Shrijaya Chavan, Ashok Chavan, Shankarro Chavan Sarkarnama
विश्लेषण

Shrijaya Chavan News : वडिलही मातब्बर, दोनवेळचे मुख्यमंत्री; तरीही नातीला आली आजोबांची आठवण!

अय्यूब कादरी

Nanded News : दोनवेळा मुख्यमंत्री, केंद्रीय गृहमंत्री राहिलेल्या शंकरराव चव्हाण यांच्या नात श्रीजया चव्हाण भोकर मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. श्रीजया यांचे वडील, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशानंतरही नांदेड लोकसभा मतदारसंघातून झालेला भाजप उमेदवाराचा पराभव श्रीजया यांची चिंता वाढवणारा आहे.

महाराष्ट्राचे दोनवेळा मुख्यमंत्री व केंद्रीय गृहमंत्री राहिलेले शंकरराव चव्हाण यांचे नाव आजही आदराने घेतले जाते. मुख्यमंत्री असताना त्यांनी राज्यातील मोठ्या सिंचन प्रकल्पांचे काम मार्गी लावले. पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी आणि राजीव गांधी या तीन पिढ्यांतील नेत्यांसोबत त्यांनी काम केले. या तिन्ही नेत्यांचे ते अत्यंत निकटवर्तीय होते. श्रीजया चव्हाण (Shrijaya Chavan) या त्यांच्या नात असून, राजकारणात प्रवेशासाठी त्या सज्ज झाल्या आहेत. त्यामुळे त्यांना आता आजोबांची आठवण झाली आहे.

माणूस संकटात असला की पहिल्यांदा त्याला आई, वडील, देवाची आठवण येते. राजकारणातील लोकांचे मात्र वेगळे असते. त्यांना आपल्या समृद्ध वारशाची आठवण येते. मग ते आई-वडील, भाऊ-बहीण, आजी-आजोबा कुणीही असू शकतात. शंकरराव चव्हाण यांचा वारसा अर्थातच समृद्ध आहे. त्यामुळे श्रीजया यांना त्या वारशाची आठवण येणे साहजिक आहे. शंकरराव चव्हाण यांनी अख्खी हयात काँग्रेसमध्ये घालवली.

गांधी कुटुंबीयांसह माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांचेही ते निकटवर्तीय होते. शंकरराव यांचे पुत्र, श्रीजया यांचे वडील अशोक चव्हाण हेही महाराष्ट्राचे दोनवेळा मुख्यमंत्री बनले, खासदारही बनले. या संधी त्यांना काँग्रेसने दिल्या होत्या. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

अशोक चव्हाण यांच्या भाजप (Bjp) प्रवेशाची देशभरात चर्चा झाली. काँग्रेसच्या काळातील कथित घोटाळ्यांची यादी भाजपने संसदेत सादर केली होती. त्यात आदर्श घोटाळ्याचा उल्लेख होता. अशोक चव्हाण मुख्यमंत्री असताना आदर्श गृहनिर्माण सोसायटीचे हे प्रकरण घडले होते. ही यादी संसदेत सादर झाली आणि त्याच्या अगदी काही दिवसांतच अशोक चव्हाण भाजपवासी झाले. त्याच्या दुसऱ्या की तिसऱ्या दिवशी त्यांना भाजपने राज्यसभेवर घेतले.

एवढे करून झाले काय, तर नांदेड लोकसभा मतदारसंघातून भाजपचे खासदार प्रतापराव पाटील- चिखलीकर यांचा पराभव झाला. काँग्रेसचे वसंत चव्हाण विजयी झाले. लोकांनी अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांचे काहीएक ऐकले नाही. विधानसभा निवडणुकीत परिस्थिती बदलेल का? याचे निश्चित उत्तर आताच देता येणार नाही. त्यामुळेच श्रीजया यांना आजोबांची आठवण आली.

मराठवाड्यात मराठा आरक्षणाचा प्रभाव लोकसभा निवडणुकीत दिसला. विधानसभा निवडणुकीपर्यंत मराठा आरक्षणाचा पेच सुटणार किंवा नाही आणि सरकारने पेच सोडवलाच तर त्याने मराठा समाजाचे समाधान होणार का, यावर राजकारणाची पुढील दिशा बऱ्याच प्रमाणात अवलंबून आहे. त्यामुळे श्रीजया यांच्यासाठी वेळ कठीण आहे, कारण त्या सत्ताधारी भाजप पक्षाकडून भोकर मतदारसंघातून निवडणूक लढण्याची शक्यता आहे.

अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशामुळे कार्यकर्ते नाराज होते, नागरिकही नाराज होते. त्याचा परिणाम लोकसभा निवडणुकीत दिसून आला. अशोक चव्हाण यांचा भाजपप्रवेश महाविकास आघाडीसाठी फायद्याचाच ठरला. हीच परिस्थिती कायम राहणार का, अशी भीती अशोक चव्हाण आणि त्यांच्या कन्या श्रीजया यांना असणार.

निवडणूक तीन महिन्यांवर असताना महायुती सरकारने लाडकी बहीण ही योजना आणली आहे. याअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये मिळणार आहेत. निवडणुकीच्या तोंडावर आणलेली ही योजना महायुतीची परिस्थिती सांगून जाणारी आहे. भाजपने राज्यातील दोन पक्ष फोडल्याचा राग लोकांनी लोकसभेच्या निवडणुकीत महायुतीवर काढला आहे.

विधानसभेला लोकांचा हा राग संपणार की कायम राहणार, याचीही चिंता श्रीजया यांना असणार. दोनवेळा मुख्यमंत्री राहिलेले अशोक चव्हाण यांचा भाजपप्रवेश काँग्रेस आणि भाजपच्याही मतदारांना रुचला नव्हता. शंकरराव चव्हाण यांना राज्यातील जलसंस्कृतीचे जनक असेही म्हटले जाते. राज्यातील अनेक मोठ्या जलप्रकल्पांची उभारणी त्यांच्या कार्यकाळात झाली. असे सांगितले जाते, की शंकरराव हे कंत्राटदारांना आपल्या आजूबाजूलाही फिरकू द्यायचे नाहीत.

शंकररावांचा वारसा असा समृद्ध आहे. अशोक चव्हाणांचा वारसा तितका समृद्ध आहे का, हा वादाचा विषय आहे. शंकररावही दोनवेळा मुख्यमंत्री होते, अशोक चव्हाणही दोनवेळा मुख्यमंत्री होते, तरीही श्रीजया यांना आजोबांची आठवण आली. मी शंकररावांची नात आहे, मला साथ द्या, असे त्या म्हणाल्या. मी शंकररावांची नात, अशोक चव्हाणांची कन्या आहे, मला साथ त्या असे त्या म्हणाल्या नाहीत. तसे पाहता भोकर मतदारसंघ हा चव्हाण कुटुंबीयांचा बालेकिल्ला समजला जातो. मात्र लोकसभा निवडणुकीनंतर चित्र बदलले आहे.

अशोक चव्हाणांच्या भाजप प्रवेशानंतरचे हे चित्र आहे आणि ते चव्हाण पिता-पुत्रीला चिंतेत टाकणारे आहे. त्यामुळेच कुणी माघार घेत नाही किंवा जिद्द सोडत नाही. चव्हाण कुटुंबीयही जिद्द सोडणार नाहीत. श्रीजया या शंकररावांच्या नात आहेत, हे सर्वांना माहीत आहे. त्यांना त्याची योग्य वेळी जाहीरपणे आठवण करण्याची गरज भासली, ही लोकशाहीची, लोकांची ताकद आहे. (Edited By : Sachin Waghmare)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT