Vinay kore
Vinay kore sarkarnama
विश्लेषण

सत्तारुढ नेत्यांनी विश्वासघात केला; योग्यवेळी किंमत मोजावी लागेल : विनय कोरेंचा हल्लाबोल

सरकारनामा ब्यूरो

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसह सर्वसामान्य जनतेच्या विकासाचे केंद्र असणाऱ्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेत (kdcc bank) सर्वांनी राजकारण विसरून एकत्र यावे, अशी आमची अपेक्षा होती. मात्र, जिल्ह्यातील सत्तारुढ गटाच्या नेत्यांनी आमच्या अपेक्षांना विश्वासघाताचा सुरुंग लावला आहे, त्यामुळेच तीन जागांवर सत्तारुढ गटाचा पराभव झाला. सत्तारुढ आघाडीतील सर्व नेते प्रामाणिक राहिले असते, तर विरोधी आघाडीची एकही जागा निवडून आली नसती. हे जे पाप ज्यांच्या हातून घडले आहे, त्याला त्याची किंमत योग्यवेळी मोजावी लागेल. कोल्हापूर जिल्ह्यातील कार्यकर्ता, जनता हे विसरणार नाही, असा इशारा जनसुराज्य पक्षाचे अध्यक्ष, आमदार विनय कोरे (vinay kore) यांनी दिला. (Ruling party leaders betrayed : Criticism of Vinay Kore)

दरम्यान, आमदार कोरे यांचा हा इशारा सत्तारुढ गटाचे नेते, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांना अप्रत्यक्षपणे असल्याची चर्चा जिल्ह्यात सुरु झाली आहे. कोल्हापूर जिल्हा सहकारी बॅंकेच्या निकालानंतर कोरे यांनी माध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी त्यांनी सत्तारुढ नेत्यांवर हल्लाबोल केला.

कोल्हापूर जिल्हा बँकेची निवडणूक सत्तारुढ आघाडीतून आमदार कोरे यांच्यासह जनसुराज्य पक्षातील सर्जेराव पाटील (पेरीडकर) यांनी लढवली. यात सर्जेराव पाटील यांचा पराभव झाला. सत्तारुढ आघाडीच्या तीन उमेदवारांना पराभूत व्हावे लागले आहे. यामध्ये पतसंस्था गटातून आमदार प्रकाश आवाडे यांच्यासारख्या नेत्याचा पराभव झाला आहे, त्यामुळे उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर कोरे यांनी आपल्या मनातील खंत बोलून दाखवली.

आमदार कोरे म्हणाले की,‘‘कोल्हापूर जिल्हा बँकेच्या सर्व जागा सत्तारुढ आघाडीला मिळतील, अशी अपेक्षा आम्हाला होती. महिला, ओबीसी आणि मागासवर्गीय या जागांवर दोन हजार मतांनी सत्तारुढ गटांचे उमेदवार निवडून आले आहेत. या जागांवर सर्व संस्था मतदान करतात. सर्वसमावेशक सहकारातील कार्यकर्त्याला जो विचार आम्ही मांडला, त्याला यश आल्याचे दिसते. दुर्देवाने प्रक्रिया आणि पतसंस्था गटातून धक्कादायक निकाल आला आहे.''

"जिल्ह्यातील आघाडीचा तालुकास्थानी आम्ही संबंध जोडला नव्हता, त्यामुळे तालुक्यामधील लढाया होणार होत्या. ते आम्ही गृहीत धरले होते. त्यात माझे सहकारी सर्जेराव पाटील पराभूत झाले मात्र ते फारसे धक्कादायक नव्हते. पण, सत्तारुढ आघाडीच्या तीन उमेदवारांचा पराभव हा जिल्यातील नेत्यांच्या विश्वासघातामुळे झाला आहे. हे न समजण्याएवढे कोल्हापुरातील कार्यकर्ते अज्ञानी नाहीत. प्रत्येकाला विकासापेक्षा राजकारणातील गट-तट, मोठेपणा याला महत्व दिल्याचे स्पष्ट होते. ज्यांनी हे पाप केले आहे, त्यांना मात्र त्याची किंमत योग्यवेळी चुकवावी लागेल," असा इशाराही त्यांनी आघाडीच्या नेत्यांना दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT