Karnataka Congress politics : कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदाचा सिध्दरामय्या यांनी गुरूवारी राजीनामा दिला. राज्यात सर्वाधिक काळ मुख्यमंत्रिपद भुषविलेल्या सिध्दरामय्या यांना दुसऱ्या टर्मचा कार्यकाळ पूर्ण करता आला नाही. काँग्रेस हायकमांडच्या आदेशानुसार राजीनामा देत आपण नव्या मुख्यमंत्र्यांसाठी वाट मोकळी कल्याचे त्यांनी राजीनामा दिल्यानंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले. आता उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार हे राज्याचे नव मुख्यमंत्री असतील.
नव्या मुख्यमंत्र्यांसाठी वाट मोकळी करून दिल्याचे सिध्दरामय्या म्हणाले असले तरी शिवकुमार यांच्यासाठी ही वाट बिकट असणार आहे. याचे संकेत खुद्द सिध्दरामय्या यांनीच बुधवारी दिले आहेत. कर्नाटकच्या राजकारणात सिध्दरामय्या यांनी आपली मजबूत पकड बनविलेली आहे. प्रामुख्याने मागील दोन दशकांत त्यांनी 'अहिंदा' म्हणजेच अल्पसंख्यांक, मागासवर्ग आणि दलित समाजात आपली लोकप्रियता वाढविली आहे. हीच लोकप्रियता शिवकुमार यांच्यासाठी अडचणीची ठरण्याची शक्यता आहे.
सिध्दरामय्या यांनी बुधवारी राजीनामा देण्याच्या काही तास आधी राज्यातील जातनिहाय सर्वेक्षणाचा अहवाल स्वीकारला. ही एक साधारण घटना नाही. राजीनामा देण्याआधी त्यांनी हा अहवाल स्वीकारत शिवकुमार यांच्यासह दिल्लीतील नेत्यांनाही एकप्रकारे आव्हान दिल्याची चर्चा आहे. या अहवालाच्या आधारे राज्यात संबंधित जातींना आरक्षण किंवा इतर सवलत, विविध लोकल्याणकारी योजनांची अंमलबजावणी करण्याची कसरत शिवकुमार सरकारला करावी लागणार आहे.
कर्नाटकमध्ये लिंगायत आणि वोक्कालिगा हा समाजही मोठा आहे. या दोन्ही घटकांनी जातनिहाय सर्व्हेवर आक्षेप घेतला होता. विशेष म्हणजे शिवकुमार हे वोक्कालिगा समाजातील आहेत. सिध्दरामय्या यांनी एकप्रकारे शिवकुमार यांना कात्रीत पकडले आहे. २०२३ च्या निवडणुकीवेळी राज्यात काँग्रेसची सत्ता येण्यासाठी अहिंदा फॅक्टरसह वोक्सालिगा समाजाची एकजुटही कारणीभूत ठरली आहे. त्यामुळे शिवकुमार यांनी अहवालातील शिफारशींचा अंमलबजावणी करताना ताकही फुंकून प्यावे लागणार आहे, असे दिसते.
मुख्यमंत्री म्हणून सिध्दरामय्या यांनी अहवाल स्वीकारला असला तरी त्याला कॅबिनेटची मंजुरी मिळणे आणि त्यातील शिफारशींची प्रत्यक्ष अंमलबाजवणी करणे, हे खरे आव्हान असणार आहे. शिवकुमार यांचा मुख्यमंत्रिपदाचा कार्यकाळ याचसाठी महत्वाचा ठरणार आहे. २०२८ ची विधानसभा आणि त्यानंतर वर्षभरात येणारी लोकसभा निवडणूक शिवकुमार यांचे खरे टार्गेट असेल. या दोन्ही निवडणुकांमध्ये 'अहिंदा' फॅक्टरसह वोक्कालिगा समाजाची मते गेमचेंजर ठरणारी आहेत. शिवकुमार यांना ही मते शाबूत ठेवण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागेल, हे निश्चित.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.