राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला या विजयादशमीला १०० वर्षे पूर्ण होणार आहेत. भाजपचे कार्यकर्ते याला जनसंपर्काची संधी मानत आहेत.
संघाच्या माध्यमातून इच्छुक उमेदवारी मिळविण्यासाठी प्रयत्नशील असून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.
संघाचा वैचारिक विस्तार आणि राजकीय वापर यावर टीका वाढली असून स्वामी गोविंददेव गिरी महाराजांनी ‘आयात नेत्यां’वर खुला प्रहार केला आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला या विजयादशमीला १०० वर्षे पूर्ण होणार आहेत. योगायोगाने यंदा विजयादशमी ही २ ऑक्टोबर रोजी म्हणजे महात्मा गांधी जयंतीलाच आली आहे. महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांसाठी इच्छुक कार्यकर्त्यांचा त्यामागे ‘जनसंपर्क’ हाच एक छुपा हेतू असणे स्वाभाविक आहेच. संघाच्या कामात असल्यानंतर संघाच्या संपर्कामुळे आगामी निवडणुकीत मदत होईल, उमेदवारी मिळविण्यात अडचणी येणार नाहीत असे इच्छुकांना वाटत आहेत. त्यामुळे संघाच्या कामाकडे एक नामी संधी म्हणून भाजप कार्यकर्ते पाहत आहेत.
महापालिका, जिल्हा परिषद निवडणुका येत्या काही महिन्यांत होणार आहेत. यासाठी पक्षांची तयारी सुरू झाली आहेच. प्रभाग रचना अंतिम झाली नसली तरी इच्छुकांनीही कंबर कसली आहे. त्यातच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला यंदा विजयादशमीला १०० वर्ष पूर्ण होत आहेत. त्यासाठी राज्यभर तयारी सुरू असताना भाजपतर्फे निवडणूक लढविण्यास इच्छुक कार्यकर्त्यांनी या शतकपूर्तीचे निमित्त साधून संघाच्या माध्यमातूनही अप्रत्यक्ष ‘फिल्डिंग’ लावणे सुरू केले आहे. बैठकांना उपस्थिती, गृहभेटी उपक्रमासाठी नियोजन करण्यात भाजपचे कार्यकर्ते ताकदीनिशी उतरले आहेत.
सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला चार महिन्यांच्या आत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे काही ठिकाणी सहा वर्षांपासून तर काही ठिकाणी तीन वर्षांपासून ठप्प असलेली निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. राज्य सरकारने मुंबई महापालिका वगळता उर्वरित २९ महापालिकांसाठी चार सदस्यांचा प्रभाग तयार करण्याचे आदेश दिले आहेत. जिल्हा परिषदेची गटरचना अंतिम करण्यासाठीची प्रक्रिया सुरू आहे. तर महापालिकांच्या प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा राज्य शासनाच्या नगरविकास विभागाकडे सादर झाला आहे.
तो तेथून आता निवडणूक आयोगाकडे जाईल. २२ ते २९ ऑगस्ट या कालावधीत प्रारूप प्रभागरचना जाहीर करून त्यावर हरकती सूचना मागविल्या जाणार आहेत. त्यावर सुनावणी घेतल्यानंतर याचा अहवाल पुन्हा राज्य सरकारला सादर केला जाईल आणि ३ ते ६ ऑक्टोबर या कालावधीत निवडणूक आयोगाकडून अंतिम प्रभाग रचना जाहीर होणार आहे. कोणता प्रभाग कसा झाला आहे, हे स्पष्ट होणार असले तरी आरक्षणाची सोडत निघाल्यानंतर कोण कोणत्या प्रभागातून निवडणूक लढणार?
स्वतः लढणार की पत्नीला निवडणुकीच्या रिंगणात उतरविणार हे स्पष्ट होणार आहे. त्यामुळे निवडणुकीतील इच्छुकांनी सध्या विविध कार्यक्रम आयोजित करणे, नुकत्याच झालेल्या दहीहंडी उत्सवात भाजपमधील इच्छुकांनी जोरदार ‘फ्लेक्सबाजी’ करून स्वतःचे नाव मतदारांपर्यंत पोचविण्याचा प्रयत्न केला आहे. गणेशोत्सवातही नागरिकांच्या भेटीगाठीसाठी प्रयत्न केले जातील.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला विजयादशमीच्या दिवशी १०० वर्षे पूर्ण होणार आहेत. योगायोगाने यंदा विजयादशमी ही २ ऑक्टोबर रोजी म्हणजे महात्मा गांधी जयंतीच्या दिवशीच आलेली आहे. त्यामुळे काँग्रेस व अन्य विरोधी पक्षाकडून संघ व भाजपवर टीकेची झोड उठवली जाणारच. तसेच संघाकडून शतकपूर्तीच्या कार्यक्रम करताना या दिवशीचे कार्यक्रम ऐतिहासिक व्हावेत यासाठी प्रयत्न केला जाणार.
२ ऑक्टोबरपासून पुढे वर्षभर राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे गृह संपर्क, प्रतिष्ठित व प्रभावशील व्यक्तींच्या गाठीभेटी, गाव, तालुका पातळीपासून ते महानगरांमध्ये हिंदी संमेलनांचे आयोजन करणे आणि शाखा विस्तारासारख्या विषयांवर भर दिला जाणार आहे. यासाठीच्या बैठकांना सुरुवात झाली आहे. यामध्ये संघाचे स्वयंसेवक असलेले भाजपचे कार्यकर्ते पूर्ण ताकदीनिशी उतरले आहेत.
भाग व नगर स्तरावर होणाऱ्या बैठकांमध्ये त्यांची उपस्थिती आहेत. शतकपूर्तीच्या कार्यक्रमांची रूपरेषा कशी असावी, काय केले पाहिजे हे ते ठरवत आहेत. ‘आम्ही भाजपचे कार्यकर्ते म्हणून नाही तर संघ स्वयंसेवक म्हणून शतकपूर्तीच्या उत्सवात उत्स्फूर्तपणे सहभागी झाला आहोत,’ असे त्यांच्याकडून सांगितले जात आहे. हे बरोबर असले तरी राजकीय कार्यकर्त्यांचा त्यामागे जनसंपर्क हाच एक छुपा ‘अजेंडा’ असणे स्वाभाविक आहेच.
संघाच्या कामात असल्यानंतर त्या भागातील संघाच्या पदाधिकाऱ्यांसोबत येणाऱ्या संपर्कामुळे आगामी निवडणुकीत मदत होईल, उमेदवारी मिळविण्यात अडचणी येणार नाहीत असे इच्छुकांना वाटत आहेत. त्यामुळे संघाच्या कामाला नकार तर सोडाच पण ती एक नामी संधी असल्याचे भाजप कार्यकर्ते मानत आहेत.
आगामी काळात संघाने निश्चित केलेले कुटुंब प्रबोधन, सामाजिक समरसता, पर्यावरण जागृती, स्वबोध आणि नागरी कर्तव्य या पंचपरिवर्तनाचा संदेश गावोगावी, घरोघरी पोचविला जाणार आहे. यात स्वयंसेवकांची मोठी फौज उतरणार असताना यात भाजपच्या कार्यकर्त्यांचा मोठा सहभाग असणार आहे.
भाजपने राज्यात पक्ष विस्तार करण्यासाठी म्हणून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसमधील मातब्बर नेत्यांना फोडून भाजपमध्ये प्रवेश दिला. या मातब्बर नेत्यांचे आयुष्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका करण्यात गेले. वेळ प्रसंगी ‘हाफ चड्डीवाले’ म्हणून त्यांची टिंगलटवाळीही करण्यात आली. हेच नेते, स्थानिक पातळीवरच कार्यकर्ते संघाच्या संचलनात पूर्ण गणवेशात उपस्थित राहतात, संघाच्या पदाधिकाऱ्यांसोबत सलगी निर्माण करतात असे चित्र समाजामध्ये दिसते. संघाच्या गणवेश म्हणजे पांढरा शर्ट, अर्धी चड्डी हे समीकरण ठरलेले होते.
काळाच्या बदलत्या प्रवाहात, तरुण पिढीला आकर्षित करण्यासाठी संघाने मार्च २०१६ मध्ये नागपूर येथील अखिल भारतीय प्रतिनिधी सभेत खाकी अर्ध्या चड्डीऐवजी खाकी विजारीचा समावेश करण्याचा निर्णय घेतला. आधुनिकतेशी सुसंगत राहण्यास चड्डीमुळे संघावर होणारी उपहासात्मक टीका टाळण्यासाठी हा निर्णय घेतला. तरुणांना आकर्षित करण्यासाठीही हा निर्णय महत्त्वाचा मानला गेला. हा निर्णय घेऊन नऊ वर्ष होऊन गेली.
संघात तरुणांची संख्या वाढली असली तरी हौश्यानवश्यांचेही प्रमाण वाढले आहे. भाजपच्या प्रदेश कार्यालयात पक्ष प्रवेशाचा उरूस कायम सुरू आहे. प्रत्येक आठवड्याला राज्याच्या विविध भागांतील पुढारी भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. ही मंडळी लगेच स्वतःला संघासोबत सोडत आहेत. चड्डीऐवजी विजार घालताना लाज वाटायचे कारण नाही, त्यामुळे संघाच्या कार्यक्रमात ही मंडळी गणवेशात वावरत आहे.
राजकीय लाभासाठी संघाला आपलेसे करणाऱ्यांना मानसन्मान मिळत आहे. यामुळे संघ स्वयंसेवक अस्वस्थ असले तरी त्याबाबत उघड कोणी तक्रार करत नाही. ही स्थिती असतानाच श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे कोषाध्यक्ष स्वामी गोंविददेव गिरी महाराज यांनी पुण्यातील एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात या आयात लोक येत असल्यामुळे जाहीरपणे फटकारले. ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पटला नाही, संघाची विचारसरणी आणि नैतिकता कशाशी खातात हे माहिती नाही अशा आयात लोकांमुळे संघ प्रदूषित होण्याची शक्यता आहे.
संघाच्या व्यापक कार्याबाबत आयात केलेली मंडळी काहीबाही बोलत असतात. संघाने सावध राहिले पाहिजे’, असे स्पष्ट मत गोविंददेव गिरी महाराजांनी नोंदविले. विशेष म्हणजे हा कार्यक्रम संघाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य भय्याजी जोशी यांच्या पुस्तक प्रकाशनाचा होता. त्यामुळे या व्यासपीठावर नोंदविलेले हे ठाम मत संघ आणि भाजपच्या नेत्यांना आत्मचिंतन करायला लावणारे आहे.
संघ स्वयंसेवकांची संख्या वाढत असली तरी, त्यातून संघाचा चुकीच्या पद्धतीने राजकीय वापर होत आहे. संघाचा विस्तार होताना वैचारिक बांधणीला धक्का पोचत असल्याचे दिसून येत आहे. संघाला १०० वर्षे पूर्ण होत असताना यातील चुकीच्या गोष्टींवरही चिंतन सुरू झाल्याने कदाचित ही सुधारणेची चाहूल असू शकेल.
भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण यांची निवड झाल्यानंतर राज्यभरातील शहराध्यक्ष, जिल्हाध्यक्षांची घोषणा करण्यात आली. त्यानंतर जिल्हाध्यक्ष व शहराध्यक्षांनी त्यांची कार्यकारिणी जाहीर करण्यास सुरवात केली आहे. आगामी निवडणुका लक्षात घेता कार्यकर्त्यांना पक्ष संघटनेत स्थान दिले जात आहे. पण अनेक जणांचे डोळे प्रदेशाच्या कार्यकारिणीकडे लागलेले आहेत.
महामंत्री, उपाध्यक्ष, चिटणीस, प्रवक्तेपद यासह अन्य पदावर वर्णी लागावी म्हणून कार्यकर्ते ‘फिल्डिंग’ लावत आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी त्यांची सुमारे २५० जणांची कार्यकारिणी जाहीर केली. त्यांची मुंबईत कार्यशाळा घेतल्यानंतर पुण्यात दोन दिवसीय शिबिर घेऊन आगामी निवडणुकीच्या दृष्टीने तयारी सुरु केली आहे.
पण भाजप प्रदेशाध्यक्षांकडून त्यांचा चमू अजूनही जाहीर करण्यात आलेला नाही. राज्यात महायुतीची सत्ता असली तरी त्यात भाजप अतिशय मजबूत स्थितीत आहे. पक्षाला चांगले दिवस असताना प्रदेश पातळीवर काम करण्याची सोन्यासारखी संधी सोडण्याची भाजपच्या नेत्यांची तयारी नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या दृष्टीने ही पदाधिकाऱ्यांची निवड महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुळे नव्या-जुन्या, निष्ठावान- आयात कार्यकर्त्यांची सांगड घालून प्रदेशाध्यक्षांकडून नवीन कार्यकारिणी कधी जाहीर करणार याकडे डोळे लागले आहेत.
आपण संघाचे कट्टर स्वयंसेवक आहोत हे दाखविण्यासाठी भाजपचे कार्यकर्ते, पदाधिकारी, अन्य पक्षांतून आलेले नेते प्रयत्न करत असतातच. पण निवडणुकीतही पक्षश्रेष्ठींकडे शब्द टाकावा, संघाच्या यंत्रणेतून ‘योग्य’ उमेदवार म्हणून नाव पुढे जावे यासाठी इच्छुक मंडळी प्रयत्न करत असतात. ग्रामीण भागात हे प्रमाण काहीसे कमी आहे. पण पुणे, नाशिक, ठाणे, मुंबई, नागपूर, छत्रपती संभाजीनगर यासह अन्य शहरी भागांत संघाच्या यंत्रणेचा वापर करण्याकडे पुढाऱ्यांचा कल असतो. भाजपतर्फे उमेदवार निवडीसाठी वेगवेगळ्या माध्यमातून सर्वेक्षण केले जातात. त्यात संघाच्या ‘शब्दा’ला विशेष महत्त्व असते.
राज्यात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत अनेक इच्छुकांनी संघाच्या पदाधिकाऱ्यांच्या गाठीभेटी करून आपले नाव पुढे रेटण्याचा प्रयत्न केला. तर पक्षांतर्गत विरोध असणाऱ्या विद्यमान आमदारांसह इच्छुकांच्या विरोधातही संघाच्या पदाधिकाऱ्यांकडे तक्रार करून यांना उमेदवारीपासून दूर ठेवा अशी मागणी केली गेली. संघाच्या पदाधिकाऱ्यांना होणाऱ्या या भेटी जाहीररीत्या होत नाहीत. त्यामुळे त्याची माहिती सर्वसामान्यांपर्यंत येत नाही. पण या गाठीभेटींचा उमेदवारीवर नक्कीच परिणाम होतो.
महापालिकेसाठी उमेदवारी मिळवताना संघाच्या महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांच्या नजरेत उमेदवार शिस्तीतील असणे आवश्यक असते. अशा वेळी आपले नाव कसे पुढे जाईल यासाठी इच्छुकांचा प्रयत्न असतो. पुणे महापालिकेत भाजपची सत्ता असताना संघातर्फे नगरसेवकांची बैठक घेऊन त्यांनी ‘संघ शिस्तीत’ काम करावे यासाठी सूचना केल्या होत्या.
अन्य शहरातही अशा पद्धतीच्या बैठक होतात. निवडणुकीत उमेदवारी निश्चित करताना काही ठिकाणी संघाची भूमिका महत्त्वाची ठरते अन् त्याचा फटका काही जणांना बसतो. अनेक वर्षांनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत असताना संघ आपल्याला उमेदवारी देईल असे इच्छुकांना वाटते. पण त्याचा प्रत्यक्षात किती प्रभाव पडतो हे संबंधितांना उमेदवारी मिळाल्यावरच स्पष्ट होईल.
Q1. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना कधी झाली?
➡ १९२५ मध्ये झाली असून यंदा १०० वर्षे पूर्ण होत आहेत.
Q2. भाजप कार्यकर्ते संघाच्या कार्यक्रमात का सहभागी होत आहेत?
➡ उमेदवारीसाठी जनसंपर्क साधणे आणि संघाशी जवळीक दाखवण्यासाठी.
Q3. संघाच्या शतकपूर्तीचे कार्यक्रम कधीपासून सुरू होणार आहेत?
➡ २ ऑक्टोबर २०२५ पासून पुढील एक वर्षभर विविध कार्यक्रम राबवले जातील.
Q4. संघाच्या राजकीय वापरावर कोणती टीका झाली?
➡ स्वामी गोविंददेव गिरी महाराजांनी ‘आयात लोकांमुळे संघ प्रदूषित होऊ शकतो’ अशी खुली टीका केली
(Edited by: Mangesh Mahale)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.