sharad pawar | ajit pawar | eknath khadse sarkarnama
विश्लेषण

Sharad Pawar : 'वस्तादा'ची साथ सोडलेले दोन्ही दिग्गज नेते अडकले चक्रव्यूहात

अय्यूब कादरी

समोर जे दिसत असते, त्यापेक्षा राजकारण कितीतरी पटींनी वेगळे असते. एकत्र राहूनही एकमेकांच्या विरोधात कट-कारस्थाने केली जातात. विरोधी पक्षांमध्ये ज्या तीव्रतेचे राजकारण असते, त्यापेक्षा अधिक तीव्रता पक्षांतर्गत, युती, आघाड्यांअंतर्गत राजकारणाची असते. सध्या महायुतीत सुरू असलेल्या कुरघोड्यांवरून याचा अंदाज आता सामान्य लोकांनाही येऊ लागला आहे.

शरद पवार यांची साथ सोडून भाजपसोबत सत्तेत सहभागी झालेल्या अजितदांदाची महायुतीत कोंडी केली जात आहे. महाराष्ट्राच्या सराजकारणातील रूबाबदार, स्पष्टवक्ते, प्रशासनावर पकड असलेले राजकीय नेते, अशी ओळख असलेले अजितदादा महायुतीत बॅकफूटवर गेल्यासारखे दिसत आहेत. वस्ताद, अर्थात काका शरद पवार यांची साथ सोडणे अजितदादांना महागात पडते की काय, अशी चर्चा सुरू झाली आहे. दुसरीकडे, उद्धव ठाकरे यांना सोडून भाजपसोबत सत्तेत सहभागी झालेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) मात्र महायुतीत वरचढ झाल्याचे दिसून येत आहे.

भाजपमधून ( bjp ) राष्ट्रवादीत आलेले आणि पुन्हा भाजपमध्ये जाऊ इच्छिणारे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री एकनाथ खडसे यांना त्यांच्या भाजपमधील अंतर्गत विरोधकांनी सीमेवरच अडवून ठेवले आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी महायुतीत जागावाटप 'स्ट्राइक रेट'नुसार करण्याचे सूतोवाच केले आहे. खडसे यांनी लोकसभा निवडणुकीत भाजपला मदत केली नसती, तर रावेर आणि जळगावची जागा धोक्यात आली असती आणि तसे झाले असते तर शिंदे 'स्ट्राइक रेट'वर अडूनच बसले असते. खडसे यांच्यामुळे दोन जागा निवडून आल्या आणि भाजपला मिळालेल्या एकूण जागांची संख्या 9 झाली. खडसे यांनी भाजपला मदत केली नसती तर ही संख्या 7 झाली असती. शरद पवार यांना सोडण्याचा विचार केलेल्या खडसे यांचीही अभूतपूर्व कोंडी झाली आहे.

मुख्यमंत्री व्हायची महत्त्वाकांक्षा अजितदादांना ( Ajit Pawar ) स्वस्थ बसू देत नव्हती. त्या महत्त्वाकांक्षेने उचल खाल्ल्यामुळे अजितदादा 40 आमदारांसह बाहेर पडले आणि सरकारमध्ये सहभागी झाले. अजितदादांचा सरकारमध्ये प्रवेश झाला आणि महायुतीत ठिणगी पडली. शिंदे गटाचे अनेक इच्छुक मंत्रिपदासाठी देव पाण्यात घालून बसले होते, मात्र ही मंत्रिपदे अजितदादांच्या वाट्याला गेली. त्यामुळे शिंदे गटात नाराजी पसरली. त्या नाराजीचे वेळोवेळी जाहीर प्रदर्शन झाले. अजितदादा आणि एकनाथ शिंदे यांच्यात शीतयुद्ध सुरू झाले. त्यात सुरुवातीच्या काळात अजितदादा वरचढ दिसून आले, मात्र लोकसभा निवडणूक आणि निकालानंतर शिंदे यांची मांड पक्की झाल्याचे दिसून आले.

लोकसभा निवडणुकीत जास्तीत जास्त फायदा व्हावा, शरद पवार यांचे राजकारण संपावे, हे हेतूने भाजपने अजितदादांना महायुतीत घेतले होते, मात्र चित्र उलटे नेमके दिसू लागले. अजितदादांमुळे भाजपचे नुकसान झाले, अजितदादा महायुतीत नको, अशी चर्चा भाजपच्या काही नेत्यांनी उघडपणे सुरू केली. अजितदादा यांच्या पत्नी सुनेत्राताई पवार यांचा बारामती लोकसभा मतदारसंघातून पराभव झाला. अजितदादांचे सख्खे बंधू आणि पुतण्या शरद पवार यांच्यासोबत उभे राहिले. शरद पवार यांचे राजकारण संपणे तर दूरच राहिले, त्यांच्या राजकारणाला नवसंजीवनी मिळाली. शरद पवार यांच्या पक्षाचे दहापैकी आठ उमेदवार विजयी झाले. अजितदादांनी पाच उमेदवार उभे केले होते, त्यापैकी एकच निवडून आला.

या सर्व बाबींमुळे अजितदादा भाजपलाही नकोसे झाले असल्याचे चित्र निर्माण झाले. शिंदे गटाला नेमके हेच हवे होते. लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपात पडती भूमिका घ्यावी लागल्यामुळे नंतर मुख्यमंत्री शिंदे सावध झाले. विधानसभेला तडजोड करायचीच नाही, अशा भूमिकेत सध्या शिंदे आहेत. त्यामुळे त्यांनी 'स्ट्राइक रेट'नुसार जागावाटपाचा मुद्दा समोर केला. त्यानुसार जागावाटप झाले तर सर्वाधिक नुकसान अजितदादांचे होणार आहे. अजितदादांना कायम अस्वस्थ ठेवण्याचे तंत्र महायुतीकडून अवलंबले जात आहे. अजितदादा स्वतःहून बाहेर पडावेत, अशी व्यूव्हरचना करण्यात आली आहे, अशी चर्चा सुरू झाली आहे.

तिकडे महायुतीत अस्वस्थ असलेल्या अजितदादा पवार यांच्यासमोर शरद पवार यांनीही आव्हाने निर्माण केली आहेत. अजितदादांच्या दिग्गज नेत्यांना शरद पवार यांनी कोंडीत पकडले आहे. त्याची सुरुवात कागल (जि. कोल्हापूर) येथून झाली आहे. अजितदादांचे मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासमोर शरद पवार यांनी भाजपचे दिग्गज नेते समरजितसिंह घाटगे यांना उभे केले आहे. धर्मरावबाबा आत्राम यांच्या कन्या भाग्यश्री यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला आहे. छगन भुजबळ यांना शह देण्यासाठी शरद पवार यांनी चाचपणी सुरू केली आहे. त्यामुळे अजितदादांच्या आमदारांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. त्यातूनच निवडणूक येईपर्यंत यापैकी काही आमदार शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश करू शकतात, असे सांगितले जात आहे.

शरद पवार यांना सोडून अजितदादा जसे 'चक्रव्यूव्हा'त अडकले आहेत, तशीच परिस्थिती एकनाथ खडसे यांची झाली आहे. चौकशांचा ससेमिरा वाचवण्यासाठी खडसे यांनी भाजपमध्ये जाण्याच्या हालचाली सुरू केल्या होत्या. आपला भाजपप्रवेश झाला आहे, मात्र अंतर्गत विरोधामुळे तो जाहीर करण्यात आलेला नाही, असे त्यांनी सांगितले आहे. यावरून खडसे आणि त्यांचे विरोधक मंत्री गिरीश महाजन यांच्यात कलगीतुरा सुरू आहे. खडसे यांच्यामुळे भाजपला रावेर आणि जळगाव लोकसभा मतदारसंघात विजयासाठी मदत झाली होती. मात्र देवेंद्र फडणवीस, महाजन यांचा खडसे यांच्या प्रवेशाला विरोध असल्याचे समोर आले आहे.

भाजप हा वापर करून सहकारी पक्षांना संपवून टाकतो, असा आरोप शिवसेनेसह (ठाकरे गट) विरोधी पक्षांकडून नेहमी केला जातो. यासाठी महाराष्ट्रात शिवसेना, हरियाणात जेजेपी आदी उदाहरणे दिली जातात. जेजेपीचे नेते, हरियाणाचे माजी उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला यांनी नुकत्याच केलेल्या एका वक्तव्याची चर्चा सुरू झाली आहे. दिल्लीत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू असताना भाजपसोबत राहणे ही आयुष्यातील सर्वात मोठी चूक आहे, असे ते म्हणाले आहेत. हे विधान निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आलेले असले तरी त्याचे गांभीर्य कमी होत नाही. भाजपशी मतभेदांमुळे काही महिन्यांपूर्वी दुष्यंत चौटाला हे सरकारमधून बाहेर पडले होते.

आता अजितदादा काय करणार, याकडे लक्ष लागले आहे. महायुतीत राहून दुय्यम स्थान स्वीकारणार, कमी जागा घेणार की वेगळा विचार करणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. महायुतीतही अडचण आणि महाविकास आघाडीने, विशेषतः शरद पवार यांनी त्यांची पुरती कोंडी करून ठेवली आहे. परिस्थिती अशीच राहिली तर अजितदादांच्या आमदारांना गळती लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.


( Edited By : Akshay Sabale )

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT