Vinod Tawde, PM Narendra Modi Sarkarnama
विश्लेषण

Vinod Tawde News : बिहारची मोहीम फत्ते केलेल्या विनोद तावडेंना मिळणार मोठं बक्षीस

Rajya Sabha Election : तावडेंसह पंकजा मुंडे, विजया रहाटकर यांना राज्यसभेचे तिकीट?

सरकारनामा ब्यूरो

संजय परब

Mumbai : राज्यसभेच्या 56 जागांसाठी निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर झाले आणि महाराष्ट्रातून सहा जागांसाठी कोणाची निवड होणार याची आता उत्सुकता निर्माण झाली आहे. भाजपकडून राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांची खासदारकी नक्की झाल्याची चर्चा असून एकप्रकारे बिहारच्या सत्तापालट खेळीचे त्यांना बक्षीस मिळणार आहे. तावडे यांच्याबरोबर पंकजा मुंडे आणि विजया रहाटकर यांना सुद्धा उमेदवारी मिळेल, अशी चर्चा आहे. (Vinod Tawde News)

येत्या 27 फेब्रुवारी रोजी राज्यसभेसाठी निवडणूक (Rajya Sabha Election) पार पडणार आहे. यात महाराष्ट्रातील (Maharashtra) सहा जागांचा समावेश आहे. यातील पाच जागा महायुती सहज मिळवेल, अशी दाट शक्यता आहे. भाजपकडून (BJP) राज्यसभेसाठी उमेदवारांची चाचपणी सुरू करण्यात आली असून यात विनोद तावडे यांच्यासह पंकजा मुंडे (Pankaja Munde) आणि विजया रहाटकर यांची नावे पुढे आहेत.

आगामी लोकसभा निवडणुका आणि जातीय समीकरण लक्षात घेत भाजप राज्यसभेसाठी उमेदवार देणार असल्याचं समजतंय. मराठा, ओबीसी, महिला आणि उत्तम संघटक असा विचार करून भाजप आपले उमेदवार निश्चित करणार आहे. यात उत्तम संघटक आणि मराठा समीकरण असा विचार करून तावडे यांची उमेदवारी नक्की मानली जात आहे. सत्तेतील सहकारी पक्ष राष्ट्रीय जनता दलामुळे नितीश कुमार अस्वस्थ असल्याचा अंदाज आल्यानंतर बिहार प्रभारीपदाची जबाबदारी असलेल्या तावडे यांनी खेळी करताना भाजप तुमच्यासोबत येत असल्याचा हिरवा कंदील तर दिलाच, शिवाय नितीशकुमारांना तुमचे मुख्यमंत्रीपद जाणार नाही, याचा सुद्धा विश्वास दिला. यामुळे भाजपला आता बिहारमध्ये भक्कपणे पाय रोवायला मिळणार आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

भाजपच्या दृष्टीने आता लोकसभा निवडणुका महत्वाच्या असल्याने विधानसभेत नितीश यांच्या जनता दल युनायटेडपेक्षा मोठे संख्याबळ असून त्यांनी हातमिळवणी केली आहे. एकदा लोकसभेत सत्ता आली की पुढे नितीश यांचा उध्दव ठाकरे कसा करायचा, याचे गणित भाजपकडे आहे. विशेष म्हणजे ही सारी रणनीती तावडे यांची असल्याने मोदी, शहा, नड्डा यांच्यानंतर तावडे सध्या भाजपमध्ये चौथ्या क्रमांकाचे नेते बनले आहेत.

पंकजा मुंडे या 2019 ला निवडणुकीत पराभूत झाल्यापासून नाराज असून आपली नाराजी त्या वेळोवेळी दाखवत असतात. मात्र अजूनही त्या पक्ष सोडून गेलेल्या नाहीत. मराठवाडा परिसर आणि ओबीसी समाज यात मुंडे नावाला अजूनही स्थान असून लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर या काही गोष्टी विचारात घेऊन त्यांना उमेदवारी मिळेल, अशी शक्यता आहे. विजया रहाटकर यांनी सुद्धा महिला आयोगावर काम करताना आपल्या नावाची चर्चा कायम राहिल, याची काळजी घेतली आहे.

राज्यसभेच्या सदस्यत्वासाठी विधानसभेतील आमदार मतदार असतात. मागील दोन वर्षांत राज्यातील राजकारणात मोठ्या घडामोडी घडल्या. राज्यसभेचे खासदार निवडणूक देणारे आमदार मोठ्या संख्येने अदलाबदल झालेत. महायुतीत तीन प्रमुख पक्ष असून यात भाजप, शिवसेना (एकनाथ शिंदे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांचा समावेश असून त्यांच्याकडे आमदारांची संख्या महाविकास आघाडीपेक्षा खूप जास्त आहे. संख्याबळाचा विचार करता महायुतीला पाच जागा मिळतील. तर महाविकास आघाडीला एकच जागा मिळेल.

(Edited By - Rajanand More)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT