Maharashtra Politics: 'हास्य'नामा : राजकीय योगासने! ‘भोंगा’सन, खांदेपालटासन, घड्याळासन

Political Yoga on World Yoga Day : मंडळी मागच्याच आठवड्यात ‘जागतिक योगदिन’ झाला. यानिमित्त काही नेत्यांनी जाहीर योगासने केली, तर काहींनी चार भिंतींच्या आत योगासने केली. यातील काही नेत्यांनी केलेली योगासने ही परंपरेबाहेरची होती. याला ‘राजकीय योगासनं’ म्हटले तरी चालेल...अशा काही निवडक नेत्यांच्या योगासनांचे प्रकार विशद करत आहोत...
Maharashtra Politics news
Maharashtra Politics newsSarkarnama
Published on
Updated on

अभय नरहर जोशी

‘दे टाळी’ आसन

या 'मातोश्री’वाल्यां नेत्यांनी नुकताच पक्ष वर्धापनदिनाच्या भाषणामुळे आलेला शिणवटा बाजूला ठेवून आपल्या लेकासह चार भिंतींत योगासने केली. (कारण ‘नमों’च्या पुढाकाराने जागतिक योगदिन सुरू झाला असल्याने त्यांना जाहीर योगासने करणे प्रशस्त वाटले नाही. पण आपल्या प्रशस्त हॉलमध्ये त्यांनी ही योगासने केली) त्यांनी शोधलेल्या आसनाला ‘दे टाळी आसन’ असे म्हणतात...या आसनातील प्रमुख क्रिया पुढीलप्रमाणे आहेत.

  • यात आधी दीर्घ श्वास घेऊन उजवा हात टाळी देतात तसा खांद्यात वर घेऊन टाळी देण्याच्या आविर्भाव करायचा

  • त्याच वेळी डोके विरुद्ध दिशेला वळवून घ्यायचे अन् श्वास सोडायचा...त्याच वेळी एक डोळा बंद करून डोळे मिचकावण्याची मुद्रा करायची...

  • ‘महाराष्ट्राच्या मनासारखे होईल,’ असा मंत्र पुटपुटत रहायचा. बंद घरात हे आसन करावे. कार्यकर्त्यांसाठी ‘फेसबुक लाइव्ह’ करावे...

तुच्छतासन

हे आसन शोधून काढणारे नेते सतत नाकावरून हात फिरवत जगाकडे तुच्छतेने पाहत असतात. पत्रकारांकडे तर ते विशेष तुच्छतेने पाहतात. त्यांनी तुच्छतादर्शक आसन शोधले आहे. योगदिनानिमित्त अर्थातच त्यांनी हे आसन केले.

  • हे आसन करताना जगाविषयी तुच्छतादर्शक भाव चेहऱ्यावर आणावा.

  • ‘खळ्ळ खट्याक’ ‘खळ्ळ खट्याक’ असा मंत्र म्हणून या आसनास सुरुवात करायची. lकणा ताठ ठेवून कुठेही वाकायचे नाही.

  • त्यानंतर आपल्या तर्जनी अन् अंगठ्याने नाकाचा शेंडा चोळत रहायचे. lभ्रुकुटी वक्र करून आठ्या ठेवणे.

  • आसन सोडताना यातही टाळी देण्याचा आविर्भाव करायचा पण दोन्ही हातांनी स्वतःचीच टाळी वाजवायची.

‘भोंगा’सन

  • हे नेते सदा सर्वदा कोपिष्टच असतात. त्यांची लेखणी चालते किंवा वाणी चालते. (थेट निवडणुकीत मात्र ते फार चालत नाहीत). त्यांनी या दिवशी ‘मागच्या दाराने’ येत हे आसन केले...

  • हे आसन खुर्चीवर सुखासनात केले तर चालते.हे आसन सकाळी नऊ वाजता करायचे आहे.

  • मान ४५ अंश कोनात वाकवून एकदा डावीकडे, एकदा उजवीकडे वळवायची.

  • मानेला थोडा झटका देत वर पहायचे.

  • तोंडाचा भोंग्यासारखा आकार करून दीर्घ काळ आवाज करत रहायचं.

  • नंतर चेहऱ्यावर आठ्या ठेवून आसन सोडायचे.

Maharashtra Politics news
Vilasrao Deshmukh : दिल्लीच्या दबावासमोर न झुकणारे; राजकीय डावपेचांवर सहज मात करणारे कलासक्त मुख्यमंत्री

खांदेपालटासन

हे आसन करताना संबंधित नेते ‘हे सामान्यांचं सरकार आहे. गरिबांचं सरकार आहे. शेतकऱ्यांचं सरकार आहे. कामगारांचं सरकार आहे वंचित घटकांचं सरकार आहे. आम्ही त्यांच्या कल्याणासाठीच सत्ता घेतली आहे,’ असं सवयीनं पुटपुटत होते. त्यांनी केलेल्या आसनाचं वर्णन पुढीलप्रमाणे -

  • यात खांदे पाडून हसतमुख न राहता निर्विकार, गंभीर मुद्रा करणे अनिवार्य आहे.

  • आपल्या खांद्यावरील भार दुसऱ्याला देण्याचा आविर्भाव करायचा.

  • नंतर दोन पायांत अंतर ठेवून ‘धनुष्य-बाण’ चालवण्याचा आविर्भाव करायचा.

  • त्यावेळी दीर्घ श्वास घेऊन दात-ओठ खायचे.

  • नंतर आसन सोडतानाही खांदे शिथिल पडलेलेच असावेत.

  • विशेष करून या आसनाचा गावाकडे जाऊन शेतीमध्ये राखणीसाठी याचा उपयोग होतो.

  • त्यामुळे शेतातील पाखरे घाबरून दूर उडून जातात.-

पुनरुत्थानासन  

  • राजयोग असलेल्या राज्याच्या कारभाऱ्यानं या दिवशी हे आसन केलं. या नेत्याचं आसन म्हटलं तर फार सोपं पण ते करायला गेलं की भल्याभल्यांना घाम येतो. मात्र हे कारभारी मात्र हसतमुखानं अगदी सहज हे आसन करतात. ते कसे करायचे पाहूयात...

  • उत्तर दिशेकडे तोंड करून हसतमुखाने दीर्घ श्वास घेऊन हे आसन करावे.

  • दीर्घ श्वास घेऊन तो सोडत खाली बसायचे अन् पुन्हा उठायचे...असे तीनदा करायचे. याला ‘पुनरुत्थान चरण’ म्हणतात.

  • मी पुन्हा येईन, किंवा मी पुन्हा आलोच’ हा मंत्र त्यावेळी पुटपुटत रहायचे.

  • स्थितप्रज्ञ मुद्रेने मौन राखून संपूर्ण आसन करायचे.उत्तर दिशेने अष्टांग टेकून ‘नमो, नमो’ मंत्र म्हणत रहायचे.

  • नंतर उठून हाताने दोन्ही गालांवर थपडा मारून ‘मोटा भाई’ स्तवन करायचे...

घड्याळासन

हे नेते सदैव उपकारभारीच असतात. गुलाबी कपड्यांमध्ये येऊन त्यांनी केलेल्या आसनाचं वर्णन पुढीलप्रमाणे...

  • हे आसन अगदी थोडक्यात आटोपते.

  • हे आसन करणारा सदैव घाईत असला तरी ते करू शकतो.

  • यात सरळ ताठ कण्याने उभे राहून दोन हात वर घेणे.

  • त्यानंतर घड्याळी काट्यांच्या दिशेने हे हात टप्प्या-टप्प्याने फिरवणे.

  • नंतर जागच्या जागी धावण्याचा व्यायाम करायचा.

  • कितीही धावले तरी जागच्या जागीच राहिले पाहिजे, ही अट अनिवार्य.

  • नंतर धापा टाकत हे आसन सोडून पळत पळत निघून जायचे

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com