Maharashtra Politics : वाचाळवीरांनो, आता जिभेला आवरा; महाराष्ट्राला मोकळा श्वास घेऊ द्या!

Sanjay Raut Defamation case Medha Somaiya : भ्रष्टाचाराचे आरोप केल्यानंतर मेधा सोमय्या अब्रुनुकसानीच्या प्रकरणी न्यायालयाने राऊत यांना शिक्षा सुनावली आहे. महाराष्ट्रात वाचाळ नेत्यांचे पीक आलेले आहे. राऊत प्रकरणानंतर हे वाचाळ नेते आपल्या जिभेला आवर घालतील का, असा प्रश्न महाराष्ट्राला पडला आहे.
nitesh rane | sanjay gaikwad | anil bonde | sanjay raut
nitesh rane | sanjay gaikwad | anil bonde | sanjay rautsarkarnama
Published on
Updated on

गेल्या पाच वर्षांपासून महाराष्ट्र एका राजकीय गंभीर समस्येशी झुंज देत आहे. ही समस्या कमी होण्याचे नाव घेत नाही, उलट ती वरचेवर तीव्र होत आहे. ही दोन वाक्ये वाचताच कोणालाही वाटेल नेत्यांची पक्षांतरे, फोडाफोडी ही ती समस्या असणार. होय, तीही समस्या आहेच, मात्र त्यापेक्षा भयंकर समस्या आहे ती वाचाळवीरांची, त्यांच्याकडून मर्यादा सोडून केल्या जाणाऱ्या, सामाजिक सलोख्याला नख लावू शकणाऱ्या टीकेची, वादग्रस्त विधानांची.

काही अपवाद वगळता प्रत्येक पक्षात अशा वाचाळ नेत्यांचा भरणा झालेला आहे. बेताल वक्तव्ये, बेभान आरोपांची राळ उठवणे, हे रोजचेच झाले आहे. त्याला निर्बंध घालणे आता संबंधित पक्षप्रमुखांच्या हातातही राहिले नाही, कारण विरोधकांना नेस्तनाबूत करण्यासाठी पक्षप्रमुखांनीच अशा नेत्यांना प्रोत्साहन दिले होते. आता त्याचे विकृत रूप दिसू लागले आहे. शिवसेनेत फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरे एकटे पडले होते. त्यावेळी खासदार संजय राऊत यांनी ठाकरेंचा किल्ला एकहाती लढवला होता. भाजपनेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी राऊत यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा ठोकला होता. न्यायालयाने राऊत यांना 15 दिवसांच्या कैदेची शिक्षा सुनावली.

संजय राऊत ( Sanjay Raut ) यांना झालेली ही शिक्षा गेल्या पाच वर्षांतील उथळ राजकीय घडामोडी आणि त्यातूनच आलेल्या उथळ वक्तव्यांचा परिपाक म्हणावा लागेल. राजकारणात आरोप-प्रत्यारोप चालत असतात. राऊत यांनी मेधा सोमय्या यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केला होता. त्यामुळे सोमय्या यांनी अब्रुनुकसानीचा दावा केला होता. किरीट सोमय्या यांनी गेल्या पाच वर्षांत सातत्याने विरोधकांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले आणि ते उघडकीस आणल्याचे दावे केले. सोमय्या यांनी आरोप केलेले यापैकी अनेक नेते भाजपमध्ये आले किंवा भाजपसोबत तरी आले. अशा नेत्यांवरील कारवाई थंडबस्त्यात गेल्याचे महाराष्ट्राने पाहिले आहे.

nitesh rane | sanjay gaikwad | anil bonde | sanjay raut
Eknath Shinde and Ajit Pawar News : 'मोठ्या भावा'मुळे मुख्यमंत्र्यांसमोर बंडखोरीचे, तर अजितदादांसमोर घर शाबूत ठेवण्याचे आव्हान!

शिवसेना फुटली त्यावेळी उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) एकटे पडले होते. त्यांचे सर्व शिलेदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले. त्यावेळीही आणि महाविकास आघाडी स्थापन होतानाही राऊत यांनी एकट्याने किल्ला लढवला होता. शिवसेनेत पडलेली फूट आणि किरीट सोमय्या हे उद्धव ठाकरेंसोबत राहिलेल्या आमदारांवर करत असलेल्या भ्रष्टाचारांच्या आरोपांमुळे राऊत यांचा तोल ढळला असणार आणि त्यातूनच त्यांनी किरीट सोमय्या यांच्या पत्नीवर भ्रष्टाचाराचा आरोप केलेला असणार. त्यांना त्यांची शिक्षा मिळाली. आता अन्य वाचाळवीरांचे काय करायचे?

भाजपचे नितेश राणे, अनिल बोंडे, गोपीचंद पडळकर, शिंदे गटाचे संजय गायकवाड आदींची वक्तव्ये आठवून पाहा. सामाजिक सलोख्याला नख लागेल अशी वक्तव्ये करण्यात नितेश राणे आणि अनिल बोंडे आघाडीवर असतात. त्यांच्यावर गुन्हेही दाखल झाले आहेत, मात्र त्याचे पुढे काय झाले, हे अद्याप तरी समोर आलेले नाही. समाजात दुही निर्माण होईल, अशी वक्तव्ये सर्रास केली जात आहे. याच महाराष्ट्राच्या मातीतून यशवंतराव चव्हाण, उद्धवरावदादा पाटील, वसंतदादा पाटील, शरद पवार, सुधाकरराव नाईक, शंकरराव चव्हाण, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे, विलासराव देशमुख आदी दिग्गज नेत्यांचा उदय झाला आहे. या नेत्यांनी महाराष्ट्राची एक राजकीय संस्कृती निर्माण केली आहे. सामाजिक तेढ निर्माण होईल, अशी वक्तव्ये या दिग्ग्जांनी कधीही केली नव्हती.

त्याच महाराष्ट्राच्या मातीत आता राजकारण्यांची एक उथळ, वकूब नसलेली पिढी समोर आली आहे. दिसला विरोधक की त्याच्यावर बेभान होऊन टीका करणे. एवढे एकमेव 'टास्क' त्यांना त्यांच्या पक्षश्रेष्ठींनी दिले आहे. ते स्वतःच्या बुद्धीने नव्हे तर 'रोबोट'प्रमाणे वागत आहेत, बोलत आहेत. "कोणत्याही माजी मुख्यमंत्र्यांची पुढची पिढी असली झालेली मी पाहिलेली नाही," असे विधान शरद पवार यांनी नुकतेच केले आहे. ते नारायण राणे यांच्याा पुत्रांना उद्देशून केले होते. त्यामुळे परिस्थिती किती हाताबाहेर गेली आहे, याचा अंदाज येऊ शकतो.

nitesh rane | sanjay gaikwad | anil bonde | sanjay raut
BJP Politics : बालेकिल्ला कोसळला, आता आव्हान देवेंद्र फडणवीस, गडकरी यांच्यासमोर

अशा वाचाळवीरांच्या पक्षांना लोकसभा निवडणुकीत मतदारांनी अद्दल घडवली आहे, मात्र त्यापासून त्यांनी कोणताही धडा घेतलेला दिसत नाही. त्यानंतरही त्यांची बेताल बडबड सुरूच आहे. संबंधित पक्षश्रेष्ठींनीही त्यांचे कान पिळलेले नाहीत. आता संजय राऊत यांच्या प्रकरणापासून तरी त्यांनी धडा घ्यायला हवा. वादग्रस्त विधाने करणाऱ्यांवर गुन्हे दाखल आहेत. आज ना उद्या ती प्रकरणे न्यायालयात जातील आणि त्यांनाही फटका बसू शकतो. शिक्षा होईल, नाही होईल हा भाग वेगळा, महाराष्ट्राची सुसंस्कृत राजकीय परंपरा जपण्यासाठी वाचाळांनी आपल्या जिभेला आवर घातला पाहिजे.

( Edited By : Akshay Sabale )

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com