Rahul Gandhi-Narendra Modi Sarkarnama
विश्लेषण

Rahul Gandhi : ....म्हणून राहुल गांधींच्या नव्या राजकारणाची मोदींसह मित्रपक्षांनाही भीती वाटत असेल?

Hariyana Assembly Election Result : भारत जोडो यात्रांच्या माध्यमातून राहुल गांधी यांनी देशाला समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे. लोकांच्या, तरुणांच्या राजकीय नेत्यांकडून काय अपेक्षा आहेत, हेही जाणून घेतले आहे. त्यानुसार ते राजकारण करत आहेत. हरियाणात काँग्रेसची सत्ता आली नाही, तरीही या भीतीतूनच मित्रपक्षांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी राहुल गांधींवर टीका करत असतील का?

अय्यूब कादरी

Rahul Gandhi Politics : हरियाणा विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची सत्ता येऊ शकली नाही, पक्षाच्या जागा मात्र वाढल्या. भाजपने सत्ता कायम राखली, या पक्षाच्याही जागा वाढल्या. सर्व एक्झिट पोलमध्ये काँग्रेसच्या विजयाचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. प्रचारादरम्यान हरियाणात फिरलेले पत्रकार, राजकीय विश्लेषकांनाही काँग्रेसच्या विजयाची खात्री होती. मात्र सर्वांचेच अंदाज चुकले आणि भाजपने सलग तिसऱ्यांदा सत्ता कायम राखली.

पराभूत झाल्यानंतर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यावर टीकेची झोड उठवण्यात आली. ही टीका करण्यात इंडिया आघाडीतील मित्रपक्षांसह विरोधी पक्षांचे नेते, खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदीही आघाडीवर होते. राहुल गांधी यांचा पक्ष सत्तेत आलेला नाही. सोबत न घेतल्यामुळे मित्रपक्षांनी टीका केली, खदखद बाहेर काढली, हे एकदा समजण्यासारखे आहे,

पंतप्रधान मोदी (Narendra Modi ) यांनी टीका करणे गोंधळात टाकणारे आहे. मोदी हे राहुल गांधी आणि काँग्रेसवर उगाच टीका करत नाहीत. हरियाणात काँग्रेसचा पराभव झाला आणि राहुल गांधी यांच्या नव्या राजकारणाच्या मार्गातील आणखी एक अडथळा दूर झाला, हे मोदी यांच्या लक्षात आले असावे. त्यामुळेच मोदी हे काँग्रेस, राहुल गांधी यांच्यावर टीका करत आहेत.

हरियाणात आम आदमी पक्षाशी आघाडी करावी, अशी सूचना राहुल गांधी यांनी स्थानिक नेत्यांना एका बैठकीत केली होती, असे सांगितले जाते. मात्र, काँग्रेसचे हरियाणातील नेते, माजी मुख्यमंत्री भूपिंदरसिंह हुड्डा यांना स्वबळाववर विजयाचा आत्मविश्वास होता. त्यामुळे त्यांनी राहुल गांधी यांच्याकडे दुर्लक्ष केले. हुड्डा यांचा हा आत्मविश्वास घातक ठरला. प्रचारादरम्यानचा कुमारी सैलजा नाराज असल्याच्या बातम्या पसरल्या, त्याचाही फटका काँग्रेसला बसला. काँग्रेसेचे जुने नेते राहुल गांधी यांचे ऐकत नाहीत, असे सांगितले जाते. भूपिंदरसिंह हुड्डा यांच्याबाबतही असाच अनुभव आला.

राहुल गांधी यांनी तरुण नेत्यांची फळी उभी केली आहे. ते तरुणांना जास्त महत्व देतात, त्यामुळे ज्येष्ठ नेत्यांमध्ये नाराजी असते. पंतप्रधान मोदी यांच्यासह काँग्रेसच्या मित्रपक्षांना राहुल गांधी यांच्या ज्या नव्या राजकारणाची भीती वाटते, ते येथून पुढे सुरू होणार असते.

भूपिंदरसिंह हुड्डा यांचे वय 77 वर्षे आहे. पुढची निवडणूक येईल, त्यावेळी ते 82 वर्षांचे असतील. त्या वयात ते किती सक्रिय राहतील, हे सांगता येत नाही. त्यामुळे हरियाणाच्या राजकारणात आता तरुणांना संधी मिळण्याची शक्यता आहे. लवचिक भूमिका न घेणाऱ्या, बदलत्या राजकारणापासून दूर राहणाऱ्या ज्येष्ठ नेत्यांना राहुल गांधी हे एकेक करून बाजूला सारत आहेत किंवा असे नेते आता स्वतःच बाजूला होत आहेत.

मध्य प्रदेश, राजस्थानातही ज्येष्ठ नेत्यांबाबत राहुल गांधी यांना असाच अनुभव आला आहे, राजस्थानात सत्ता कायम राखण्याची नामी संधी काँग्रेसकडे होती, मात्र अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्यातील वादामुळे ती संधी वाया गेली. अशोक गेहलोत हे माघार घ्यायला तयार झालेच नव्हते. राजस्थानात काँग्रेसला सत्तेत आणण्यात सचिन पायलट यांचा मोलाचा वाटा होता. असे असतानाही गेहलोत यांनी पायलट यांच्याशी कायम संघर्ष केला. परिणामी, राजस्थानातून काँग्रेसची सत्ता गेली. गेहलोत आणि पायलट यांच्यात वाद झाला नसता तर चित्र वेगळे दिसले असते.

अशोक गेहलोत यांचे वय 73 वर्षे आहे. पुढील निवडणुकीपर्यंत त्यांचे वय 78 वर्षे होईल. त्यावेळी पक्षात त्यांचे किती वजन राहील, याबाबत शंकाच आहे, कारण राहुल गांधी यांना तरुणांच्या खांद्यावर जबाबदारी टाकायची आहे. ज्येष्ठ नेत्यांचीही पक्षाला अत्यंत गरज असते, मात्र ते हेकेखोर नसले पाहिजेत, सर्वांना सामावून घेणारे असले पाहिजेत. राजकीय पक्ष, राजकीय नेत्यांकडून तरुण पिढीच्या अपेक्षा काय आहेत, हे त्यांच्या लक्षात आले पाहिजे. हुड्डा आणि गेहलोत यांच्याबाबतीत असे झाले नाही. त्यामुळे काँग्रेसची पीछेहाट झाली.

मध्य प्रदेशात कमलनाथ यांनाही बदलते राजकारण कळाले नाही. त्यांचे वय 77 वर्षे आहे. मध्य प्रदेशात राहुल गांधी यांनी तरुण नेत्यांना सक्रिय केले आहे. राजस्थानात आता सचिन पायलट आहेत. हरियाणातही आगामी काळात तरुण नेते समोर आलेले दिसतील. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे वय 76 वर्षे आहे. पुढच्या निवडणुकीत त्यांची जागा उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार घेणार, हे निश्चित मानले जात आहे. तिकडे, तेलंगणात मुख्यमंत्री म्हणून तरुण नेते रेवंथ रेड्डी यांना संधी मिळालेली आहे.

भारत जोडो यात्रा आणि भारत जोडो न्याय यात्रेच्या माध्यमातून राहुल गांधी यांनी देशाला, नागरिकांच्या, तरुणांच्या भावनांना समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे. तरुणांच्या अपेक्षा काय आहेत, हे त्यांनी समजून घेतले आहे. त्यानुसारच त्यांची पुढील राजकारणाची दिशा असेल, तरुणांना अधिक संधी मिळेल. त्यामुळे तरुणवर्ग काँग्रेसकडे आकर्षित होण्याची शक्यता आहे. राहुल गांधी जे राजकारण करत आहेत किंवा त्यांना काँग्रेसचे जे राजकारण अपेक्षित आहे, तसे अन्य पक्षांमध्ये दिसून येत नाही.

नेमकी हीच भीती काँग्रेसचे मित्रपक्ष आणि विरोधकांनाही वाटत असावी. भाजपमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासमोर कोणाचेही काहीही चालत नाही. काँग्रेसमध्ये तशी परिस्थिती नाही. राहुल गांधी हे काँग्रेसचे अध्यक्ष नसले तरी ते सर्वोच्च नेते आहेत. त्यांच्यासमोर कोणताही नेता एखाद्या गोष्टीला नकार देऊ शकतो.

तरुण पिढीला राजकारण करतानाही पक्षांतर्गत असे स्वातंत्र्य हवे आहे. पक्षात ही संस्कृती रुजवण्यास राहुल गांधी यांनी सुरुवात केली आहे. विरोधक आणि मित्रपक्षांना भीती वाटत असेल तर याच राजकारणाची आणि यातूनच काँग्रेस पराभूत झाल्यानंतरही पंतप्रधान मोदी राहुल गांधी यांच्यावर, काँग्रेसवर टीका करत असतात.

Edited By : Vijay Dudhale

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT