Shambhuraj Desai vs Satyajeet Patankar Sarakranama
विश्लेषण

Satara ZP : शंभुराज देसाईंकडून सत्यजीत पाटणकरांचा 'पद्धतशीर' कार्यक्रम : भाजपमध्ये जाऊन, 3 मंत्र्यांनी ताकद देऊनही वाट्याला पराभव

Satara ZP Election Result 2026: गेल्या सहा महिन्यांपासून पालकमंत्र्यांनी पक्षप्रवेशाचा सपाटा लावला होता. अनेक कार्यकर्ते पाटणकरांना सोडून देसाईंकडे गेले. त्यांना थांबविण्याचा प्रयत्नही झाला नाही.

जालिंदर सत्रे

जालिंदर सत्रे

Shambhuraj Desai News: सत्यजितसिंह पाटणकर विरुद्ध शंभूराज देसाई लढत नवी नाही. मात्र, भाजपमध्ये प्रवेश केल्याने पाटणकरांची ताकद वाढेल, असा अंदाज होता. मात्र, देसाईंनी योग्य नियोजन करत पंचायत समितीच्या 14 पैकी 13 जागांवर विजय मिळला. तर,भाजपच्या वाट्याला अवघी एक जागा आली.

गल्ली, गाव, गण आणि गट असे प्रभावी नियोजन, दररोज आढावा, उमेदवार निवडीत आघाडी, कार्यकर्त्यांवर मजबूत पकड अन् पाठबळ या जोरावर पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी एकहाती विजय मिळवत निर्विवाद बहुमत घेतले. याउलट नियोजनाचा बट्ट्याबोळ, उमेदवार निवडीतील गोंधळ, भाजप प्रवेशाचा प्रभावी करता न आलेला वापर, कार्यकर्त्यांत ताळमेळाचा अभाव, तसेच अतिआत्मविश्वास पाटणकरांना पुन्हा सत्तेबाहेर घेऊन गेला.

गेल्या वर्षभरापासून पालकमंत्री व त्यांचे कार्यकर्ते राबत होते. गल्ली, गाव, गण व गटातील कोअर कमिट्या सतत सेवेत व अलर्ट असल्यामुळे विरोधकांना प्रत्येक क्षणाला कोंडीत पकडण्यात पालकमंत्री समर्थक आघाडीवर असायचे.

पाटणकरांकडे गाववार नियोजन नाही, प्रत्येक विभागात काही मातब्बर निर्माण झालेत. त्यामुळे नवीन कार्यकर्ते निर्माण झाले नाहीत. काही ठिकाणी युवकांनी प्रयत्न केला. मात्र, त्यांनी ते हाणून पाडल्याने देसाईंकडे जशी युवक कार्यकर्त्यांची फौज आहे, ती उणीव पाटणकरांकडे जाणवते. सत्यजितसिंह पाटणकरांना युवक फळी निर्माण करता आली नाही.

गेल्या सहा महिन्यांपासून पालकमंत्र्यांनी पक्षप्रवेशाचा सपाटा लावला होता. अनेक कार्यकर्ते पाटणकरांना सोडून देसाईंकडे गेले. त्यांना थांबविण्याचा प्रयत्नही झाला नाही. अथवा काहींनी स्वतःच्या अस्तित्वासाठी तो करूही दिला नाही. त्यामुळे मंगल माने, संदीप जाधव यांच्यासारखे कार्यकर्ते विरोधी छावणीत दाखल होऊन विजयी झाले. पाटणकरांचे गोकूळ तर्फ हेळवाक, म्हावशी हा पारंपरिक बालेकिल्ला देसाईंनी खिळखिळा करताना अन्य पाच जिल्हा परिषद गटही माझाच बालेकिल्ला असल्याचे दाखवून देत त्यात चंचुप्रवेशही करू दिला नाही.

पालकमंत्री देसाई वन मॅन आर्मी होते. भाजपने मात्र मंत्री गणेश नाईक, मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, मंत्री जयकुमार गोरे यांना आणून देखील प्रभाव टाकू शकले नाहीत. विरोध असतानाही विजय पवार, स्वप्ना अभिजित पाटील यांना उमेदवारी देऊन माझाच शब्द अंतिम हे सिद्ध करून दाखविले. भाजपकडून राजेश पवारांना सलग तिसऱ्या वेळी उमेदवारी देताना सलग तीन विधानसभा निवडणुकीत चाफळ गणात मताधिक्य घटत गेले. पवार निवडून येतात; पण विधानसभा निवडणुकीत मताधिक्य मिळत नाही. यावर आत्मचिंतन होणे गरजेचे आहे.

साखर कारखाना परिवारातील सेवक रात्रीचा दिवस करतात. मात्र, पाटणकर यांच्या संस्थेतील सेवक विरोधी गटालाच हातभार लागेल, अशी वातावरणात निर्मिती करतात. एक राजकीय वनवासात असतानाही रामबाण उपाय केले नाहीत. ठोस व कठोर निर्णय नाहीत. बोटचेपी धोरण आणि अंमलबजावणीच्या अभावामुळे पाटणकरांची संघटना कमकुवत करून गेली.

विधानसभा पॅटर्न चालला

विधानसभा पॅटर्न या निवडणुकीतही चालला. मंत्री देसाई यांचा वारू वाडी- वस्तीवर उधळला. तो रोखण्यासाठी पाटणकर मंडळींना मैदानात उतरून काम करावे लागणार आहे. पाटणमध्ये आलेल्या कार्यकर्त्यांकडून माहिती घेऊन कानाला लागणारांचा बंदोबस्त करावा लागेल. वाड्याच्या तटबंदीबाहेर असलेली अदृश्य कृत्रिम तटबंदी उद्ध्वस्त करणे गरजेचे आहे.

...पाटणकरांचे राजकारण धोक्यात

बदल स्वीकारले तरच परिवर्तन होते, हा निसर्ग नियम अमलात आणल्यास लढाई अवघड नाही. तब्बल 11 वर्षे विरोधात असूनही जनमताचा मूळ आधार अजून स्थिर आहे, या भ्रमात न राहता संवाद आणि संपर्क वाढविला, तरच राजकारणात भविष्य आहे. केवळ भाजप प्रवेशाने सगळे ठीक होईल, या संकल्पनेतील वावर रस्त्यावर उतरून वाढवावा लागेल. तो न वाढविल्यास पाटणकरांसाठी राजकीय भविष्य एक दिवास्वप्नच राहील, असे चित्र आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT