Abhishek Banerjee and Mamata Banerjee  Sarkarnama
विश्लेषण

तृणमूलमध्ये फूट? ममता बॅनर्जी अन् भाचा अभिषेक आमनेसामने

पश्चिम बंगालमध्ये (West Bengal) सत्ताधारी तृणमूल काँग्रेसमधील (TMC) मतभेद चव्हाट्यावर आले आहेत.

सरकारनामा ब्युरो

कोलकता : पश्चिम बंगालमध्ये (West Bengal) सत्ताधारी तृणमूल काँग्रेसमधील (TMC) मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. पक्षाच्या प्रमुख व मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) आणि त्यांचे भाचे अभिषेक बॅनर्जी (Abhishek Banerjee) यांच्यात वाद सुरू झाल्याचे समोर येत आहे. अभिषेक हे तृणमूलचे राष्ट्रीय सरचिटणीस आहेत. या पार्श्वभूमीवर पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांची ममतांनी आज तडकाफडकी बैठक बोलावली आहे. या घडामोडींमुळे बंगालमधील राजकीय वातावरण तापले आहे.

एक व्यक्ती, एक पद या धोरणाचा आग्रह अभिषेक बॅनर्जी यांनी धरला आहे. पक्षात ममतांनंतर अभिषेक हे दुसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यांच्या या धोरणाला पक्षाच्या जुन्या नेत्यांचा विरोध आहे. काही जणांच्या मते, ममता आणि त्यांचे अतिशय महत्वकांक्षी भाचे अभिषेक यांच्यातील संघर्ष वाढू लागल्याची ही चिन्हे आहेत. पक्षांतर्गत हा वाद वाढू लागताच ममतांनी तातडीने पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक आज बोलावली आहे. या बैठकीकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. या बैठकीत ममता या अभिषेक यांच्याबाबत मोठा निर्णय घेतील, अशी चर्चा सुरू आहे.

ममतांनी नुकताच उत्तर प्रदेशचा दौरा केला. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्या प्रचारासाठी हा दौरा होता. त्यावेळी ममतांना गोव्यातील प्रचाराबाबत प्रश्न विचारण्यात आला. गोव्यात कुणीतरी प्रचार करीत असताना मी जाणार नाही. मी दुसरीकडे जाईन. यातून सगळ्यांचे हित साधले जाईल, असे टिप्पणी ममतांनी केली होती. त्यांनी अभिषेक यांचा उल्लेख कुणीतरी असा केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. यानंतर आता काही दिवसांतच तृणमूलमधील वाद उफाळून आला आहे.

दरम्यान, राज्यात आगामी 111 महापालिका आणि नगरपालिका निवडणुकांमुळे राजकीय वातावरण तापले आहे. या निवडणुकांबाबत अभिषेक बॅनर्जी आणि प्रशांत किशोर यांनी रणनीती आखली होती. जास्तीत जास्त तरुण चेहऱ्यांना संधी देण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता. पक्षात नेत्यांची तरुण फळी तयार व्हावी, हा उद्देश ठेवून त्यांनी हे धोरण आखले होते. यासाठी या दोघांनी काही तरुण चेहरेही हेरून ठेवले होते. या प्रस्तावावर फक्त ममता बॅनर्जी यांच्याकडून शिक्कामोर्तब होणे बाकी होते.

ममतांसमोर हा प्रस्ताव गेल्यानंतर त्यांनी त्याला केराची टोपली दाखवली होती. त्यांनी तरुण चेहऱ्यांना संधी देण्याऐवजी निवडून येण्याची क्षमता असलेल्या जुन्या नेत्यांनाच संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी भाचे अभिषेक आणि किशोर यांना बाजूला करीत पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी दिलेल्या शिफारशी आणि त्यांनी सुचवलेली नावे यावर विचार होईल, अशी भूमिका घेतली आहे. पक्षात ममतांच्या नंतर अभिषेक हे दुसऱ्या क्रमांकावर आहेत आणि किशोर यांचे पक्षातील महत्वही अनन्यसाधारण आहे. असे असताना ममतांनी त्यांना डावलल्याचे समोर येत आहे. एकप्रकारे ममतांनी या दोघांचे पंख छाटल्याची चर्चा सुरू आहे.

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत (Assembly Election) ऐतिहासिक विजय मिळवत ममता बॅनर्जी यांनी सत्ता मिळवली. या निवडणुकीत भाजपने प्रतिष्ठा पणाला लावली होती. ममतांनी विधानसभा निवडणुकीत एकहाती विजय मिळत विरोधकांना धूळ चारली होती. त्यानंतर पश्चिम बंगालमध्ये पुन्हा एकदा तृणमूल काँग्रेसने बाजी मारत नुकताच कोलकता महापालिकेत मोठा विजय मिळवला आहे. त्यामुळे आता आगामी महापालिका आणि नगरपालिका निवडणुकांकडे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT