Sharad Pawar-Narendra Modi-Uddhav Thackeray Sarkarnama
विश्लेषण

Shivsena on Sharad Pawar : ...तर शरद पवारांच्या नेतृत्वाला, हिमतीला सह्याद्रीने दाद दिली असती; पवारांच्या भूमिकेवर शिवसेनेची नाराजी

PM Visit to Pune : पवार हे 'मऱ्हाटे' आहेत व शरद पवार म्हणजे आशादायक चेहरा असे ते स्वतःच सांगत असतात.

सरकारनामा ब्यूरो

Mumbai News : ‘सामना’तील अग्रलेखाच्या माध्यमातून शिवसेनेने ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या भूमिकेविषयी नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. लोकमान्य टिळक पुरस्काराच्या व्यासपीठावर पवार यांनी मोदी यांच्यासोबत जाऊ नये, अशी इंडिया आघाडीतील नेत्यांची अपेक्षा होती. मात्र, पवार त्या कार्यक्रमाला जाणार आहेत. शरद पवार गैरहजर राहिले असते तर त्यांचे नेतृत्व, हिंमत यास सह्याद्रीने दाद दिली असती. कार्यक्रमाकडे पाठ फिरवून लोकांच्या मनात आपल्याविषयी असलेली साशंकता दूर करण्याची चांगली संधी पवारांकडे होती, असेही अग्रलेखात म्हटले आहे. (Shiv Sena's displeasure over Sharad Pawar's role)

पुण्यातील टिळक स्मारक समितीच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना लोकमान्य टिळक पुरस्कार देण्यात येणार आहे. त्या कार्यक्रमाला माजी केंद्रीय मंत्री शरद पवार (Sharad Pawar) माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे उपस्थित राहणार आहे. एकीकडे मोदींच्या विरोधात लढण्यासाठी इंडिया आघाडी उभारण्यात आली आहे. दुसरीकडे, त्याच मोदींसोबत व्यासपीठावर जाण्यामुळे इंडिया आघाडीतील नेत्यांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. त्यातूनच शिवसेनेने सामनातील अग्रलेखाच्या माध्यमातून पवारांवर टीका करण्यात आली आहे.

पंतप्रधान मोदी यांना टिळक पुण्यतिथीच्या निमित्ताने शरद पवारांच्या हस्ते टिळक पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. वादाची ठिणगी इथेच पडली आहे. टिळक पुरस्कार मोदींना देऊ नये, असे अनेकांचे सांगणे होते. पण, टिळकांच्या विचारांशी संबंध नसलेल्यांनाही पुरस्कार दिले जात आहेत. अर्थात विचारभिन्नता असली तरी कर्तबगारी, राष्ट्रसेवा त्यांच्या अंगी असेल तर तो देण्यास हरकत नाही; पण मोदी यांना पुरस्कार देण्यात एकप्रकारची अपरिहार्यता दिसते, असे अग्रलेखात नमूद केले आहे.

शिवसेनेने अग्रलेखात म्हटले आहे की, शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षावर पंतप्रधान मोदी यांनी काही दिवसांपूर्वी भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. शरद पवारांचे लोक भ्रष्टाचारी व लुटारू आहेत, असे त्यांनी हजारो कोटींचे आकडे देऊन सांगितले. आज टिळक पुरस्कार स्वीकारताना हे सर्व भ्रष्टाचारी वगैरे लोक पुण्यात मोदींच्या मांडीस मांडी लावून बसणार आहेत. पंतप्रधानांना भ्रष्टाचाराच्या संदर्भात थोडी जरी चीड असती तर ‘अशा भ्रष्ट वगैरे लोकांच्या हातून मी टिळकांच्या नावे पुरस्कार स्वीकारणार नाही व यापैकी एकही व्यक्ती मंचावर किंवा मंडपात असता कामा नये,’ असे त्यांनी आयोजकांना बजावून सांगायला हवे होते.

मोदी यांच्या पक्षाने काही दिवसांपूर्वीच शरद पवारांच्या पक्षावर भ्रष्टाचाराचे आरोप करून लगेच त्यांचा पक्षही फोडला. तरीही शरद पवार हे मोदींचे स्वागत करणार आहेत, हे काही लोकांना आवडलेले दिसत नाही. खरे तर लोकांच्या मनात आपल्याविषयी असलेली साशंकता दूर करण्याची चांगली संधी या कार्यक्रमाकडे पाठ फिरवून शरद पवार यांना साधता आली असती. त्यावर शरद पवारांचे म्हणणे असे की, तीनेक महिन्यांपूर्वी आपणच त्यांना या कार्यक्रमाचे निमंत्रण दिल्याने मला हजर राहावे लागेल. पण, पुण्यात येण्याआधी मोदींनी त्यांचा पक्ष फोडला. त्याचा निषेध म्हणून शरद पवार हे गैरहजर राहिले असते तर त्यांचे नेतृत्व, हिंमत यास सह्याद्रीने दाद दिली असती, असेही अग्रलेखामध्ये नमूद करण्यात आले आहे.

शिवसेनेच्या अग्रलेखात म्हटले आहे की,'समाजाचा पुढारी होण्यास विद्वत्तेपेक्षा सदाचरण, धर्मनिष्ठा आणि स्वार्थत्याग यांची अधिक जरुरी लागते, लोकमान्य टिळकांनी म्हटल्याचे आज आठवते. पवार हे 'मऱ्हाटे' आहेत व शरद पवार म्हणजे आशादायक चेहरा असे ते स्वतःच सांगत असतात. तेव्हा त्यांच्याकडून वेगळ्या आशादायी भूमिकेची अपेक्षा आहे. देशात स्वातंत्र्याचा दुसरा लढा सुरू आहे. अशा वेळी शरद पवार यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांकडून लोकांच्या वेगळ्या अपेक्षा आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT