Sharad Pawar Sarkarnama
विश्लेषण

Rajya Sabha Election : शरद पवारांचा एक निर्णय अन् राज्यसभा निवडणुकीचे गणित बिघडणार! भाजप, काँग्रेसकडे पर्यायच नाही!

Sharad Pawar BJP Congress : राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतील जागेवर काँग्रेसकडून दावा सांगितला जात आहे. तर, भाजप देखील सातवा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Roshan More

Sharad Pawar News : राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास सुरवात झाली आहे. महाराष्ट्रातील सात जागांवर होत असलेल्या या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी एकत्र राहिली तर त्यांच्या वाट्याला अवघी एक जागा येत आहेत. शरद पवार हे राज्यसभेचे उमेदवार असणार की नाही यावरून देखील चर्चा सुरू आहेत.

महाविकास आघाडीतील एका जागेवर काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून दावा सांगण्यात आला आहे. दोन्ही पक्षातील नेत्यांकडून ही जागा मिळवण्यासाठी वाटाघाटी देखील सुरू करण्यात आल्या आहेत. त्यातच शरद पवार ही जागा लढणार की नाही हे स्पष्ट होऊ शकले नाही. त्यामुळे जर शरद पवार निवडणुकीच्या मैदानात नसतील तर सातव्या जागेवर उमेदवार देण्याच्या हालचाली भाजपने सुरू केल्या आहेत.

शरद पवार निवडणूक लढणार नसतील तर महाविकास आघाडीच्या विरोधात सातवा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरावा, असे संदेश भाजपच्या दिल्लीतील नेत्यांनी दिली आहे. त्यामुळे राज्यसभा निवडणूक चुरुशीची होण्याची शक्यता आहे. दरम्यान, शरद पवारांनी निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि काँग्रेस माघार घेईल. आणि महाविकास आघाडीचे उमेदवार शरद पवार असतील.

शरद पवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर भाजप देखील त्यांच्या विरोधात उमेदवार उतरवणार नाही. त्यामुळे शरद पवारांच्या एका निर्णयावर भाजप, काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे राज्यसभेच्या निवडणुकीचे समीकरण अवलंबून आहे. दरम्यान, शरद पवार निवडणूक लढणार की नाही याचा निरोप अजून काँग्रेस नेत्यांना मिळाला नसल्याचे सांगितले जात आहे.

...तर निवडणूक बिनविरोध

सात जागांसाठी होत असलेल्या या निवडणुकीत महायुतीमध्ये भाजपचे चार तर, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा प्रत्येकी एक उमेदवार विजयी होणार असल्याचे निश्चित आहे. महाविकास आघाडीकडे देखील एक उमेदवार निवडून आणण्याचे संख्याबळ आहे. शरद पवार उमेदवार असतील तर सातव्या जागेसाठी भाजप उमेदवार देणार नाही. त्यामुळे राज्यसभेची निवडणूक ही बिनविरोध होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

महाविकास आघाडी भक्कम की...

राज्यसभा निवडणुकीमुळे महाविकास आघाडी भक्कम आहे की नाही याचे चित्र स्पष्ट होणार आहे. एक राज्यसभा उमेदवार निवडून आणण्यासाठी 37 मतांची आवश्यकता आहे. शरद पवारांच्या भूमिकेवर ही निवडणूक बिनविरोध होणार की नाही हे ठरणार आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चांना सध्या पूर्णविराम लागला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष हा महाविकास आघाडीसोबतच असणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. ही आघाडी भक्कम आहे की नाही हे राज्यसभा निवडणुकीतच दिसून येईल,

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT