सोलापुरात (Solapur Lok Sabha 2024) विमानसेवा नाही, त्यामुळे विकास खुंटला आहे, याची नेहमीच चवीने चर्चा होत असते. विमानसेवा सुरू करण्यात सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या चिमणीचा अडथळा असल्याचे कारण समोर करण्यात आले. हे प्रकरण न्यायप्रविष्ट होते. अखेर गेल्या वर्षी मोठ्या बंदोबस्तात शहर, जिल्हा गाढ झोपेत असताना प्रशासनाने ही चिमणी जमीनदोस्त केली. विमानसेवा सुरू झाली का? या प्रश्नाचे उत्तर अद्याप नाही असेच आहे. त्यामुळे चिमणी पाडणे हा राजकारणाचा भाग होता, त्याला भाजप जबाबदार आहे, अशी भावना विशेषतः अक्कलकोट आणि सोलापूर दक्षिण तालुक्यांत निर्माण झाली होती.
आता याची आठवण यायचे कारण म्हणजे अर्थातच लोकसभा निवडणूक. सिद्धेश्वर कारखान्याची चिमणी पडली त्यावेळी ऊसउत्पादक शेतकऱ्यांच्या भावना तीव्र होत्या. कारखान्याचे सर्वेसर्वा धर्मराज काडादी यांनी नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत याची आठवण करून दिली. भाजपने सलग तिसऱ्या निवडणुकीत उमेदवार बदलला आहे.
यापूर्वीच्या (2014, 2019) खासदारांना भाजपने उमेदवारी दिली नाही. ते दोन्ही खासदार सक्रिय नव्हते, त्यांनी कामे केली नाहीत, असा संदेश त्यातून गेला आहे. सोलापूर शहर मध्य मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आलेल्या काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांची लढत भाजपचे माळशिरसचे आमदार राम सातपुते यांच्याशी होत आहे. सातपुते हे विद्यार्थी चळवळीतून (अखिल भारतीय विद्यार्थी परिषद) आलेले आहेत.
प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांनी सोलापूर मध्य विधानसभा मतदारसंघातून 2014 ची निवडणूक जिंकताना राजकीय कौशल्य पणाला लावले होते. 2019 लाही विपरित परिस्थितीवर मात करत त्या विजयी झाल्या होत्या. राम सातपुते (Ram Satpute) हे माळशिरसचे आमदार आहेत. त्या भागातील दिग्गज नेते विजयसिंह मोहिते पाटील यांच्यामुळे सातपुते यांचा विजय सोपा झाला होता. आता परिस्थिती बदलली आहे.
धैर्यशील मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला आहे. ते माढा मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवणार आहेत. यापूर्वीच्या दोन्ही खासदारांनी लक्ष वेधून घेणारी कामगिरी न करणे, सोलापूर शहरातील भाजपमधील गटबाजी आणि मोहिते पाटील कुटुंबीय सोबत नसणे, या समस्यांवर मात करण्यात राम सातपुते यशस्वी होतात किंवा नाही, यावर बरीच गणिते अवलंबून आहेत. कष्टकऱ्यांसाठी आशिया खंडातील सर्वात मोठा गृहप्रकल्प साकारणारे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांनी प्रणिती यांनी जाहीर केला आहे.
2004 च्या निवडणुकीत प्रणिती शिंदे यांच्या मातुःश्री उज्ज्वलाताई यांना सोलापूर लोकसभा मतदारसंघात पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर सुशीलकुमार शिंदे यांच्या राजकीय कारकीर्दीला उतरती कळा लागली. असे असले तरी सुशीलकुमार शिंदे यांनी या मतदारसंघातून 2009 च्या निवडणुकीत विजय मिळवला.
2014 आणि 2019 अशा सलग दोन निवडणुकांत शिंदे यांचा पराभव झाला. निवडणुकीच्या राजकारणातून संन्यास घेणार असल्याची घोषणा सुशीलकुमार शिंदे यांनी केली होती. वडिलांचा पराभव होत असताना कन्या प्रणिती या सलग तीन वेळा सोलापूर शहर मध्य मतदारसंघातून विजयी झाल्या. त्यामुळे सक्षम उमेदवार म्हणून लोकसभा मतदारसंघातून प्रणिती शिंदे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले होते. त्यानुसार त्या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत.
असे म्हटले जाते की संमिश्र संस्कृतीचे उत्तम उदाहरण असलेल्या सोलापूरच्या नागरिकांना उन्माद आवडत नाही. अगदी पहिल्या दिवसापासून बाहेरचा उमेदवार असा शिक्का बसलेल्या आमदार सातपुते यांनी नेमकी हीच चूक केल्याची चर्चा सोलापूरकरांमध्ये आहे. आमदार प्रणिती शिंदे यांची हिंदू मतदारांमध्येही चांगली प्रतिमा आणि पोहोच आहे, त्यांना हिंदू मतदारांचाही मोठा पाठिंबा असतो, हे सातपुते यांना माहीत नसावे.
गेल्या दोन विधानसभा निवडणुकांमध्ये एआयएमच्या उमेदवारांनी प्रणिती यांच्यासमोर कडवे आव्हान उभे केले होते, तरीही त्या निवडून आल्या. हे कशामुळे साध्य झाले, याचा अभ्यास आमदार सातपुते यांनी करायला हवा होता. तो न केल्यामुळेच त्यांनी प्रचारात प्रणिती शिंदे समोर आल्यानंतर घोषणाबाजी केली.
सोलापूरकरांना ही बाब आवडलेली नाही, अशी चर्चा सुरू आहे. सातपुते यांचा मूळ पिंड कार्यकर्त्यांचा आहे, त्यामुळे असे झाले असावे. स्थानिक विकासाच्या मुद्द्यांना बगल देत ही निवडणूक नरेंद्र मोदींविरुद्ध राहुल गांधी अशी आहे, असा प्रचार भाजपकडून राज्यभरात केला जात आहे. त्याला सोलापूर मतदारसंघ आणि सातपुतेही अपवाद नाहीत.
सोलापूर लोकसभा मतदारसंघात मोहोळ, सोलापूर उत्तर, सोलापूर मध्य, सोलापूर दक्षिण, मंगळवेढा, अक्कलकोट या विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. सोलापूर मध्य वगळता उर्वरित ठिकाणी महायुतीचे आमदार आहेत. त्यामुळे कागदोपत्री महायुतीची बाजू भक्कम वाटते, मात्र भाजपच्या सलग दोन खासदारांची निष्क्रीयता महायुतीसाठी अडचणीची ठरत आहे. शिवाय सोलापूर जिल्ह्यात काही दिवसांपासून राजकीय घडामोडी वाढल्या आहेत.
अकलूजचे मोहिते पाटील घराणे शरद पवार यांच्यासोबत गेले आहे. ही बाब महाविकास आघाडीसाठी दिलासादायक ठरत आहे. महापालिका, राज्य आणि केंद्रात भाजपची सत्ता असूनही नगरसेवक, आमदार आणि खासदारांना सोलापूरच्या विकासासाठी भरीव काम करता आलेले नाही, अशीही जनभावना आहे. निकाल काय लागणार यासाठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे. तोपर्यंत सिद्धेश्वर कारखान्याची चिमणी, मोहिते पाटील यांची घरवापसी, निष्क्रीय खासदार आणि नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान करणे..या मुद्द्यांनी सोलापुरात आपले स्वागत होत आहे.
Edited by: Mangesh Mahale
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.