sharad pawar  sarkarnama
विश्लेषण

Sharad Pawar : शरद पवारांची साथ सोडलेल्या 'या' दिग्गजांची उडाली झोप!

Sharad Pawar : आपली साथ सोडलेल्या आमदारांमध्ये अस्वस्थता निर्माण करण्यात शरद पवार यशस्वी झाल्याचे दिसत आहे. निवडणुकीपर्यंत आणखी काय काय होणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

अय्यूब कादरी

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर शरद पवार हे या वयात थकून घरी बसतील, पक्षाच्या उभारणीसाठी प्रयत्न करणार नाहीत, असे ज्यांना वाटले होते, त्यांना पवार यांनी तोंडघशी पाडले आहे. वयाच्या 84 व्या वर्षात असलेल्या शरद पवार यांनी महायुतीतील पक्षांच्या तरुण प्रमुखांना घाम फोडल्याचे लोकसभा निवडणुकीत दिसून आले आहे. विधानसभा निवडणुकीतही ते त्यापेक्षा अधिक उत्साहाने काम करत आहेत.

अजितदादा पवार ( Ajit Pawar ) यांच्यासोबत 40 आमदार गेले आहेत. त्यातील प्रमुख चेहऱ्यांना घेरण्याचे डावपेच शरद पवार यांनी आखले आहेत. अजितदादांसह भाजपचेही काही नेते त्यांच्या गळाला लागत आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी फोडून अजितदादांना सोबत घेणे या अर्थानेही भाजपच्या अंगलट येणार, अशी चिन्हे दिसू लागली आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस सोडून 2019 मध्ये भाजपावसी झालेले मधुकर पिचड आणि त्यांचे पुत्र वैभव पिचड यांनी नुकतीच शरद पवार यांची भेट घेतली आहे. राजकीय वर्तुळात हा चर्चेचा विषय ठरला आहे.

मधुकर पिचड हे अकोले विधानसभा मतदारसंघातून 1980 ते 2009 पर्यंत सलग निवडून आले. शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. त्यावेळी पिचड हे पवार यांच्यासोबत राहिले. ते राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षही होते. कॅबिनेट मंत्री, विरोधी पक्षनेते म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. अकोले मतदारसंघातून त्यांचे पुत्र वैभव पिचड यांनी 2014 मध्ये विजय मिळवला. भाजपमध्ये गेल्यानंतर मात्र 2019 च्या निवडणुकीत वैभव पिचड यांचा पराभव झाला. राष्ट्रवादी काँग्रेसचे किरण लहामटे विजयी झाले. आता किरण लहामटे हे अजितदादांसोबत आहेत. त्यामुळे महायुतीत हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसला सुटणार आहे.

राज्यात अनेक ठिकाणी, अशी परिस्थिती उद्भवणार आहे. इंदापूर मतदारसंघातही असाच पेच निर्माण झाला आहे. इंदापूरचे आमदार दत्तात्रेय भरणे हे अजितदादांसोबत गेले आहेत. 'भाजपमध्ये गेल्यामुळे आता चांगली झोप येते,' असे मागे एकदा हर्षवर्धन पाटील म्हणाले होते, मात्र आता त्यांची झोप उडाली आहे, ती भरणे हे महायुतीत आल्यामुळे. भरणे आमदार असल्यामुळे इंदापूर मतदारसंघ महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेसलाच सुटणार आहे. त्यामुळे पाटील हे आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार, असे संकेत मिळत आहेत. पाटील यांनी शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश केला, तर समीकरणे बदलण्याची शक्यता आहे. तिकडे, पिचड पिता-पुत्रांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला, तर नगर जिल्ह्यातील राजकारणातही उलथापालथ होणार आहे.

शरद पवार ( Sharad Pawar ) यांनी पहिला धक्का दिला, तो मंत्री हसन मुश्रीफ यांना. भाजपचे नेते समरजितसिंह घाटगे यांना आपल्या पक्षात घेऊन. त्यानंतर त्यांनी अजितदादांना अनेक धक्के दिले आहेत. धर्मरावबाबा आत्राम यांच्या कन्या भाग्यश्री यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला आहे. वडिलांविरुद्ध त्या उमेदवार असू शकतात. त्यानंतर पवार यांनी नरहरी झिरवाळ यांनाही धक्का दिला आहे. झिरवाळ यांचे पुत्र गोकुळ झिरवाळ यांनी हाती तुतारी घेतली आहे. ते वडिलांच्या विरोधात निवडणूक लढवणार का, हे अद्याप निश्चित झालेले नाही.

सिंदखेडराजाचे आमदार, माजी मंत्री राजेंद्र शिंगणे यांनाही शरद पवार यांची साथ सोडली आहे. त्यांनाही त्याची किंमत मोजावी लागणार, असे दिसत आहे. शिंगणे यांच्या पुतणी गायत्री शिंगणे यांनी शरद पवार यांची भेट घेतल्याचे सांगितले जात आहे. काकांच्या विरोधात त्या सिंदखेडराजा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार असतील, असे बोलले जाते. याद्वारे, आपली साथ सोडलेल्या आमदारांमध्ये अस्वस्थता निर्माण करण्यात शरद पवार यांना यश आले आहे. पिचड पिता-पुत्राच्या माध्यमातून त्यांनी भाजपलाही धक्का देण्याची तयारी केली आहे.


( Edited By : Akshay Sabale )

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT