B. S. Yediyurappa News
B. S. Yediyurappa News Sarkarnama
विश्लेषण

Karnataka Assembly Elections : येडियुरप्पांनी वाढवले भाजपचे टेन्शन; निवडणुकीतून माघारीचा फटका बसणार?

Amol Jaybhaye

Karnataka Assembly Elections : कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते बी. एस. येडियुरप्पा (B. S. Yediyurappa) यांनी मोठी घोषणा केली आहे. या वेळी आपण विधानसभा निवडणूक लढवणार नाही, असे त्यांनी जाहीर करून टाकले. येडियुरप्पा यांनी वयाचा हवाला देत ही घोषणा केली असली तरी यामुळे भाजपला काही प्रमाणात फटका बसणार असल्याचे सांगितले जात आहे.

येडियुरप्पा यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याने निवडणूक न लढणे यामुळे भाजपला (BJP) काही प्रमाणात नाराजीचा सामना करावा लागू शकतो, असे राजकीय जाणकार सांगतात. कर्नाटक भाजप म्हणजे येडियुरप्पा असे समिकरण होते. त्या समिकरणाला छेद देण्याचा प्रयत्न भाजपने केला. मात्र, त्यामध्ये त्यांना हवे तेवढे यश मिळाले नाही. यामुळे या निवडणुकीत येडियुरप्पा यांना पुन्हा सक्रिय करावे लागले. मात्र, आता त्यांची निवडणूक लढणार नसल्याचे सांगितल्याने चर्चांना उधाण आले आहे.

२००८ मध्ये कर्नाटकात (Karnataka) भाजपची सत्ता आणण्यामध्ये येडियुरप्पाचे मोठे योगदान आहे. कर्नाटकात भाजपला सत्ता मिळवून देण्याचे श्रेय येदियुरप्पा यांना दिले जाते. शेतकरी कुटुंबातील येदियुरप्पा यांची शेतकऱ्यांचे नेते म्हणून अशीही ओळख आहे. येडियुरप्पा यांनी शेतकरी आणि लिंगायत समाजाची मोट बांधत भाजपला सत्तेपर्यंत पोहचवले. त्यामुळे येडियुरप्पा दक्षिणेकडील राज्यातील भाजपचे पहिले मुख्यमंत्री झाले.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपला पुन्हा सत्तेत येण्यासाठी लिंगायत वोट बँक महत्वाची आहे. त्यासाठी येडियुरप्पा भाजपसाठी महत्त्वाचे आहेत. मात्र, त्यांनी विधानसभा निवडणुकीतून माघार घेतली. त्यामुळे भाजपला फटका बसू शकतो, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. येडियुरप्पा हे किमान ४० जागांवर प्रत्यक्ष आणि सुमारे ८० जागांवर अप्रत्यक्षपणे प्रभाव टाकू शकतात. मात्र, त्यांनी निवडणूक न लढण्याची घेतलेली भूमिका भाजपची डोकेदुखी वाढवू शकते.

येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या जागेवर लिंगायत समाजाचा चेहरा म्हणून बसवराज बोम्मई यांना संधी देण्यात आली होती. मात्र, त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यामुळे भाजपची कोंडी झाली आहे. त्यातच आता येडियुरप्पा निवडणूक लढणार नसल्यामुळे भाजपची अडचण झाली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

दरम्यान, मी विधानसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. मी वयाची ८० वर्षे ओलांडल्यामुळे मुख्यमंत्रिपदाचाही राजीनामा दिला होता. माझे वय ८० वर्षांपेक्षा जास्त असले तरी मी यावेळीच नव्हे; तर पुढच्या वेळीही राज्याचा दौरा करणार आहे. या निवडणुकीतच नव्हे; तर पुढच्या निवडणुकीत आम्ही भारतीय जनता पक्षाला बहुमत मिळेल, असा दावाही त्यांनी केला. कर्नाटकमध्ये भारतीय जनता पक्षाला पूर्ण बहुमत मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आम्ही पुन्हा सत्तेत येऊ. काँग्रेस (Congress) भ्रष्ट आहे; म्हणूनच ४० टक्के कमिशनचे खोटे आरोप आमच्यावर करत आहे, हा मतदारांचा प्रश्न नाही, असेही येडियुराप्पा यांनी सुनावले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT