Tuljapur News : ग्रामीण भागात रोजागार आणि रोजगाराभिमुख अभ्यासक्रमांची समस्या आहे. ती दूर करण्याचा प्रयत्न महायुती सरकारकडून सुरू झाला आहे. याअंतर्गतच आता महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेच्या तुळजापूरनगरीत कौशल्य विकास विद्यापीठाची उभारणी केली जाणार आहे. यासाठी पुण्यातील सिम्बॉयोसीस कौशल्य आणि व्यावसायिक विद्यापीठाचे सहकार्य लाभणार आहे. तुळजाभवानी मंदिर ट्रस्टच्या तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालयात महिनाभरात 'जावा'सारखे अल्पमुदतीचे रोजगाराभिमुख कौशल्य अभ्यासक्रम सुरू होणार आहेत.
धाराशिव जिल्ह्याचा विकास झाला नाही, अशी ओरड सातत्याने होत असते. पाण्याचे शाश्वत स्त्रोत नसल्याने विकासाला खीळ बसली होती. असे असले तरी शेतीसाठी पाणी उपलब्ध झाल्यामुळे उसाचे क्षेत्र वाढले आहे. कारखान्यांची संख्याही वाढली आहे. एखाद्या जिल्ह्याचा विकास व्हायचा असेल तर मूलभूत सुविधा गरजेच्या असतात. त्यात पाणी, रेल्वेमार्ग, विमानसेवा आणि कुशल मनुष्यबळाचा समावेश आहे. धाराशिवला रेल्वे आली आहे. विमानतळही आहे, मात्र कार्गोसाठी ते विकसित करावे लागणार आहे. सोलापूर-तुळजापूर रेल्वेमार्गाचे कामही वेगात सुरू आहे.
धाराशिव जिल्ह्यात वर्षातील 300 दिवस लख्ख सू्र्यप्रकाश असतो. त्यामुळे सौरऊर्जा निर्मितीला मोठी संधी आहे. सौरऊर्जा, पवनऊर्जा निर्मितीच्या अनेक कंपन्यांनी जिल्ह्यात प्रकल्प सुरू केले आहेत. टेक्सटाइल उत्पादन, कृषिपूरक उद्योग, पर्यटनवाढीलाही जिल्ह्यात मोठा वाव आहे. या पार्श्वभूमीवर कौशल्य विकास विद्यापीठाची उभारणी जिल्ह्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. हा विचार करूनच तुळजापुरात कौशल्य विकास विद्यापीठाची उभारणी करण्यात येणार आहे, अशी माहिती तुळजापूरचे भाजपचे(BJP) आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली.
विद्यापीठ उभारणीच्या अनुषंगाने पथकाने पुणे येथील सिम्बॉयोसीस कोशल्य आणि विकास विद्यापीठाचा दौरा केला आहे. या विद्यापीठाच्या प्र-कुलगुरू डॉ. स्वाती मुझुमदार यांनी उपक्रमांची माहिती दिली. कौशल्य विकास अभ्यासक्रम, त्यांची रूपरेषा याचे सादरीकरण करण्यात आले. त्यानंतर कौशल्य विद्यापीठाचा मास्टरप्लॅन ठरवण्यात आला आहे. सिम्बॉयोसीस कौशल्य विद्यापीठ आणि तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय यांच्यात लवकरच सामंजस्य करारावर स्वाक्षरी होईल, असेही आमदार पाटील(Ranajagjitsinha Patil) यांनी सांगितले.
विविध प्रकल्प, योजनांच्या माध्यमातून जिल्ह्यात 35 हजार रोजगारनिर्मिती करण्याचे उद्दिष्ट आहे. सौरऊर्जा, पवनऊर्जी निर्मिती प्रकल्पांचा जिल्ह्याकडे असलेला ओढा पाहता पुढील एक-दोन वर्षांत कुशल मनुष्यबळाची मोठी गरज भासणार आहे. त्यादृष्टीने कौशल्य विद्यापीठ अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. हा विचार करूनच कौशल्य विद्यापीठाच्या उभारणीची संकल्पना आमदार पाटील यांनी मांडली होती. कृषी व्यवसाय, पर्यटन, अपारंपरिक ऊर्जा आदी पदविका आणि प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहेत.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.