भाजपचे आमदार सुरेश धस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी बुधवारी सभागृहात जी माहिती सांगितली ती लोकांचा थरकाप उडवणारी ठरली. मस्साजोग (ता. केज, जी. बीड) येथील सरपंच संतोष देशमुख यांची हत्या कशा पद्धतीने केली, हे सांगत मारेकऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. मारेकरी कोण, त्यांना पाठबळ कुणाचे, याचे संकेत या दोन आमदारांसह बीड जिल्ह्यातील बुहतांश आमदारांनी सभागृहात बोलताना दिले. त्यावर देशमुख खून प्रकरणाची न्यायालयानी चौकशी करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी सभागृहात केली.
संतोष देशमुख यांचा खून झाला आहे, तोही अत्यंत क्रूरपणे. आमदारांनी त्याची माहिती सभागृहात दिली. आमदार धस वगळता या विषयावर बोललेल्या उर्वरित सर्व आमदारांनी देशमुख यांच्या मारेकऱ्यांना वाल्मिक कराड याचे पाठबळ असल्याचे सांगितले. आमदार धस यांनी नाव घेतले नसले तरी त्यांचा अंगुलीनिर्देश वाल्मिक कराड यांच्याकडेच होता. वाल्मिक कराड याचा 'आका' कोण हे शोधून काढण्याची मागणी धस, आव्हाड यांनी केली. प्रकरण खुनाचे आहे, वाल्मिक कराड याचे नाव त्यात येत आहे. सरकार वाल्मिक कराडला अटक करू शकले असते, पण तसे झाले नाही.
मारेकऱ्यांनी संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांना मारहाण करतानाचा लाईव्ह व्हिडीओ कोणाला दाखवला होता, याची चौकशी करावी, अशी मागणी धस, आव्हाड यांनी सभागृहात केली होती. चौकशी करून हे शोधून काढणे सरकारसाठी फार जिकीरीचे काम नव्हते, कारण देशमुख यांच्या हत्येमागे कोण आहे, हे आमदारांनी सभागृहात सांगितले आहे. बीड जिल्ह्यातील सर्वांना त्याची माहिती आहे. आता राज्यातील लोकांनाही त्याची माहिती झाली आहे. संशयिताला अटक न करता न्यायालयीन चौकशीची घोषणा करून सरकराने स्वतःचीच परीक्षा घ्यायचे ठरवले आहे काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
बीड जिल्ह्यात कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती हाताबाहेर गेलेली आहे. आव्हाड यांनी खून झालेल्या दहा जणांची नावे वाचून दाखवली आहेत. असे असतानाही पोलिस अधीक्षकांची केवळ बदली करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली आहे. पवनचक्की कंपनीकडे दोन कोटी रुपये खंडणी मागण्यासाठी आलेल्या गुंडांनी वॉचमनला मारहाण केली होती. हा वॉचमन मस्सोजोग येथीस रहिवासी आहे. त्यामुळे सरपंच देशमुख यांनी गुंडांना हुसकावून लावले होते. त्यातूनच त्यांचा खून करण्यात आला.
एक तर तू राहशील किंवा मी, या उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केलेल्या टीकेला बहुमत मिळाल्यानंतर फडणवीस यांनी दिलेले उत्तर मोठे आश्वासक होते. आम्ही दोघेही राजकारणात राहू, असे ते म्हणाले होते. सूडाचे राजकारण करणार नाही, अशी हमीही त्यांनी दिली होती. मुख्यमंत्रिपदाचा शपथविधी झाल्यानंतर फडणवीस यांनी घेतलेली पत्रकार परिषद त्यांच्याबद्दल अपेक्षा वाढवणारी होती, या टर्मला एक नवे फडणवीस मिळाले आहेत, असा संदेश देणारी होती. सरकार वाल्मिक कराड याच्यावर गुन्हा दाखल करून त्यांच्या अटकेचे आदेश देणार, अशी अपेक्षा निर्माण झाली होती. पुरावे मिळाले तर कराड याच्यावर कारवाई करण्यात येईल, असे मुख्यमंत्री म्हणाले आहेत.
बीड जिल्ह्यातील आमदारांनी वाल्मिक कराड (Walmik karad) याचे नाव सभागृहात घेतले. त्यामुळे त्याच्यावर गुन्हा दाखल करून अटक करणे अवघड नव्हते. सबळ पुरावा नसताना, अनेकांना केवळ संशयावरून अटक केल्याची, जामीन न मिळाल्यामुळे त्यांना अनेक वर्षे कारागृहात राहावे लागल्याची प्रकरणे ढिगाने सापडतील. काही वर्षांनंतर सरकारवर ताशेरे ओढत अशा अनेकांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केलेली आहे. देशमुख हत्या प्रकरणात तर सर्व पुरावे आहेत. न्यायालयीन चौकशी, एसआयटी चौकशीच्या घोषणेएेवजी गुन्हा दाखल करून वाल्मिक कराडला अटक केली असती तर सरकारची प्रतिमा उजळून निघाली असती.
न्यायालयीन चौकशी, एसआयटी चौकशी वेळेवर होईल, त्यातून सत्य बाहेर येईल आणि आरोपी, त्यांना पाठबळ देणाऱ्या, राजाश्रय देणाऱ्या नेत्यांना शिक्षा होईल, अशी अपेक्षा आता लोकांना आहे. पब्लिक मेमरी शॉर्ट असते हे खरे असले तरी प्रत्येक घटनेसाठी हे लागू होईल, असे नसते. न्याय नाही मिळाला तर अराजकसदृश्य स्थिती निर्माण होऊ शकते. मुख्यंमंत्री आणि सर्व मंत्र्यांनी एकदा बीड जिल्ह्याचा दौरा करून परस्थितीचा आढावा जरूर घ्यायला हवा. सुरेश धस, संदीप क्षीरसागर, विजयंसिंह पंडित नमिता मुंदडा हे बीड जिल्ह्यातील आमदार सभागृहात बेंबीच्या देठापासून का ओरडत होते हे लक्षात येईल.
विधानसभा निवडणुकीच्या (Vidhan Sabha Election) दिवशी परळी मतदारसंघातील एका मतदान केंद्रावरील व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यात एका उमेदवाराचे कार्यकर्ते मतदार आणि पोलिसांसोबत कसे वागत होते, हे त्यात दिसत होते. निवडणूक आयोगाने, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी तो व्हिडीओ पाहिला नसेल, असे म्हणता येणार नाही. मतदान केंद्रावरील तो प्रकार आणि संतोष देशमुख यांच्या हत्या, याचे धागेदोर नक्कीच जुळणारे आहेत. इतकी दहशत कोण माजू शकतो, त्याला वेळीच पायबंद का घालण्यात आला नाही, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे लोकांना हवी आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.