Uddhav Thackeray-Prakash Ambedkar Sarkarnama
विश्लेषण

Shivshakti-Bhimshakti: ‘कुठं फेडायचं हे सगळं...देवेंद्रजी म्हणाले, ‘घाबरू नका. इथं हा भटजी बसला आहे...’

Uddhav Thackeray-Prakash Ambedkar Maharashtra Politics: रात्री उशिरा एका दूरचित्रवाहिनीवर ही बातमी आली आणि चक्रे फिरली. बाळासाहेब थोरात यांनी उचल खाल्ली आणि तिकीट कन्फर्म झाले. या सर्व प्रक्रियेत कन्हैयालाल गिडवानी हे आमच्याबरोबर होते.

सरकारनामा ब्यूरो

अर्जुन डांगळे

शिवशक्ती-भीमशक्तीच्या आघाडीचे प्रयोग महाराष्ट्रात अनेकदा झाले. भय्यासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील रिपब्लिकन पक्षाने मुंबई महापालिकेत निवडणूक समझोता केला होता. ‘रिपब्लिकन’ला काही जागा सोडल्या होत्या. त्यांपैकी एकच (जे. पी. घाडगे, भांडूप पश्चिम) नगरसेवक म्हणून निवडून आला होता. साहजिकच पक्षात नाराजी होती. परिणामी त्यावेळी भय्यासाहेबांच्या विश्वासातील सुमंत गायकवाड यांना महत्त्वाच्या ‘बेस्ट’ समितीवर सभासद म्हणून घेण्यात आले होते.

शिवसेना व आंबेडकरी चळवळीत अनेक मुद्द्यांवरून सतत खटके, संघर्ष घडत होता. तरी समझोत्यासाठी अनेकांनी प्रयत्न-प्रयोग केले. भाई संगारे, नामदेव ढसाळ यांसारख्या नेत्यांनी केलेले प्रयत्न सर्वांना विदित आहेत.

अनेक जिल्ह्यांत असे प्रयोग छोट्या-मोठ्या पातळीवर झाले; परंतु सर्वत्र चर्चेत आलेला मोठा प्रयोग म्हणजे रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखालील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या हयातीत झालेल्या शिवशक्ती-भीमशक्ती यांच्यातील समझोत्याचा. त्याची हकिगत पुढीलप्रमाणे. त्यावेळी आठवलेंसोबत होतो. जवळचा सहकारी म्हणून ते माझ्याशी अतिशय विश्वासाने वागत.

२००९ मध्ये लोकसभा निवडणूक झाली. आठवले काँग्रेस-‘राष्ट्रवादी’ व विशेषतः शरद पवार यांच्या ‘राष्ट्रवादी’बरोबर होते. माढा हा आठवलेंचा मतदारसंघ खुला झाल्याने आम्ही राखीव मतदारसंघाच्या शोधात होतो. नगर जिल्ह्यातील शिर्डी मतदारसंघ हा राखीव झाला होता. काँग्रेसमधील बडे प्रस्थ बाळासाहेब विखे पाटील यांचा तो पारंपरिक मतदारसंघ. काँग्रेस-‘राष्ट्रवादी’ला आंबेडकरी जनता निवडणुकीत बरोबर हवी होती. साहजिकच त्या जागेवर आठवले यांनी लढावे असा निर्णय झाला.

या जिल्ह्यातील दुसरा मतदारसंघ म्हणजे दक्षिण नगर. तो ‘राष्ट्रवादी’च्या वाट्याला आला होता. परिणामी बाळासाहेब विखेंना मतदारसंघ राहिला नव्हता. दक्षिण नगर आपल्यासाठी ‘राष्ट्रवादी’ने सोडावा यासाठी विखे यांनी सर्वच पातळीवर आटोकाट प्रयत्न केले. डॉ. रावसाहेब कसबे यांच्यामुळे त्यांचे आणि माझेही चांगले संबंध होते.

एका भेटीत मलाही ते म्हणाले, ‘शरदरावांना सांगा, दक्षिण नगर काँग्रेससाठी सोडा.’ पण ही गोष्ट माझ्या हाताबाहेरची होती. शिवाय पवार आणि विखे यांच्यातील राजकीय संबंध जगजाहीर होते. परिणामी आठवलेंसाठी शिर्डी सोडला आहे हे जाहीर करण्यात विलंब किंबहुना टाळाटाळ होत होती. आठवलेंनी ही निवडणूक काँग्रेसच्या चिन्हावर लढवावी; परंतु त्याला नकार दिला.

‘गुलाल हवा की नीळ हवी’

आठवले, प्रीतमकुमार शेगावकर आणि माझा मुक्काम शिर्डीतच होता. निवडणूक अर्ज भरण्याचा दिवस आला तरी निर्णय घोषित होत नव्हता. या अस्वस्थतेतून आम्ही काँग्रेसबरोबरची युती तोडायची असा निर्णय घेतला. रात्री उशिरा एका दूरचित्रवाहिनीवर ही बातमी आली आणि चक्रे फिरली. बाळासाहेब थोरात यांनी उचल खाल्ली आणि तिकीट कन्फर्म झाले. या सर्व प्रक्रियेत कन्हैयालाल गिडवानी हे आमच्याबरोबर होते.

या मतदानादरम्यान मी राहाता विधानसभा क्षेत्रात राधाकृष्ण विखेंसोबत फिरत होतो. तिथला माहोल आणि पाठिंबा देणाऱ्यांची देहबोली लक्षात घेतल्यावर निकालाविषयीची धाकधूक वाढली होती. आठवले अखेर पराभूत झाले. प्रस्थापितांना कानाखालचे उमेदवार पाहिजे असतात आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आठवले हे पवारांकडून आलेले उमेदवार आहेत हे शल्य त्यांना असावे. बाळासाहेब विखे यांच्याविषयी मला आजही आदर आहे. त्यांची अभ्यासूवृत्ती, साधेपणा, सामाजिक जाण मी अनुभवली आहे; पण त्यांच्या गोटातून ‘गुलाल हवा की नीळ हवी’ असा प्रचार करण्यात आला, तो मला अनाकलनीय वाटतो.

लोकसभा निवडणुकीचे निकाल लागले. ‘राष्ट्रवादी’च्या सुप्रिया सुळे लोकसभेत निवडून आल्यामुळे त्यांना राज्यसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा देणे भाग होते. ‘राष्ट्रवादी’ने ही राज्यसभेची जागा (तिची मुदत मला वाटते दोन की अडीच वर्षेच होती) ही आठवले यांना द्यायचे ठरविले. संपर्क साधण्याचे प्रयत्न विशेषतः आर. आर. आबांनी केले; पण मागे फिरणे अवघड होते.

दरम्यान, आठवले म्हणाले, ‘आपण परिसरातील काही महत्त्वाच्या व्यक्तींच्या भेटीगाठी घेऊया.’ मी सांगितले, की ‘भेटायचे म्हणजे साहित्य सहवासात आपल्या जवळची ज्येष्ठ मंडळी कुणीच नाही. दिनकर साक्रीकर, डॉ. य. दि. फडके, प्र. श्री. नेरुरकर, केशव मेश्राम सर आता नाहीत. एक मोठी व्यक्ती आहे ती म्हणजे बाळासाहेब ठाकरे. बाळासाहेबांशी माझा चांगला परिचय होता. मी त्यांना भेटायचो.

आठवले आणि भोवती कार्यकर्त्यांचा गराडा हे समीकरणच. बाळासाहेबांच्या वाढदिवसानंतर दोन दिवसांनी आम्ही ‘मातोश्री’त गर्दीसहित गेलो. भेट झाल्याबरोबर बाळासाहेबांनी त्यांच्या शैलीत शिवशक्ती - भीमशक्तीचा प्रस्तावच दिला.

शिर्डीतील पराभवाची सल आम्हा सगळ्यांच्या मनात होतीच; पण शिवसेनेबरोबर समझोता ही गोष्ट आम्हाला अनेक अर्थांनी कठीणच होती. मग जवळजवळ तीन-चार महिने कार्यकर्ते, लेखक, पत्रकार, बुद्धिजीवी आंबेडकरी चळवळीतील विचारवंतांशी चर्चा करूनच शिवसेनेबरोबर कार्यक्रमाधिष्ठित युतीचा निर्णय घेतला. आठवले यांना राज्यसभेची खासदारकी देऊ हे त्यांनी अगोदरच जाहीर केले होते.

धारावीतील एकच जागा निवडून आली....

बाळासाहेब हयात असतानाच मुंबई महानगरपालिकेची निवडणूक पार पडली. शिवसेनेची सगळी सूत्रे उद्धवजींच्या हातात होती. आम्हाला ११ जागा दिल्या; पण धारावीतील एकच जागा निवडून आली. बाळासाहेबांनी विचारले, ‘असं कसं झालं, तुम्ही कार्यकर्त्यांचे शिबिर भरवा. मी मार्गदर्शनाला येतो.’

आठवले यांना खासदारकीचा प्रश्न हा सुटलेला नव्हता. शिवसेनेच्या वाट्याला दोन वेळा राज्यसभा आली होती; पण त्यावेळीही दिली नाही. दरम्यान, बाळासाहेबांचे निधन झाले. आम्ही सगळेच अस्वस्थ होतो. मी उद्धवजींची मातोश्रीवर भेट घेतली.

संजय राऊतदेखील होते. शिवशक्ती-भीमशक्ती आता भाजपच्या सहभागामुळे महायुती झाली होती. चर्चेत उद्धवजींनी सांगितले, की आम्हाला राज्यसभेच्या तीन-चारच जागा मिळतात. भाजपला देशभरातून जागा मिळतात. भाजपकडून आपण राज्यसभेची जागा मिळवू. मी म्हणालो, ‘तुम्ही पुढाकार घेतला पाहिजे.’ त्यांनी होकार दिला व दिलेला शब्द पाळला.

राज्यसभेची कुठली जागा द्यायची यावर आमची आणि भाजप नेत्यांची बैठक गोपीनाथ मुंडे यांच्या वरळीच्या घरी झाली. विनोद तावडे, देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. मुंडेंमुळे वातावरण सुसह्य होते. त्यांचे आंबेडकरी चळवळीतील सर्वच नेत्यांशी मित्रत्वाचे संबंध होते. चर्चेअंती आठवलेंना महाराष्ट्रातूनच राज्यसभेवर पाठवायचे.

ही जागा प्रकाश जावडेकर यांना देण्याचे भाजपचे ठरले होते. अविनाश महातेकर म्हणाले, ‘अहो ही ‘ब्रह्महत्या’ होईल.’ मी म्हणालो, ‘कुठं फेडायचं हे सगळं...’ त्यावर देवेंद्रजी म्हणाले, ‘घाबरू नका. इथं हा भटजी बसला आहे.’ २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजपत मतभेद झाले. महायुती तुटली. रामदास आठवले म्हणजे आर.पी.आय. (ए) हे भाजपबरोबर गेले. मी शिवसेनेबरोबर गेलो.

(Edited by: Mangesh Mahale)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT