Dharashiv Lok Sabha Constituency 2024 Sarkarnama
विश्लेषण

Dharashiv News: रोहन देशमुखांना खरेच लढायचे की पुन्हा कुणाचा 'गेम'करायचा आहे..?

अय्यूब कादरी

Solapur : सोलापूर दक्षिणचे भारतीय जनता पक्षाचे आमदार सुभाष देशमुख यांचे पुत्र रोहन देशमुख यांनी 2014 च्या लोकसभा निवडणुकीत धाराशिव मतदारसंघातील शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार प्रा. रवींद्र गायकवाड यांच्याविरोधात अपक्ष म्हणून दंड थोपटले होते. मला मत म्हणजे नरेंद्र मोदींनाच मत असा प्रचार त्यावेळी देशमुख यांनी केला होता. त्यावेळी त्यांना जवळपास 30 हजार मतांवर समाधान मानावे लागले होते. आता पुन्हा ते या मतदारसंघातून इच्छुक आहेत. त्यांचा उल्लेख भावी खासदार असा करत धाराशिव शहरात बॅनर झळकले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

धाराशिव तालुक्यातील पोहनेर हे सुभाष देशमुख यांचे मूळ गाव. उद्योग, व्यवसायानिमित्त ते सोलापूरला स्थायिक झाले. माकणीजवळ (ता. लोहारा, जि. धाराशिव) त्यांनी त्यांच्या लोकमंगल समूहामार्फत साखर कारखान्याची उभारणी केली आहे. सुरुवातीच्या काळात माजीमंत्री डॉ. पद्मसिंह पाटील यांच्याशी त्यांची जवळीक होती. त्या काळात त्यांनी उद्योग, व्यवसायात जम बसवला. भाजपमध्ये आता ते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे निकटवर्तीय समजले जातात. सोलापुरात आमदार विजयकुमार देशमुख आणि आमदार सुभाष देशमुख यांच्यात या गटातटाच्या राजकारणाची सातत्याने चर्चा सुरू असते. त्यामुळे सोलापुरचा विकास रखडल्याची ओरड नित्याचीच झाली आहे.

2009 च्या निवडणुकीत युतीचे प्रा. रवींद्र गायकवाड आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉ. पद्मसिंह पाटील यांच्यात अटीतटीची लढत झाली होती. डॉ. पाटील यांचा 6787 मतांनी विजय झाला होता. धाराशिव मतदारसंघात सोलापूर जिल्ह्यातील बार्शी आणि लातूर जिल्ह्यातील औसा विधानसभा मतदारसघांचा समावेश आहे. बार्शी वगळता जवळपास सर्व विधानसभा मंतदारसंघात डॉ. पाटील पिछाडीवर होते. बार्शी तालुक्याने डॉ. पाटील यांना जवळपास 51 हजारांचे मताधिक्क्य दिले होते. त्याच्या बळावरच डॉ. पाटील निवडून आले होते.

बार्शी तालुक्यात माजी मंत्री दिलीप सोपल आणि आमदार राजेंद्र राऊत यांचे राजकीय वैर सर्वश्रुत आहे. असे असतानाही त्या दोघांची स्वतंत्र यंत्रणा डॉ. पाटील यांच्यासाठी कामाला लागली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यामुळे ही किमया साधली गेली होती. राऊत यांच्या विरोधात पुढील निवडणुकीत बार्शी मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार असणार नाही, असे आश्वासन पवार यांनी दिले होते. ते त्यांनी पाळले, मात्र सोपल हे 'रिडालोस'च्या उमेदवारीवर कप बशीच्या चिन्हावर विजयी झाले होते.

2014 ला मात्र परिस्थिती बदलली होती. नरेंद्र मोदी यांची लाट धाराशिव मतदारसंघातही होती. असे असतानाही भाजपच्या सुभाष देशमुख यांचे पुत्र रोहन देशमुख हे अपक्ष म्हणून रिंगणात उतरले होते. मतविभागणी व्हावी, यासाठी त्यांना डॉ. पद्मसिंह पाटील यांनीच उभे केल्याची चर्चा त्यावेळी रंगली होती, मात्र त्यात तथ्य किती होते, हे समोर आले नाही. मला मत म्हणजे नरेंद्र मोदी यांनाच मत, असा प्रचार रोहन देशमुख यांनी सुरू केला होता. त्यामुळे प्रा. गायकवाड यांच्या मतांची विभागणी करण्याचा त्यांचा हेतू होता, अशी चर्चा त्यावेळी उघडपणे सुरू झाल होती. हे लक्षात आल्यामुळे त्यांनी शेवटच्या टप्प्यात डॉ. पाटील यांच्यावर टीका सुरू केली होती. त्या निवडणुकीत प्रा. गायकवाड हे 2 लाख 34 हजार 325 मतांनी विजयी झाले होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात गोपीनाथ मुंडे यांनी प्रा. गायकवाड यांच्यासाठी कळंब येथे जाहीर सभा घेतली होती. भाजप प्रा. गायकवाड यांच्या पाठिशी उभी असल्याचे त्यांना तेथे जाहीर करावे लागले होते. पक्षविरोधी कारवाया केल्याबद्दल रोहन देशमुख यांची भाजपमधून हकालपट्टी केल्याची घोषणा त्या सभेत मुंडे यांनी केली होती. रोहन देशमुख यांची उमेदवारी आणि भाजपचा काहीही संबंध नाही, असे त्यांनी त्या सभेत भाजपच्या तत्कालीन जिल्ह्याध्यक्षांना उभे करून त्यांच्याकडून वदवून घेतले होते. निवडणूक निकाल लागल्यानंतर काही महिन्यांनी गोपीनाथ मुंडे यांचे निधन झाले. ते हयात असते तर देशमुख पिता-पुत्रांची भाजपमधील कारकीर्द संकटात सापडली असती. 2014 चा अनुभव पाहता आता देशमुखांना खरेच निवडणूक लढवायची आहे की आणखी कुणाचा 'गेम' करण्याची त्यांची इच्छा आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Edited by: Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT