Sharad Pawar News Sarkarnama
विश्लेषण

Sharad Pawar News: तुतारीतील इनकमिंग... अन् निवडणूक अंदाज..!

NCP SP Politics : लोकसभेच्या निकालानंतर कुठेही न थांबता शरद पवार हे पायाला भिंगरी बांधून राज्याच्या कानाकोपऱ्यात फिरत आहेत. तसेच राज्यभर त्यांच्या सभांना मिळणारा प्रतिसाद हा भाजपच्या अनेक नेत्यांच्या पोटात गोळा आणतो आहे. त्यामुळेच अनेकांना आपले भवितव्य तुतारी फुंकणाऱ्या माणसात दिसते आहे.

सरकारनामा ब्यूरो

सदानंद पाटील-

NCP Politics : एकाबाजूने विधानसभेच्या राजकीय मैदानाची धावपट्टी अनुकूल करण्याची जबाबदारी जयंत पाटील चोखपणे बजावत असतानाच, दुसऱ्या बाजूने अनुभवी कॅप्टन शरद पवार यांच्याकडून या पीचवर दमदार बॅटिंग सुरू आहे. शरद पवार यांना मिळणारा प्रतिसाद पाहून भाजपच्या अनेक नेत्यांनीच तुतारी हाती घेण्यास सुरुवात केली आहे.

किमान दोन डझन नेते शरद पवार यांच्या तंबूत जातील, अशी परिस्थितीत आहे. लोकप्रिय योजनांची घोषणा करूनही महायुती आणि विशेषता भारतीय जनता पक्षाला लागलेली गळती आणि पक्ष सोडणाऱ्या बहुतांश नेत्यांची शरद पवार यांना असलेली पसंती, यावरून निवडणुकीचे अंदाज बांधण्यास सुरुवात झाली आहे.

राष्ट्रवादी, शिवसेनेत फूट पाडून लोकसभा निवडणुकीत शरद पवार , उद्धव ठाकरे यांना धक्का देण्याचा भाजप कडून प्रयत्न झाला. मात्र झाले उलटेच. शिवसेना, राष्ट्रवादीत पाडलेली फूट युतीच्या आणि भाजपच्या अंगलट आली. त्यामुळे विधानसभेला युती किंवा भाजपातून निवडणूक लढण्यापेक्षा शरद पवार यांच्या राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्यास अनेक नेते पसंती देत आहेत. गेल्या महिनाभरात सर्वाधिक इनकमिंग राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या पक्षात झाले आहे.

राष्ट्रवादीत फूट पाडून शरद पवार (Sharad Pawar) यांना एकाकी पाडण्याचा डाव मतदारांना पटला नसल्याचे, लोकसभा निवडणुकीच्या निकालावरून दिसत आहे. लोकसभेला मर्यादित रसद असताना राष्ट्रवादीचा स्ट्राईक रेट सर्वाधिक म्हणजे ८० टक्के होता. कारण राष्ट्रवादीने लढवलेल्या दहा जागांपैकी आठ जागांवर उमेदवार खासदार म्हणून दिल्लीला गेले. त्यामुळे आगामी विधानसभेसाठी तुतारीची हवा जोरात वाहू लागली आहे.‌

लोकसभेच्या निकालानंतर कुठेही न थांबता शरद पवार हे पायाला भिंगरी बांधून राज्याच्या कानाकोपऱ्यात फिरत आहेत. तसेच राज्यभर त्यांच्या सभांना मिळणारा प्रतिसाद हा भाजपच्या अनेक नेत्यांच्या पोटात गोळा आणतो आहे. त्यामुळेच अनेकांना आपले भवितव्य तुतारी फुंकणाऱ्या (NCP) माणसात दिसते आहे.

लोकसभा निवडणुकीच्या निकालाचा विधानसभा निवडणुकीवर परिणाम होऊ नये, यासाठी महायुतीने लाडकी बहीण, युवा रोजगार प्रशिक्षण, तीर्थदर्शन, वयश्री आदी लोकप्रिय योजनांची घोषणा केली आहे. वैयक्तिक लाभाच्या योजना या मतदारांना आकर्षित करतील व त्यामाध्यमातून पुन्हा सत्तेत येण्याचा राजमार्ग प्रशस्त होईल, अशी महायुतीला अपेक्षा आहे. मात्र या योजना जाहीर करूनही पक्ष सोडणाऱ्या नेत्यांची वाढत चाललेली संख्या मात्र भाजप आणि अजित पवार गटासाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे.

महायुतीने आणलेल्या या योजनांचा जनतेवर किती प्रभाव पडणार, हे निवडणुकीच्या निकालानंतर स्पष्ट होणार आहे. मात्र या योजनेचा सध्यातरी सत्ताधारी पक्षातीलच अनेक नेत्यांना तितकासा भरोसा राहिला नसल्याने, अनेक नेत्यांनी महाविकास आघाडीत आणि त्यातही शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत जाण्यास सुरुवात केली आहे.

माजी केंद्रीय राज्यमंत्री आणि हिंगोली लोकसभेच्या माजी खासदार सूर्यकांता पाटील यांनी भाजपला रामराम ठोकत पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश केला आहे. यामुळे भाजपाचे उदगीर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार सुधाकर भालेराव, माजी आमदार विनायकराव पाटील, कोल्हापूरचे समरजितसिंह घाटगे यांनी भाजपमधून राष्ट्रवादीत पक्षप्रवेश केला आहे.

असेच अजित पवार गटाच्या पिंपरी चिंचवडपासून परभणी, नांदेड, नाशिक येथील नेत्यांनी शरद पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. वानगीदाखल ही काही उदाहरणे दिली असली तरी जसजशा निवडणुका जवळ येत जातील, तसे ही यादी आणखी वाढत जाईल.

जुन्या सहकाऱ्यांना साद

पश्चिम महाराष्ट्र हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला. मात्र मागील दोन निवडणुकीत भाजपने मुसंडी मारली. यावेळी मात्र कोणत्याही परिस्थितीत वर्चस्व मिळवायचेच, या उद्देशाने राष्ट्रवादी कामाला लागली आहे. वेळप्रसंगी घटक पक्षांशी जुळते मिळते घेवून वाटचाल करण्याचे धोरण. शरद पवार यांनी कागल विधानसभा मतदारसंघात प्रचार करताना जुन्या सहकाऱ्यांच्या आठवणींना उजाळा देत भावनिक साद घातली. पुढील काळात याची प्रचिती अनेक मतदार संघात दिसणार आहे. किमान २५ ते ३० युवा चेहऱ्यांना संधी देवून तरुणांना आकर्षित करण्याचा प्रयत्न आहे.

सर्वाधिक पसंतीचे टेन्शन

सत्तेत असणाऱ्या भाजप आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला सोडून शरद पवार यांच्याच पक्षात सर्वाधिक प्रवेश का होत असेल, याची आता चर्चा होऊ लागली आहे. विधानसभेला सत्तांतराच्या शक्यता निर्माण होत असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. असे झाले तर शरद पवार हेच या सत्ताकारणाचे शिल्पकार असतील हे उघड आहे. या वातावरणात पसंतीचा क्रम कसा ठरेल याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

मुख्यमंत्रिपदाची भूमिका

मुख्यमंत्री पदावर सुरुवातीला लक्ष न देणाऱ्या राष्ट्रवादीने ज्यांच्या जागा अधिक त्यांचा मुख्यमंत्री असा पवित्रा घेतला आहे.यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या भुवयाही उंचावल्या आहेत. काँग्रेस, ठाकरे गट किंवा आमच्या पक्षाचा मुखमंत्री होईल, असे शरद पवार यांनी कोल्हार येथे स्पष्ट केले आहे.

जर हीच भूमिका घ्यायची होती तर मग यापूर्वी मुख्यमंत्री पदात राष्ट्रवादीला रस नसल्याचे का सांगितले? मुख्यमंत्री पदावरून राष्ट्रवादीत दोन मतप्रवाह होते का? अचानक निर्णयात बदल झालाच कसा? असे काही प्रश्न सध्या तरी अनुत्तरीत आहेत.

पवारांची पॉवर वाढली

-  लोकसभातील स्ट्राईक रेटमुळे दोन डझन नेते पवारांच्या संपर्कात

- महायुतीच्या योजनांना अपेक्षित यश नसल्याने अनेक नेते चिंतेत

- मुख्यमंत्रिपदाबाबतच्या भूमिकेतील बदलाने भुवया उंचावल्या

- जुन्या सहकाऱ्यांच्या आठवणींना उजाळ्याने भावनिक साद

-  शरद पवार हेच सत्ताकारणाचे शिल्पकार ठरणार

-  जयंत पाटील, अनिल देशमुख, अमोल कोल्हेंची अपेक्षित साथ

अशाच माहितीपूर्ण मजकुरासाठी, सखोल विश्लेषणासाठी आवर्जून वाचा 'सरकारनामा' आता साप्ताहिक प्रिंट स्वरुपात- घरपोच अंक मिळण्यासाठी संपर्क - ९८८१५९८८१५

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT