Namo Shetkari Scheme : 'नमो शेतकरी योजना आणि अग्रीम रक्कम एकच', कृषी मंत्री दत्ता भरणे आधी गोंधळले; नंतर सारवासारव करत म्हणाले, फाईल पाठवलीय...

Dattatray Bharne On Namo Shetkari And Drought Aid Confusion : राज्य सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही आम्ही शेतकऱ्यांबरोबर आहोत, आम्ही पण शेतकऱ्यांचे लेकरं आहोत, शेतकऱ्यांचे दुःख काय शेतकऱ्यांचा अडचणी काय हे आम्हाला माहित आहे, असे कृषमंत्री भरणे यांनी म्हटलं आहे.
Namo Shetkari Scheme; Dattatray Bharne
Namo Shetkari Scheme; Dattatray BharneSarkarnama
Published on: 
Updated on: 

Nanded News : राज्य सरकारतर्फे दिली जाणारी नमो शेतकरी सन्मान योजनेची रक्कम आणि दुष्काळाची अग्रीम रक्कम एकच आहे. ती काही वेगळी रक्कम नाही, अशी प्रतिक्रिया कृषिमंत्री दत्ता भरणे यांनी दिली. त्यांच्या या वक्तव्यामुळे शेतकऱ्यांना दिलेली पाच हजार रुपयांची अग्रीम रक्कम ही नमो शेतकरी सन्मान योजनेतूनच दिली आहे का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. कृषिमंत्री भरणे नांदेड विमानतळावर माध्यमांशी बोलत होते.

यावेळी बोलताना भरणे म्हणाले, "आता जी पाच हजार रुपयांची रक्कम प्रतिशेतकऱ्याला दिली आहे, शेवटी रक्कम तीच आहे, एकच आहे. ती काही वेगळी रक्कम नाही. पण आपण देणार आहोत, आपण देणार नाही, असे काही नाही. आपण तो प्रस्ताव अर्थ खात्याकडे पाठवला आहे." भरणे यांच्या या उत्तरानंतर अग्रीम म्हणून दिलेली पाच हजार रुपयांची रक्कम नमो शेतकरी योजनेची आहे का, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला.

त्यावर, "तसे म्हणता येणार नाही. अग्रीम रक्कम ती वेगळीच आहे. तीदेखील फाईल आपण अर्थ खात्याकडे पाठवली आहे," असे म्हटले आहे. त्यांनी, ​नमो शेतकरी सन्मान योजनेच्या प्रलंबित हप्त्याची फाईल मंजुरीसाठी वित्त विभागाकडे पाठवण्यात आली असून ती रक्कमही लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल, असा दावा केला आहे.

राज्यामध्ये दुष्काळी परिस्थिती असून शेतकरी अडचणीत आहेत. केंद्र सरकारकडे मदतीची मागणी करण्यात आली होती. मात्र, ही मदत मिळण्यास थोडा उशीर होत आहे. केंद्राने नुकतेच एनडीआरएफचे निकष बदलले असून, त्यानुसार पुन्हा प्रस्ताव पाठवावा लागणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मिळणाऱ्या नुकसानभरपाईच्या रकमेत वाढ होईल, असे भरणे यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, "शेतकऱ्यांना काही प्रमाणात आधार देण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी प्रयत्न केले आहेत. शेतकऱ्यांना अग्रीम रक्कम दिली आहे. आपण सर्व शेतकऱ्यांना ही रक्कम देण्याचा प्रयत्न केला आहे."

Namo Shetkari Scheme; Dattatray Bharne
Dattatray Bharne: 'नुकसान झालेल्या सगळ्या शेतकऱ्यांना मदत देणार', भरणेंची माहिती

साधारणतः ९७ लाख शेतकऱ्यांपर्यंत ही रक्कम पोहोचली आहे. नांदेड जिल्ह्यातील किंवा राज्यातील ज्या शेतकऱ्यांची केवायसी, सामायिक क्षेत्र किंवा इतर तांत्रिक अडचणींमुळे रक्कम मिळालेली नाही, त्यांनाही ही रक्कम दिली जाईल. एवढेच नाही, तर केंद्राकडून वाढीव मदत मिळाल्यानंतर ती रक्कमही शेतकऱ्यांना दिली जाईल, असे भरणे यांनी स्पष्ट केले.

"मात्र, यासाठी आम्ही केंद्राची वाट पाहत नाही. कृषी विभाग, जलसंधारण विभाग आणि ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांना अडचणीच्या काळात आणि दुष्काळाच्या परिस्थितीत जी मदत करता येईल, ती केली जात आहे. भविष्यात पुन्हा दुष्काळ पडल्यास शेतकऱ्यांना पाण्याच्या प्रश्नाला सामोरे जावे लागू नये, यासाठी दीर्घकालीन योजना आखल्या जात आहेत.

त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी तातडीच्या योजनाही राबवल्या जात आहेत. राज्य सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. आम्ही शेतकऱ्यांसोबत आहोत. आम्हीही शेतकऱ्यांची लेकरं आहोत. शेतकऱ्यांचे दुःख आणि त्यांच्या अडचणी आम्हाला माहीत आहेत. मी माझ्या सर्व शेतकरी बांधवांना सांगतो की, सध्या दिवस कठीण आणि अडचणीचे आहेत. या परिस्थितीला आपल्याला सामोरे जावेच लागेल. दुष्काळाच्या प्रश्नाचा सामना करावा लागेल. मात्र, हे सरकार तुमच्या पाठीशी आहे," असेही भरणे म्हणाले.

दरम्यान, पहिल्या प्रस्तावात काही त्रुटी राहिल्या होत्या का, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता, राज्य सरकारकडून कोणत्याही त्रुटी राहिलेल्या नाहीत, असे भरणे यांनी सांगितले. मात्र, केंद्र सरकारने निकषांमध्ये केलेल्या बदलांमुळे पुन्हा सुधारित प्रस्ताव पाठवावा लागणार आहे. केंद्राने यापूर्वी हेक्टरी साडेआठ हजार रुपये मदत दिली जात होती, ती आता ११ हजार रुपये केली आहे. तर हेक्टरी २२ हजार रुपये मिळणारी मदत आता ३० हजार रुपये करण्यात आल्याचेही कृषिमंत्री भरणे यांनी सांगितले.

Namo Shetkari Scheme; Dattatray Bharne
Dattatray Bharne News: २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ, ५० टक्के पंचनामे पूर्ण, 'कृषी' खात्याला दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी हवेत १९ हजार कोटी...

दरम्यान, नमो शेतकरी सन्मान योजनेची रक्कम आणि दुष्काळाची अग्रीम मदत एकच असल्याचे कृषिमंत्री दत्ता भरणे यांनी म्हटल्याने राज्यातील शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. पाच हजार रुपयांची अग्रीम मदत नेमकी कोणत्या योजनेतून देण्यात आली आणि नमो शेतकरी योजनेची रक्कम स्वतंत्रपणे मिळणार का, याबाबत आता प्रश्न उपस्थित होत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.