
Municipal Corporation News : भाजपचे आमदार प्रशांत बंब यांनी काही दिवसांपूर्वी अचानक महापालिकेत धडक देत प्रशासक जी. श्रीकांत यांच्या गैर कारभारावर ताशेरे ओढले होते. चार महिन्यापासून माहिती मागूनही ती देण्यास टाळाटाळ केली जात असून ते त्यांना दिलेल्या अधिकारांचा गैरवापर करत असल्याचा आरोप केला होता.
तसेच आयुक्तासह काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या दालन आणि निवासस्थान दुरूस्तीवर लाखो रूपयांची उधळपट्टी करण्यात आल्याचा गंभीर आरोप केला होता. चार तास ठिय्या दिल्यानंतरही आमदार बंब (Prashant Bamb) यांना तेव्हा माहिती मिळाली नव्हती. अखेर महापालिकेकडून बंब यांना त्यांना हवी असलेली माहिती व त्याच्या प्रती दिल्या. मात्र त्यानंतरही बंब यांची नाराजी कायम असल्याचे समोर आले आहे.
महापालिकेने (Municipal Corporation) माहितीच्या अधिकारात उपलब्ध करून दिलेल्या कॅशबुकच्या प्रतीबद्दल त्यांनी आक्षेप घेतला. उपलब्ध करून देण्यात आलेली प्रत प्रमाणित नसून, येत्या तीन दिवसांत प्रमाणित प्रत उपलब्ध करून देण्याची मागणी त्यांनी केली. महापालिकेतर्फे माहितीच्या अधिकारात चार महिन्यांपासून माहिती मिळत नसल्याचा आरोप करत आमदार प्रशांत बंब यांनी गेल्या महिन्यात महापालिकेत सहा तास ठिय्या दिला होता. त्यावेळी आश्वासनावर प्रशासनाने त्यांची बोळवण केली होती.
दरम्यान, 17 जानेवारीला महापालिका प्रशासनाने त्यांना कॅशबुकच्या संदर्भात माहिती दिली. पण ही माहिती परिपूर्ण आणि प्रमाणित नसल्याचा आक्षेप बंब यांनी घेतला. याबद्दल त्यांनी आयुक्तांना पत्र दिले असून त्यात नमूद केले की, महापालिकेने जनरल कॅशबुकची प्रत दिली. ज्यावर कॅशबुकची बांधणी करण्यात आलेली नाही. कॅशबुकमध्ये क्रमांक नोंदवण्यात आलेले नाहीत.
नियमानुसार कॅशबुक हे हस्तलिखित स्वरूपात असतात आणि ते शासनाने निर्गमित केलेल्या नमुन्यातच असले पाहिजेत. कॅशबूकमध्ये दिवसनिहाय व देयकनिहाय नोंदणी केली जाते. पण, आपणाकडून देण्यात आलेले कॅशबुक छापील आहे. छापील कॅशबुक जेव्हा दिले जाते तेव्हा त्यावर डिजिटल स्वाक्षरी असणे अनिवार्य आहे. पण, उपलब्ध करून देण्यात आलेल्या कॅशबुकवर ‘चीफ अकाउंटस् आणि फायनान्स ऑफिसर डेप्युटी कमिश्नर म्युनिसिपल कॉर्पोरेशन’ अशा शिक्क्यावर स्वाक्षरी आहे.
पण, ती दिनांकाशिवाय असून सर्व प्रकारच्या हेड ऑफ अकाउंट्सबाबतीची सविस्तर माहितीदेखील आठ दिवसांत द्यावी, अशी मागणी आमदार बंब यांनी पत्राद्वारे महापालिकेला केली आहे. बंब यांनी तांत्रिक मुद्दे उपस्थित करत महापालिकेची चांगलीच कोंडी केली आहे. आता तीन दिवसानंतर महापालिकेतील अधिकारी बंब यांना विहित नमुन्यात माहिती देतात का? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.