Amit Deshmukh, Sambhaji Patil Nilangekar Sarkarnama
विश्लेषण

Amit Deshmukh: निलंगेकर बंधूंकडून घायाळ करणारे शाब्दिक हल्ले, आर्थिक गैरव्यवहारांवरुन डिवचलं, अखेर संयमी अमित देशमुखांनी राजकारणाचा 'पॅटर्न' बदलला

Amit Deshmukh Vs Sambhaji Patil Nilangekar: टिपू सुलतान यांच्याबद्दलच्या विधानाने सुरू झालेली राजकीय चर्चा आणि त्यानंतर दहा वर्षांपूर्वीच्या लातूरच्या जलदूतवरून भाजप सरकारवर केलेला गंभीर आरोप, या दोन्ही घडामोडींमुळे अमित देशमुख यांच्या बदललेल्या राजकीय रणनीतीची चर्चा होत आहे.

Jagdish Pansare

Latur News: लातूर जिल्ह्यातील राजकीय वातावरण ऐन थंडीत तापले आहे. जिल्हा बँकेतील सत्ता कायम राखल्यानंतर काँग्रेसचे आमदार अमित देशमुख चांगलेच आक्रमक झाले आहेत. जिल्हा बँकेच्या निवडणुकीदरम्यान विरोधी पॅनेलचे नेते आमदार संभाजी पाटील निलंगेकर आणि अरविंद पाटील निलंगेकर या बंधूंनी देशमुख कुटुंबावर वैयक्तिक टीकेसह आर्थिक गैरव्यवहारांचे गंभीर आरोप केले होते. प्रचाराच्या बहुतांश काळात संयम बाळगणाऱ्या अमित देशमुखांनी निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यात या आरोपांना प्रत्युत्तर दिले. आता बँकेतील सत्ता राखल्यानंतर त्यांनी भाजपविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे.

टिपू सुलतान यांच्याबद्दलच्या विधानाने सुरू झालेली राजकीय चर्चा आणि त्यानंतर दहा वर्षांपूर्वीच्या लातूरच्या जलदूतवरून भाजप सरकारवर केलेला गंभीर आरोप, या दोन्ही घडामोडींमुळे अमित देशमुख यांच्या बदललेल्या राजकीय रणनीतीची चर्चा होत आहे.

सात हजारांच्या मताधिक्याने दिला इशारा?

२०२४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने लातूरची जागा जिंकली. डॉ. शिवाजी काळगे यांनी मोठा विजय मिळवत भाजपला धक्का दिला. मात्र, त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठा झटका बसला. महायुतीच्या लाडकी बहीण योजनेचा प्रभाव असतानाही अमित देशमुख यांनी आपला मतदारसंघ राखला. मात्र, सात हजारांच्या आसपासचे मताधिक्य हे काँग्रेससाठी भविष्यातील आव्हानाची जाणीव करून देणारे ठरले.

या निवडणुकीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये अमित देशमुख यांनी वेगळी रणनीती अवलंबली. विशेषतः लातूर महापालिकेच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्याचा त्यांचा निर्णय काँग्रेससाठी फायदेशीर ठरला. महापालिकेतील सत्तेनंतर काँग्रेसचा पारंपरिक मतदार कायम राखण्यासोबतच सामाजिक आणि राजकीय समीकरणे मजबूत करण्यावर देशमुखांचा भर राहिला.

नगरपालिका आणि नगरपरिषदांच्या निवडणुकांमध्ये संमिश्र यश मिळाल्यानंतर सहकार क्षेत्रातील देशमुख कुटुंबाचे वर्चस्व कायम राखण्याचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर होते. माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांचे मार्गदर्शन असले तरी यंदा निलंगेकर बंधूंनी जिल्हा बँकेतील देशमुखांच्या सत्तेला थेट आव्हान दिले होते.

निलंगेकरांच्या रणनीतीला धक्का

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत अमित देशमुख यांच्यासाठी सर्वांत महत्त्वाची राजकीय घडामोड ठरली ती म्हणजे सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची मिळालेली साथ.

राज्यात महायुतीची सत्ता असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री असलेल्या बाबासाहेब पाटील यांनी जिल्हा बँकेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या पॅनेलला साथ दिली. जिल्हा बँकेची निवडणूक पुढे ढकलून प्रशासक नियुक्त करण्याचा विरोधकांचा कथित प्रयत्नही यशस्वी झाला नाही. औशाचे भाजप आमदार अभिमन्यू पवार यांची भूमिकाही निलंगेकरांच्या पॅनेलला अपेक्षित असलेल्या राजकीय समीकरणांशी जुळणारी नव्हती.

महायुतीतील या विसंवादाचा फायदा देशमुखांच्या पॅनेलला झाला. दुसरीकडे, निलंगेकर बंधूंनी प्रचारात जिल्हा बँकेच्या आर्थिक व्यवहारांचा मुद्दा उपस्थित करत देशमुख कुटुंबाला लक्ष्य केले.

आर्थिक व्यवहारांवरून उठवले रान

गेल्या तीन दशकांपासून जिल्हा बँकेवर देशमुख कुटुंबाचे वर्चस्व आहे. हे वर्चस्व संपुष्टात आणण्यासाठी निलंगेकर बंधूंनी यंदा आक्रमक प्रचार केला. बँकेतील ठेवी, कर्जवाटप, शेतकऱ्यांना दिले जाणारे पीककर्ज आणि देशमुख कुटुंबाशी संबंधित उद्योगांना मिळणाऱ्या कथित आर्थिक लाभांवर त्यांनी प्रश्न उपस्थित केले.

जिल्हा बँकेकडून शेतकऱ्यांना पीककर्ज देण्याऐवजी देशमुख कुटुंबाशी संबंधित कारखाने आणि संस्थांना कर्जवाटपात प्राधान्य दिले जात असल्याचा आरोप संभाजी पाटील निलंगेकर यांनी केला होता. बँकेतील काही अधिकारी सत्ताधाऱ्यांच्या मर्जीतील असून, निवृत्तीनंतरही त्यांना महत्त्वाच्या पदांवर ठेवले जात असल्याचा दावाही त्यांनी केला.

एवढ्यावरच न थांबता शेतकऱ्यांचा पैसा चित्रपटसृष्टीत गेल्याचा गंभीर आरोप निलंगेकरांनी केला. बँकेचा कारभार पारदर्शक असल्याचा दावा करणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी या आर्थिक व्यवहारांचा हिशेब जनतेसमोर मांडावा, असे आव्हान त्यांनी दिले होते.

या आरोपांमुळे जिल्हा बँकेची निवडणूक केवळ सहकार क्षेत्रापुरती मर्यादित न राहता देशमुख आणि निलंगेकर कुटुंबांतील राजकीय संघर्षाचा केंद्रबिंदू ठरली.

'दृश्यम'ला 'रामायण'ने उत्तर

निलंगेकरांच्या आरोपांना जिल्हा बँकेचे तत्कालीन अध्यक्ष धीरज देशमुख यांनी प्रत्युत्तर दिले. बँकेचा कारभार पारदर्शक असून, कर्जवाटप करताना रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक सूचना आणि लेखापरीक्षणाचे निकष पाळण्यात आल्याचा दावा त्यांनी केला.

चित्रपटसृष्टीत बँकेचा पैसा गुंतवल्याचा आरोपही त्यांनी फेटाळून लावला. संभाजी पाटील निलंगेकर यांनी आरोप करताना 'दृश्यम' चित्रपटाचा संदर्भ दिला होता. त्याला उत्तर देताना धीरज देशमुख यांनी आपला कारभार रामायणासारखा स्पष्ट असल्याचा टोला लगावला.

अमित देशमुख यांनीही प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात मैदानात उतरत भाजपच्या राजकीय रणनीतीवर प्रश्न उपस्थित केले. अनेक वर्षांपासून सुरळीत सुरू असलेल्या सहकार क्षेत्रात विनाकारण हस्तक्षेप करून निवडणूक लादण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांना आपल्या बाजूने वळवण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचा दावाही त्यांनी केला.

भाजपच्या चार संचालकांची एन्ट्री

जिल्हा बँकेतील सत्ता कायम राखण्यात देशमुखांना यश आले असले तरी या निवडणुकीतून विरोधकांनीही बँकेच्या संचालक मंडळात प्रवेश मिळवला आहे.

अनेक वर्षे बिनविरोध निवडणुकीची परंपरा असलेल्या जिल्हा बँकेत यंदा देशमुखांना प्रत्यक्ष निवडणुकीला सामोरे जावे लागले. सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची साथ मिळाल्यानंतरही भाजपचे चार संचालक निवडून आले. त्यामुळे देशमुखांचे बँकेवरील वर्चस्व कायम असले तरी संचालक मंडळात विरोधकांचा आवाज असणार आहे. निवडणुकीच्या प्रचारात उपस्थित करण्यात आलेले आर्थिक व्यवहार, कर्जवाटप आणि बँकेच्या कारभारासंबंधीचे मुद्दे विरोधी संचालक आगामी काळात पुन्हा उपस्थित करणार का, याकडेही लक्ष राहणार आहे.

टिपू सुलतानबद्दलचे विधान रणनीतीचा भाग?

जिल्हा बँकेतील विजयानंतर अमित देशमुख यांनी टिपू सुलतान यांच्याबद्दल केलेल्या विधानाने जिल्ह्यातील राजकारणाला नवे वळण मिळाले. त्यांच्या या विधानावरून भाजपने टीका करण्यास सुरुवात केली. विधानसभा निवडणुकीतील घटलेले मताधिक्य, महापालिका निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीशी केलेली आघाडी आणि काँग्रेसचा पारंपरिक मतदार टिकवण्याचे आव्हान, या पार्श्वभूमीवर देशमुखांच्या विधानाकडे पाहिले जात आहे.

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून काँग्रेसची मतपेढी मजबूत करण्याच्या रणनीतीचा हा भाग असावा का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. मात्र, देशमुखांनी या विधानामागील असा कोणताही राजकीय हेतू स्पष्ट केलेला नाही.

दहा वर्षांपूर्वीच्या 'जलदूत'चा मुद्दा

टिपू सुलतान यांच्याबद्दलच्या विधानावरून भाजप आणि काँग्रेसमध्ये राजकीय संघर्ष सुरू असतानाच अमित देशमुख यांनी दहा वर्षांपूर्वीच्या लातूरच्या पाणीटंचाईचा मुद्दा उपस्थित केला. २०१६ मध्ये मिरजहून रेल्वेने लातूरला पाणी आणण्याचा तत्कालीन भाजप सरकारचा निर्णय हा दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांची प्रतिमा मलिन करण्याच्या षडयंत्राचा भाग होता, असा गंभीर आरोप अमित देशमुख यांनी केला.

विलासराव देशमुख यांच्या राजकीय वारशाशी संबंधित मुद्दा उपस्थित करत अमित देशमुख यांनी भाजपसमोर नवा राजकीय प्रश्न उभा केला आहे.

बचावात्मक भूमिकेतून आक्रमक राजकारणाकडे?

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत देशमुख कुटुंबाच्या आर्थिक व्यवहारांवरून निलंगेकरांनी आक्रमक भूमिका घेतली होती. त्यावेळी प्रचाराच्या बहुतांश काळात संयम बाळगणारे अमित देशमुख आता स्वतः भाजपविरोधात विविध मुद्दे उपस्थित करत आहेत.

महापालिकेतील सत्ता, जिल्हा बँकेवरील कायम राहिलेले वर्चस्व आणि स्थानिक पातळीवर महायुतीतील मतभेद या पार्श्वभूमीवर अमित देशमुख यांच्या बदललेल्या राजकीय भूमिकेला महत्त्व प्राप्त झाले आहे.

टिपू सुलतान यांच्याबद्दलचे विधान आणि त्यानंतर जलदूतवरून केलेला आरोप, या स्वतंत्र राजकीय प्रतिक्रिया आहेत की विरोधकांना बचावात्मक भूमिकेत आणण्याच्या व्यापक रणनीतीचा भाग आहेत, हे आगामी घडामोडींमधून स्पष्ट होईल. मात्र, जिल्हा बँकेच्या निवडणुकीपुरता मर्यादित असलेला देशमुख-निलंगेकर संघर्ष आता लातूर जिल्ह्याच्या व्यापक राजकारणात विस्तारत असल्याचे दिसत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT