Sharad Pawar Strategy Sarkarnama
विश्लेषण

Sharad Pawar Strategy: शरद पवार यांची रणनीती

Sharad Pawar politics: एन. डी. पाटील मनातून भलतेच खूष झाले. ‘शरद बदललाय असं म्हणाले. कारण काँग्रेस संस्कृतीच्या मुख्यमंत्र्याने त्यांना फक्त हिरवा कंदील दाखविला नव्हता, तर चक्क ‘भ्रष्टाचारमुक्त सहकार’ हे ध्येय गाठायला सांगितलं होतं.

सरकारनामा ब्यूरो

कुमार सप्तर्षी

देव्हाऱ्यात वेगवेगळ्या देवांच्या मूर्तींसोबत शंखही ठेवलेला असतो. त्याला स्वतःचे पाय नसल्याने अडणीवर ठेवला तरच तो स्थिर राहतो. अडणीवाचून घरंगळत राहतो. तसंच माझ्या आमदारकीच्या काळात मला काँग्रेसवाल्यांचं दर्शन झालं. काँग्रेसचे पुढारी शंखासारखे असतात. त्यांच्या बुडाखाली संस्था नसेल, पद नसेल तर ते अत्यंत अस्थिर होतात. त्या काळात महाराष्ट्रात तीन हजार सहकारी संस्थांचे जाळे होते.

यात हाउसिंग सोसायट्यांची संख्या धरलेली नाही. काँग्रेस पुढाऱ्यांचा प्राण संस्थेमध्ये असतो. हे मर्म तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांना माहीत होते. काँग्रेसवाले त्यांच्याबद्दल ‘फुटीर’, ‘पाठीत खंजीर खुपसणारा’ वगैरे असा प्रचार करीत. या आरोपांना खोडून काढल्याशिवाय शरद पवारांच्या समांतर काँग्रेसमध्ये काँग्रेसचे आमदार येणं नव्हतं. मग त्यांनी एक युक्ती केली. पुलोदच्या सरकारमध्ये शेकापचे नेते एन. डी. पाटील हे सहकारमंत्री होते. ते शरद पवारांच्या थोरल्या बहिणीचे यजमान. त्यांना भ्रष्टाचाराबद्दल अत्यंत चीड होती. पण राजकीयदृष्ट्या काँग्रेस विरोधक... म्हणून शरद पवारांचेही राजकीय विरोधक. शरद पवारांनी त्यांना सहकार क्षेत्र भ्रष्टाचारमुक्त करावं, असा विचार बोलून दाखवला.

एन. डी. पाटील मनातून भलतेच खूष झाले. ‘शरद बदललाय असं म्हणाले. कारण काँग्रेस संस्कृतीच्या मुख्यमंत्र्याने त्यांना फक्त हिरवा कंदील दाखविला नव्हता, तर चक्क ‘भ्रष्टाचारमुक्त सहकार’ हे ध्येय गाठायला सांगितलं होतं. त्यांनी फाइल मागवल्या आणि धडाधड महाराष्ट्रातील सहकारी संस्थांना ‘कारणे दाखवा’ नोटिसा पाठवल्या. या प्र

करणाचा पुढे मागोवा घेतला तर काय लक्षात येते? ‘मी जिवंत आहे, असे भ्रष्टाचाराने सांगत सहकारमंत्र्यांना वाकुल्या दाखविल्या. नोटीस आली की साखर कारखान्याचे चेअरमन वा एखाद्या खविसंचे (खरेदी विक्री संघ) चेअरमन ताबडतोबीने मुंबईला येत. शरद पवारांची उंची किती आहे याची माहिती काँग्रेसच्या पुढाऱ्यांनी आधीच करून घेतली होती.

कदाचित मंत्रालयाच्या परिसरात हार मिळणार नाही. म्हणून गावाकडूनच मुख्यमंत्र्यांच्या उंचीला शोभेल असा भला मोठा हार घेऊन ते मंत्रालयात येत. पांढऱ्या शुभ्र वेशातला, कडक इस्त्रीची टोपी घातलेला, ढेरी असलेला काँग्रेसवाला मुख्यमंत्र्यांच्या दालनात हार घालून साहेबांचे स्वागत करायचा. त्या प्रसंगाचा फोटो काढण्यासाठी त्या पुढाऱ्याने गावाकडूनच फोटोग्राफरही सोबत आणलेला असे. सत्कार वगैरे झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या समोरच्या खुर्चीत बसून तो पुढारी त्याला आलेली महाराष्ट्र शासनाची नोटीस दाखवायचा. नंतर तो निवेदनाला प्रारंभ करायचा. ‘‘साहेब, मला राजकारणात तुम्ही घेतलेली स्टेप फार आवडली. काँग्रेस पक्षाला धक्का देणं आवश्यकच होतं. म्हणून मी माझ्या सहकाऱ्यांसोबत तुमच्या समांतर काँग्रेस या पक्षात प्रवेश करतो.’’

शरद पवारांना पाठिंबा देणाऱ्या आमदारांची संख्या ५०-६० पर्यंत गेली. परिणामतः मुख्यमंत्री राजकीयदृष्ट्या स्थिर झाले. हे स्थैर्य मिळाल्यानंतर त्यांनी अनेक पुरोगामी निर्णय घेण्याचे धाडस दाखवलं. उदा. शेतीच्या पंपांचे इलेक्ट्रीक बिल युनिटवर अवलंबून न ठेवता हॉर्सपॉवर्सवर ठेवलं. अशा अनेक पुरोगामी निर्णयांच्या मागे आणखी एक कारण होतं. पुलोद हे महाराष्ट्राच्या इतिहासातले पहिलेच आघाडीचे सरकार म्हणून शासनाला दिशा देणारी एक ‘सुकाणू समिती’ स्थापन झाली होती.

त्यात पुलोदचे सर्व राजकीय घटक सामील होते. त्या समितीचे अध्यक्ष होते समाजवादी नेते एस. एम. जोशी. त्यामुळे पुलोदच्या सरकारमध्ये कधीही प्रतिगामी निर्णय झाला नाही. फार तर असे म्हणता येईल, की काही पुरोगामी निर्णय शेवटापर्यंत अमलात आले नाहीत. सहकारमंत्री एन. डी. पाटलांनी घेतलेला निर्णय ऐतिहासिक व पुरोगामीच होता. पण तो अमलात आला नाही.

पुलोदच्या काळात जनता पक्षाच्या पोटात माजी जनसंघाचे (जनता पार्टीमुळे निवडून आलेले) २७-२८ आमदार होते. ते सत्तेची चव पहिल्यांदाच चाखत होते. ते जनता पक्षात असले तरी त्यांची स्वतंत्र बैठक होत असे. त्यांचे धोरणही स्वतंत्र असे. समाजवादी चळवळीतील कोणीही नेता महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होऊ नये, हे त्यांचे प्रथम क्रमांकाचे ध्येय होते. म्हणून ते शरद पवारांना पूर्ण पाठिंबा देत. नानाजी देशमुख हे माजी जनसंघाचे राष्ट्रीय नेते (त्यावेळी जनता पक्ष) मुंबईला वारंवार येत. ते मुख्यमंत्र्यांना त्यांच्या गोंडवनातील तथाकथित विधायक कामाच्या संस्थांसाठी वर्गणी मागत. कुलवंत ब्राह्मणांना दक्षिणा अतिशय प्रिय असते.

तेवढी दक्षिणा द्या. म्हणजे आम्ही संतुष्ट राहू असे वचन ते देत. समाजवाद्यांना दक्षिणा हे पाप वाटते. समाजवादी मंत्र्यांची भेट झाली की शरद पवार त्यांना आवडणारे शाब्दिक चॉकलेट देत. ‘आपल्याला समाजवाद आणण्याशिवाय पर्याय नाही. सामाजिक परिवर्तनाला आपण अग्रक्रम दिला पाहिजे.’ त्यांचा तिसरा हुकमी एक्का होता, ‘एसेम अण्णांचा मी फार आदर करतो. ते आमच्या पक्षात असते तर आम्ही त्यांना तळहाताच्या फोडासारखे जपले असते. समाजवादी पुढाऱ्यांना एसेम अण्णांबद्दल काय वाटतं हे मला कोडेच आहे. त्यांची चव राखली जात नाही एवढे मात्र खरे.’ दक्षिणा मिळाल्यामुळे माजी जनसंघीय मंत्री नियंत्रणात राहत. समाजवादी तर शरद पवारांच्या नेतृत्वावर हुरळून गेले होते. महाराष्ट्रात समाजवादी क्रांतीला बहुजन समाजाचा नेता मिळाला, असा त्यांना वारंवार आभास व्हायचा.

शरद पवारांना खरे ओळखायचे ते शंकरराव चव्हाण. आणीबाणीत ते मुख्यमंत्री असताना शरद पवार त्यांच्या मंत्रिमंडळात एक मंत्री म्हणून काम करत होते. त्यामुळे दोघे एकमेकांना पूर्ण ओळखून होते. एस. एम. जोशींनी शंकरराव चव्हाणांना अर्थमंत्री होण्याबाबत आग्रह केला होता. त्यावेळी मी एसेम अण्णांसोबत होतो. शंकरराव म्हणाले, ‘‘अण्णा, माजी मुख्यमंत्र्याला मंत्रिमंडळात कुणी घेणार नाही. त्याने जाऊही नये. त्याला कारण आहे.

प्रस्थापित मुख्यमंत्र्याला विस्थापित करून आपण मुख्यमंत्री व्हावे, ही त्याची अंतस्थ इच्छा कार्यरत असू शकते. तुम्ही मला आग्रह करू नका.’’ पण अण्णांनी त्यांना गळ घातली, ते म्हणाले, ‘‘अहो, आमच्या आमदारांना सत्ता, प्रशासन चालविण्याचा अनुभव नाही. तुम्ही अर्थमंत्री झाला तर सर्व खात्याच्या फाइल तुमच्याकडे येतील. त्यामुळे मला खात्री आहे की पुलोद सरकारमध्ये चुकीचे निर्णय होणार नाहीत.’’ या बिनतोड युक्तिवादानंतर उत्तरावर शंकरराव चव्हाण अर्थमंत्री व्हायला तयार झाले. पुलोदच्या मुख्यमंत्र्यांवर अर्थमंत्र्यांचा कायम मानसिक दबाव राहिला.

सध्याच्या महायुती सरकारमध्ये म्हणूनच अर्थमंत्रिपद महत्त्वाचं झालं आहे. महाराष्ट्राचा अर्थमंत्री कोणतीही फाइल दाबून धरू शकतो, कोणताही निधी कोणाकडेही वळवू शकतो; हे आपण आज अनुभवू शकतो

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT