे उमेदवार असते. कदाचित हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील चित्र आज वेगळे असते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.