Jayant Patil Sarkarnama
विश्लेषण

Jayant Patil : जयंत पाटलांचा गड ढासळतोय? त्यांच्याच जवळचा नेता भाजपमध्ये! हा योगायोग की महायुतीचा डाव?

BJP Vs Jayant Patil And Annasaheb Dange Joins bjp : सांगलीशी संबंधित दोन महत्त्वाच्या घटना एकाच दिवशी घडल्या. एक म्हणजे जयंत पाटील यांनी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि सायंकाळीच या पक्षातील एक ज्येष्ठ अन् दिग्गज नेत्याने भाजपच्या मार्गावर जाण्यासाठीचा मुहूर्त निश्चित केला. या मागचे नेमके गूढ काय, याचीच चर्चा सर्वत्र आहे.

चंद्रशेखर जोशी

थोडक्यात सारांश :

  1. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर भाजपमध्ये जाण्याच्या चर्चा सध्या जोमात असून, त्यामुळे त्यांच्या भवताल संशयाचं वातावरण निर्माण झालं आहे.

  2. त्यांच्या मतदारसंघातील अण्णासाहेब डांगे यांनी भाजपकडे वाटचाल केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.

  3. अनेक विश्वासू नेते पक्ष सोडत असून, जयंत पाटील यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

Sangli News : शेखर जोशी

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील भाजपमध्ये जाणार, अशा चर्चा रोज माध्यमांतून सुरू असतात. त्यामुळे जयंत पाटील यांच्याभोवतीचं संशयाचं भूत काही कमी होताना दिसत नाही. त्यातच या पक्षातील नेत्यांचे ‘आऊटगोईंग’ मोठ्या प्रमाणात सुरू झालं आहे. त्यांच्याच मतदारसंघातील अनेक दिग्गज नेते भाजपसह अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करताना दिसत आहेत. आतातर जयंत पाटील यांचे खंदे समर्थक मानले जाणारे जिल्ह्याचे माजी पालकमंत्रीच भाजपच्या वाटेवर निघाल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. यामुळे जिल्ह्यात अनेकांच्या भुवया उंचावल्या असून याप्रवेशा मागचे नेमके गूढ काय, याचीच चर्चा आता सर्वत्र होताना दिसत आहे. (Jayant Patil close supporter Dange leave NCP SP and join BJP)

खरे तर डांगे हे मूळचे संघ परिवारातले नेते. 2003 मध्ये त्यांनी भाजपचा त्याग करून राजकीय संन्यास घेतला आणि पुढे संन्यास मोडून ते पुन्हा राजकारणात सक्रीय झाले. त्यावेळी त्यांचा मोठ्या डौलात राष्ट्रवादीत प्रवास झाला. खरंतर भाजपने डांगे यांना मंत्री करून मोठी संधी दिली होती. मात्र भाजपची सत्ता गेल्यानंतर डांगे यांनीही पक्षाला रामराम करत राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्या वेळी भाजपमध्ये मुंडे-महाजन पर्व सुरू होते आणि पक्षनेतृत्वाशी मतभेद झाल्याने नाराजी व्यक्त करत डांगे यांनी भाजप सोडला होता.

भाजपने डांगेंना मोठे केलं आणि अण्णांनीही पक्षासाठी तळागाळापर्यंत काम केले. आता अण्णासाहेब डांगे यांनी वयाच्या नव्वदीत भाजपमध्ये जाण्याचा घेतलेला निर्णय हा सर्वसामान्यांबरोबरच भाजपच्या शीर्ष नेतृत्व आणि अन्य पक्षांनाही अचंबित करणारा आहे. राष्ट्रवादी प्रवेशाच्या वेळी अण्णासाहेब डांगे यांनी एका गाजलेल्या मराठी गीताचा उल्लेख करत ‘शेवटचे घरटे माझे तुझ्या अंगणात...’ असे शरद पवार यांना सांगत प्रवेश केला होता. मात्र आता अण्णांना पुन्हा घरट्यासाठी अंगण बदलावं लागलं आहे, ही एक राजकीय अपरिहार्यता आहे की महायुतीचा डाव असंही आता पंचक्रोशीत बोललं जात आहे.

दरम्यान भाजपने अण्णांना बळ देताना शैक्षणिक संस्था, सूतगिरणी या सर्व गोष्टींचं पाठबळ दिलं. मात्र त्यांचे नेतृत्वाशी बिनसले. अशावेळी एका टप्प्यावर त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करून भाजला धक्का दिला होता. अर्थात, 2014 मध्ये पुन्हा भाजपची सत्ता आल्यानंतरही ते राष्ट्रवादीतच राहिले होते. मधला काही काळ सोडला तर आता राज्यात आणि केंद्रात दोन्हीकडे भाजपची सत्ता आहे. त्यामुळे राष्ट्रवादीत काही अर्थ राहिला नाही, असेच कदाचित अण्णांना वाटतं असावं. म्हणूनच पुन्हा भाजप, असे त्यांनी म्हणत वाट धरली असावी.

जयंतरावांचे प्रदेशाध्यक्षपद जाणे आणि त्यानंतर त्याच दिवशी डांगे यांनी पक्ष सोडणे या दोन्ही गोष्टींचा योगायोग समजायचा की यातून काही आणखी अर्थ काढायचा, हा देखील संभ्रम यातून निर्माण झाला आहे. कारण जयंतरावांनी इस्लामपूरच्या राजकारणात चिमण डांगेंना उपनगराध्यक्ष, अध्यक्ष करून संधी दिली होती. जयंतरावांच्या राजकारणात गेली काही वर्षे डांगे त्यांच्यासमवेत राहिले आहेत. आपल्या पुढील पिढीचे हित कशात आहे, हे बापच चांगले ओळखत असतो आणि याच एका अर्थाने डांगे यांनी एकदा सोडलेल्या भाजपच्या अंगणात पुन्हा आपले घरटे नेले आहे.

स्थानिक भाजप याबाबत अनभिज्ञ आहे की काय, असे वाटते. परवाच जयश्री पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश झाला. तो घडविण्यात ‘जनसुराज्य’चे नेते समित कदम यांनी पुढाकार घेतला. आता डांगे यांच्या मुख्यमंत्र्यांशी भेटीवेळीही समित कदम यांचाच पुढाकार दिसून आला. तत्पूर्वी राष्ट्रवादीचेच विट्याचे नेते वैभव पाटील यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादीचे महापौर म्हणून राहिलेले आमदार इद्रिस नायकवडी की, ज्यांचे वडील जनाब इलियास नायकवडी हे राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष होते. त्यांचे घराणेही आता राष्ट्रवादी सोडून अजितदादांच्या राष्ट्रवादीत गेले आहे. अशा पद्धतीने दस्तूरखुद्द जयंत पाटील प्रदेशाध्यक्ष असतानाच त्या पक्षातूनच या जिल्ह्यामध्येच ‘आऊटगोईंग’ मोठ्या प्रमाणावर झाल्याचे दिसते.

जयंतराव आणि भाजप हे ‘कनेक्शन’ फार पूर्वीपासून आहे. अशातच त्यांच्याच पक्षातील त्याच्याच प्रदेशाध्यक्ष काळात अनेक दिग्गज नेते भाजपच्या वाटेवर जाऊ लागले आहेत. एक काळ संपूर्ण महाराष्ट्रात सांगली हा राष्ट्रवादीचा सर्वांत मोठा गड होता. या जिल्ह्यातील काही दिग्गज हे सुरुवातीला राष्ट्रवादीत गेल्याने या पक्षाची राज्यातील ताकद वाढण्यास मदत झाली होती, हे वास्तव आहे. आता राष्ट्रवादी रिकामा होतानाही दिसत आहे. याच जिल्ह्यात याच पक्षाला सांगलीतून मोठे भगदाड पडू लागले आहे. याचे शल्य अर्थातच सात वर्षे पक्षाचे नेतृत्व करणाऱ्या जयंतरावांना वाटत असणार. या पक्षाची धुरा ज्या शशिकांत शिंदे यांच्यावर आली आहे, त्यांच्यासमोर हे ‘आऊटगोईग’ थांबवण्याचे मोठे आव्हान असेल.

महापालिका निर्मितीचे शिल्पकार

अण्णासाहेब डांगे पालकमंत्री असताना त्यांनी सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका करण्याचा धाडसी निर्णय घेत येथील प्रस्थापित राजकारण्यांना धक्का दिला होता. पालकमंत्रिपदाची कारकीर्द गाजली होती. अर्थात, पुढे ते पक्षातून गेल्यानंतर भाजपने महापालिकेत स्वबळावर सत्ताही आणली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT