Devendra Fadnavis, Sudhir Mungantiwar, Girish Mahajan
Devendra Fadnavis, Sudhir Mungantiwar, Girish Mahajan  Sarkarnama
विश्लेषण

गिरीश महाजनांना मोका लावा, फडणवीस, मुनगंटीवार यांना अडकवा... : असा ठरला प्लॅन

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar), माजी मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्यासह भाजप नेत्यांना खोट्या गुन्ह्यात अडकविण्याचे कट कारस्थान विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांच्या कार्यालयात रचल्याचा आरोप खुद्द माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. राज्यातील विरोधकांना संपविण्याचे कारस्थानही त्याच ठिकाणी शिजल्याचेही त्यांनी सांगितले. (Serious allegations against Devendra Fadnavis's public prosecutor Praveen Chavan)

दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी ‘विशेष सरकारी वकील चव्हाण यांच्यावर गंभीर आरोप करणारे व्हिडिओ असलेला एक पेन ड्राईव्ह विधानसभेचे अध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्याकडे दिला. त्यामध्ये फडणवीस, महाजन यांच्यासह भाजपच्या नेत्यांवर गुन्हे दाखल करण्यासाठी सरकारकडून रचण्यात आलेली कट कारस्थाने याचा खुलासा करणारे अनेक व्हिडीओ आहेत, असेही फडणवीसांनी नमूद केले आहे. सुमारे २० ते २५ वेब सीरीज या व्हिडीओच्या माध्यमातून होतील, असेही ते म्हणाले.

मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेशी संबंधित असलेल्या २०१८ मधील एका वादाप्रकरणी महाजन यांच्यावर बनावट गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाजनांना मोका लावण्यात यावा, अशी कागदपत्रे तयार करण्यात आली आहेत. याबाबतचा कट विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांच्या कार्यालयात शिजला आहे, असे आरोप फडणवीस यांनी केला.

विरोधकांची विरोधकांची कत्तल कशी करायची, याची कारस्थाने सरकारी वकिलांच्या कार्यालयात शिजली आहेत. महाजनांच्या विरोधात गुन्हा कसा दाखल करायचा, यापासून बरंच काही या कार्यालयात ठरले आहे. खोटे साक्षीदार आणि एफआयआर नोंद करण्याचे काम सरकारी वकिलांनी केलेले आहे. साक्षीपुरावा कसे तपासायचे, त्यापासून पैसे कसे घ्यायचे, याचा सर्व घटनाक्रम या व्हिडीओमध्ये आहे. आम्ही राजकारणातील विरोधक आहोत, शत्रू नाहीत, असेही फडणवीस यांनी सांगितले.

जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे विश्वस्त ॲड. विजय पाटील यांनी या प्रकरणाचा निभोरा पोलिस ठाण्यात पाहिली फिर्याद नोंदविण्यात आली होती. पुण्यातील कोथरूड परिसरात ही घटना घडल्यामुळे फिर्याद पुणे पोलिसांकडे वर्ग करण्यात आली. ट्रस्टची कागदपत्रे घेण्यासाठी तक्रारदाराला पुण्यात बोलविण्यात आले होते. मात्र, तिथे त्यांना प्रथम एका हॉटेलमध्ये आणि नंतर एका फ्लॅटमध्ये नेण्यात आले होते. त्यानंतर काही लोकांनी, ‘गिरीशभाऊंना ट्रस्टवर ताबा हवा, म्हणून तुम्ही आता राजीनामा द्यावा, अशी धमकी दिल्याचे पोलिसांकडे करण्यात आलेल्या तक्रारीमध्ये पाटील यांनी नमूद केलेले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT