Devayani Farande, Sima Hirey, Rahul Dhikle  Sarkarnama
विश्लेषण

BJP Politics : नाशिकमधील भाजप आमदारांना फडणवीस-महाजन काहीच विचारेनात; 'तोंड दाबून बुक्क्यांचा मार'

BJP Politics : राज्यात देवेंद्र फडणवीस यांचे सरकार सत्तेत आल्यापासून ना फडणवीस या आमदारांची दखल घेतायत ना जळगाववरून नाशिकमध्ये आलेले मंत्री गिरीश महाजन काही विचारतात.

Sampat Devgire

Nashik BJP News : भाजपसाठी त्यांचा प्रत्येक कार्यकर्ता महत्वाचा असतो, असा आतापर्यंत या सर्वांचा समज होता. पण नाशिकमधील भाजपच्या आमदारांचीच कोणी दखल घेत नाही, असे चित्र आहे. त्यामुळे कार्यकर्ते तर खूप लांबची गोष्ट आहे. फडणवीस सरकार सत्तेत आल्यापासून ना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या आमदारांची दखल घेतायत ना जळगाववरून नाशिकमध्ये आलेले मंत्री गिरीश महाजन काही विचारतात. दोघेही दोघांच्या पातळीवर जिल्ह्याचे निर्णय घेतात आणि जाहीर करतात. नाईलाजास्तव या आमदारांना तो निर्णय स्वीकारावच लागतो. पण आता हा तोंड दाबून बुक्क्यांचा मार बसं झाला, असे सर्व आमदार खाजगीत म्हणत आहेत.

मंत्रिपदासाठी डावललं :

राष्ट्रवादी काँग्रेसचे नाशिकमध्ये 7 आमदार असून त्यातील 3 मंत्री आहेत. त्यापाठोपाठ भाजपचे 5 आमदार आहेत. पण या पाचपैकी फडणवीस यांना मंत्रिपदासाठी एकही आमदार पात्र वाटला नाही. जळगावमधील गिरीश महाजन यांना नाशिकमध्ये आणून त्यांच्याकडे पालकमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली. पण अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आवाज उठवताच या निर्णयाला स्थगिती देण्यात आली.

विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांनीच मंत्रिपदाचा शब्द निवडणूक प्रचारात दिला होता. यंदा कुंभमेळा होत असल्याने नाशिकच्या भाजपच्या किमान एका आमदाराला संधी मिळेल अशी अपेक्षा होती. त्याऐवजी नाशिकचा कुंभमेळा जिल्हा बाहेरच्या मंत्र्यांकडून हाताळला जात आहे. पक्षातील वरिष्ठ नेते देखील जिल्हा बाहेरच्या नेत्याला नाशिकचे नेतृत्व देत असल्याने नागरिकांमध्ये तो चर्चेचा विषय आहे.

कुंभमेळा नियोजनावर जळगावचे वर्चस्व :

मंत्रिपदी डावलल्यानंतर कुंभमेळ्यासाठीही भाजपच्या आमदारांना डावललं जात आहे. सिंहस्थ कुंभमेळा हा जागतिक उत्सव मानला जातो. भारतीय जनता पक्षाच्या दृष्टीने तो पक्षाला मायलेज देणारा उत्सव आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या आतापर्यंत 4 बैठका झाल्या. या बैठकांसाठी सर्व 4 मंत्र्यांसह सर्वच लोकप्रतिनिधींकडे कानाडोळा करण्यात आला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सिंहस्थ कुंभमेळ्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी एक हाती सर्व नियोजन आपल्या हाती ठेवले आहे. आतापर्यंत फडणवीस यांच्या उपस्थितीत 2 बैठका झाल्या आहेत. त्यामुळे सिंहस्थ कुंभमेळ्याकडे शासन गांभीर्याने पाहते हे स्पष्ट झाले आहे. एका बाजूला जिल्ह्यातील आमदारांना कोणी विचारेना अशी स्थिती असताना चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी कुंभमेळ्याच्या बैठकीला उपस्थिती लावली. त्यामुळे जिल्ह्यातील भाजप आमदारांचा जास्तच जळफळाट झाला.

पक्षप्रवेशांमध्येही बेदखल :

शहर भाजपमध्ये कोणाला प्रवेश द्यायचा यावरही अंतिम मोहोर गिरीश महाजन यांचीच असते. विधानसभा निवडणुकीत सुधाकर बडगुजर यांनी आमदार सीमा हिरे यांच्या विरोधात शिवसेनेची उमेदवारी केली. यावेळी बडगुजर यांच्यावर गुन्हेगारीसह मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी सलीम कुत्ता यांच्याशी देखील संबंध जोडण्यात आले. आमदार हिरे यांचं पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी बडगुजर यांना भाजप पक्षात प्रवेश देऊ नये अशी आक्रमक भूमिका घेतली होती. मात्र या सर्वांच्या नाकावर टिचून बडगुजर यांचा प्रवेश झाला. आता ते जलसंपदा मंत्री महाजन यांच्या गुड बुक मध्ये आहे.

नाशिक पूर्व मतदारसंघात विधानसभा निवडणुकीत गणेश गीते यांनी भाजप सोडून शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश केला. उमेदवारी मिळवून भाजपचे आमदार ढिकले यांच्या विरोधात निवडणूक लढवली. त्यात डिकले यांनी गीते यांचा पराभव केला. गीते यांच्यावर महापालिका भूसंपादनाबाबत साडेआठशे कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. आमदार ढिकले यांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे याबाबत भूमिका मांडली होती. मात्र जलसंपदा मंत्री महाजन यांनी गीते यांचा प्रवेश प्रतिष्ठेचा केला. त्यामुळे आमदार ढिकले यांचे समर्थक नाराज झाले.

भाजप आमदार देवयानी फरांदे आणि सीमा हिरे हे तिसऱ्यांदा निवडून आल्या आहेत. सिंहस्थ कुंभमेळा प्रत्यक्षात आमदार राहुल ढिकले यांच्या मतदारसंघात होतो. आमदार ढिकले हे देखील दुसऱ्यांदा आमदार झाले आहेत. भाजपकडे शहरात आमदारांची अनुभवी टीम असताना त्यांच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्याची भूमिका तर मंत्री आणि राज्य शासनाने घेतली नाही ना? असा प्रश्न पडतो. या आमदारांचे महत्त्व कमी करण्यासाठी जाणीवपूर्वक राजकीय डावपेच सुरू आहेत, त्याची प्रचिती यापूर्वी अनेकदा आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT