Kolhapur Sarkarnama
विश्लेषण

Kolhapur News : दक्षिण-करवीरच्या नेत्यांना राजकारण हवे पण हद्दवाढ नको!

Kolhapur boundary extension : कोल्हापूरची हद्दवाढ झाल्यास राजकीय अस्तित्वाला धक्का मिळेल? अशी भीती करवीर आणि दक्षिण मधील आजी आणि माजी आमदारांना आहे.

Rahul Gadkar

Kolhapur Boundary News : गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीला राजकीय इच्छाशक्ती नसल्यामुळेच गती मिळाली नाही. याउलट शहरालगत असलेल्या विधानसभा मतदारसंघातील आजी माजी आमदार यांचाच या प्रश्नात खोडा घालण्याचे काम सुरू आहे. कोल्हापूरची हद्दवाढ झाल्यास राजकीय अस्तित्वाला धक्का मिळेल? अशी भीती करवीर आणि दक्षिण मधील आजी आणि माजी आमदारांना आहे. शहरातीलच सेवा उपभोगायच्या मात्र शहरांच्या प्रश्नांना फाट्यावर मारायचे. हीच भूमिका हद्दवाढीबाबत या प्रमुख नेत्यांची राहिली आहे.

कोल्हापूर दक्षिणचे विद्यमान आमदार अमल महाडिक, माजी आमदार ऋतुराज पाटील, काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील(Satej patil), राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक, तर करवीर विधानसभा मतदारसंघाचे आमदार चंद्रदीप नरके यांची भूमिका देखील गुलदस्त्यात आहे. ना विरोध करायचा ना समर्थन करायचं? हीच भूमिका ठेवून राजकारण सुरू आहे. कोल्हापूर विकास कामात प्रत्येक गोष्टीत राजकारण हवे पण हद्द वाढ नको हीच भूमिका सध्या तरी आजी आणि माजी आमदारांची दिसत आहे.

नगरपालिका मधून महानगरपालिकेचे निर्मिती झाल्यानंतर कोल्हापूर शहराची एक इंच देखील हद्दवाढ झालेली नाही. त्यामुळे कोल्हापूरकरांना मूलभूत सुविधेसह इतर अडचणींना सामोरे जावे लागत आहे. केंद्र सरकारच्या नियमानुसार दहा लाखाच्या पुढे लोकसंख्या असलेल्या शहराला केंद्र सरकारकडून निधी मिळत असतो. यासाठी हद्दवाढ आवश्यक आहे. त्यासाठी कोल्हापूर शहरा नजीक असणाऱ्या गावांना कोल्हापुरात समावेश घेण्यासाठी आराखडा तयार करण्यात आला होता.

कोल्हापूर दक्षिण आणि करवीर विधानसभा मतदारसंघातील सर्वाधिक गावे असल्याने या गावांना हद्दवाढ मध्ये घेण्यासाठी एकाही नेत्याने राजकीय इच्छाशक्ती दाखवली नाही. कोल्हापूर महानगरपालिकेत सत्ता असूनही शहराच्या या मागणीकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष केले आहे. तर दुसरीकडे दक्षिणच्या विद्यमान आमदारांना कोल्हापूर महानगरपालिकेच्या राजकारणात नगरसेवक निवडून यायला हवे, पण हद्द वाढीच्या भूमिकेत राहायला नको. हीच मानसिकता आहे.

कोल्हापूर(Kolhapur) दक्षिण विधानसभा मतदारसंघात शहरातील अनेक उपनगरांचा समावेश आहे. काही ग्रामीण भाग या मतदारसंघांमध्ये येतो. वास्तविक विधानसभा निवडणुकीत ग्रामीण भागातील नागरिकांचा रोष नको, त्यामुळे हद्द वाढीला या मतदारसंघातील एकही आजी-माजी आमदार विरोध अगर समर्थन देखील करताना दिसत नाही. फक्त वाढ झाल्यास रेडीरेकनर नुसार जमिनीला मूल्यांकन येणार आहे.

शिवाय महानगरपालिकेकडे घरफाळा, पाणीपट्टी भरावी लागणार आहे. शहरातील समस्या मिटेनात, हद्दवाढ केल्यास आमच्या मूलभूत सुविधा कशा भागवणार? असं सवाल ग्रामीण भागातील जनतेने केले आहे. मात्र ग्रामीण भागातील या नागरिकांची समजूत काढण्यात देखील या आजी माझी आमदारांनी घेतली नाही. विधानसभा निवडणुकीचे गणित डोळ्यासमोर ठेवून करवीर आणि दक्षिण मधील आमदारांची सध्या तरी हद्दवाढीएला विरोध आहे.

दुसरे मोठे कारण म्हणजे कुंभी, छत्रपती राजाराम, डॉ. डी वाय पाटील, भोगावती साखर कारखान्यांना याच पट्ट्यातून कारखान्याला ऊस जात असल्याने आणि या कारखान्यातील सत्ता याच नेत्यांकडे असल्याने उसाचे गाळप कमी होईन, या भीतीने हद्दवाढला विरोध आहे. हद्दवाढ झाल्यास जमिनीच्या किमती वाढतील. जमिनीच्या किमती वाढल्या तर ऊस उत्पादन कमी होईल. त्याचा थेट परिणाम कारखान्यावर होईल, याची भीती देखील आजी-माजी आमदारांना आहे.

तर त्याला पूरक व्यवसाय असलेल्या दुग्ध व्यवसायावर देखील त्याचा परिणाम होईल. परिणामी सहकार संस्थेतील ठराव कमी होतील याची भीती देखील आजी-माजी आमदारांना आहे. कारण जिल्ह्यातील राजकारण पाहता सहकारी संस्थांवरच यांचे राजकारण अवलंबून आहे. त्यामुळे लोकांना दुखावण्यापेक्षा शहरवासीयांना त्रास दिलेला बरा. हीच मानसिकता या आजी-माजी आमदारांची आहे की काय? असा सवाल उपस्थित होत आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT