Balasaheb Thorat-Ravindra Dhangekar Sarkarnama
विश्लेषण

Kasba By Election Result : आम्ही भाजपचा दुसरा बालेकिल्ला उद्‌ध्वस्त केला : धंगेकरांच्या विजयानंतर थोरातांची प्रतिक्रिया

सत्ताधारी पक्षाने विजयासाठी सर्व गैरमार्गाचा वापर करुनही कसबा पेठेत जनशक्तीने महाशक्तीच्या धनशक्तीचा पराभव करून इतिहास घडवला आहे.

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : कसबा पेठ पोटनिवडणुकीत (By Election) काँग्रेसने (Congress) तब्बल २८ वर्षांनंतर रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांच्या माध्यामातून विजय मिळविला आहे. या विजयानंतर विधीमंडळ काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांची प्रतिक्रिया आली आहे. त्यांनी म्हटले आहे की, नुकत्याच झालेल्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीतही नागपूर ह्या भाजपच्या बालेकिल्ल्यातही काँग्रेसने विजय मिळविला होता. त्याअगोदर विधान परिषद, जिल्हा परिषद निवडणुकांतही भाजपाचा पराभव केला होता. आज कसबा या भाजपच्या दुसऱ्या बालेकिल्ल्यातही महाविकास आघाडीने मोठा विजय मिळवला आहे. (Reaction of Congress leader Balasaheb Thorat after victory in Kasba Peth)

कसब्यात काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी भारतीय जनता पक्षाचे हेमंत रासने यांचा पराभव केला आहे. तब्बल २८ वर्षांनंतर या मतदारसंघात भाजपचा पराभव झाला आहे. त्या विजयानंतर माजी मंत्री थोरात बोलत होते.

ते म्हणाले की, कसबा पेठ पोटनिवडणुकीतील महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांचा विजय खूप बोलका आहे. हा विजय राज्यातील व देशातील जनता बदलाच्या दिशेने विचार करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. सत्ताधारी पक्षाने विजयासाठी सर्व गैरमार्गाचा वापर करुनही कसबा पेठेत जनशक्तीने महाशक्तीच्या धनशक्तीचा पराभव करून इतिहास घडवला आहे.

कसबा मतदारसंघात मागील तीन-चार निवडणुकीत भाजपाचा उमेदवार निवडून येत असे. पण यावेळी चित्र बदलले आहे. भाजपच्या राजकारणाला जनता कंटाळली आहे. महागाई प्रचंड वाढलेली आहे, तरुण मुले नोकरीच्या प्रतिक्षेत आहेत पण बेरोजगारीमुळे नोकरी मिळत नाही. भाजपाच्या धोरणांमुळे छोटे व्यापारी त्रस्त आहेत, शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळत नाही. सुशिक्षित, मध्यमवर्गीय जनताही भाजपासून दूर जात आहे. नुकत्याच झालेल्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीतही भाजपाच्या उमेदवारांचा महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी पराभव केला आहे, असेही थोरात यांनी नमूद केले.

कसबा पोटनिडणूक महाविकास आघाडीने एकत्र येऊन लढली व ती विजयी करुन दाखवली. चिंचवडमध्येही महाविकास आघाडीच्या उमेदवाराला विजय मिळाला असता पण तेथे आम्ही कमी पडलो. पण एकूण चित्र पाहता जनतेमध्ये भाजप तसेच शिंदे-फडणवीस सरकारविरोधात प्रचंड असंतोष आहे, हे प्रचारवेळीही दिसले होते, हेच चित्र पुढेही कायम राहिल व राज्यात तसेच केंद्रात बदल झालेला दिसेल, असा आशावाद बाळासाहेब थोरात यांनी बोलून दाखवला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT