Kolhapur News: विरोधी पक्षनेते आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांचा कोल्हापूर जिल्ह्यातील दौरा चर्चेचा विषय ठरला. वरपे कुटुंब आणि क्षीरसागर यांच्या कौटुंबिक वादात ठाकरे गटाने आधीच उडी घेऊन तमाशा केला असताना अंबादास दानवे यांनी येऊन पुन्हा एकदा त्यावर मीठ चोळल्याची भावना सर्वसामान्य नागरिकांची आहे.
दानवे यांनी वरपे कुटुंबियांची भेट घेतल्याने आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते व राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या गटाकडून झालेल्या प्रत्युत्तरामुळे त्याला चांगलेच राजकीय वळण प्राप्त झाले. पण कपभर चहासाठी विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांना कोल्हापुरातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडवायचा होता का ? वारंवार पोलिसांनी विनंती करूनही दानवे वरपे यांच्या घरी का गेले ? पोलिस प्रशासनाला वेठीस का धरले ? हे प्रश्न मात्र राजकीय वर्तुळाला पडले आहेत. (Ambadas Danve visit Kolhapur)
तीन महिन्यापूर्वी राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर आणि त्यांच्याच आपार्टमेंटमध्ये समोर राहणारे राजेंद्र वरपे या दोन कुटुंबात कौटुंबिक कारणाने वाद झाला होता. या वादात माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी केलेल्या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. संपूर्ण प्रकारानंतर वरपे कुटुंबियांनी पोलिसांकडे दाद मागितली होती. राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्यावर कारवाई व्हावी, अशी स्पष्ट मागणी वरपे कुटुंबियांची होती.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
खरे पाहायला गेलं तर कौटुंबिक वादात माजी आमदार राहिलेले क्षीरसागर यांनी हा अपार्टमेंटच्या भिंतीबाहेर न येऊ देता त्यातून मार्ग काढणे अपेक्षित होते. तर दुसरीकडे क्षीरसागर आणि वरपे कुटुंबियांच्या भांडणात ठाकरे गटाने उडी घेतली. ठाकरे गटाच्या एका पदाधिकाऱ्यांनी वरपे कुटुंबातील मुलाचा सत्कार करून क्षीरसागर गटाला डीवचण्याचा प्रयत्न केला. क्षीरसागर यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी ठाकरे गटांनी केल्यानंतर विधानसभेची पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी क्षीरसागर यांच्या विरोधात भूमिका मांडली.
खरे पाहायला गेले तर दोन कुटुंबात सुरू झालेला हा वाद विधानसभेपर्यंत पोहोचला. या संपूर्ण प्रकरणानंतर गेल्या दोन महिन्यापासून वातावरण शांत होते. तरीही क्षीरसागर यांच्यावर गुन्हा नोंद झाला नसल्याचा आरोप ठाकरे गटाचा आहे. मात्र त्यापूर्वी शनिवार पेठेतील शिवगंगा अपार्टमेंटमध्ये समझोता एक्सप्रेस धावली होती. वरपे आणि क्षीरसागर यांच्यात या प्रकरणावर पडदा टाकण्याची चर्चा झाली असल्याचे सांगण्यात येते. हे प्रकरण शांत झाले असताना विरोधी पक्षनेते अंबादास दानवे गुरुवारी कोल्हापूर दौऱ्यावर आले होते.
कोल्हापूर शासकीय विश्रामगृह येथे त्यांनी जनता दरबार घेत नागरिकांसाठी न्याय देण्याची भूमिका मांडली. याच जनता दरबारमध्ये राजेंद्र वरपे हे अंबादास दानवे यांच्याकडे राजेश क्षीरसागर यांच्यावर कारवाई व्हावी, तसेच गेल्या दोन महिन्यांपासून पोलिस गुन्हा नोंद करण्यासाठी टाळाटाळ करत असल्याचा आरोप वरपे यांनी दानवे यांच्यासमोर केला असल्याचे सांगितले जाते. त्यावर दानवे यांनी मी पाहून घेतो, असे उत्तर देत वरपे यांना जाण्यास सांगितले.
व्यासपीठावरून वरपे खाली येतात पुन्हा एकदा ठाकरे गटाच्या एका पदाधिकाऱ्याने माध्यमांचे कॅमेरे बघून वरपे यांना पुन्हा अंबादास दानवे यांच्याकडे घेऊन गेले. परिस्थितीची माहिती घेत दानवे यांनी जिल्हा पोलिस प्रमुख महेंद्र पंडित यांना संपर्क साधला. वरपे कुटुंबियांना न्याय देण्याची भूमिका दानवे यांची सहाजिकच असली पाहिजे. वरपे कुटुंबाला दानवे यांनी धीर आणि दिलासा देणे स्वाभाविकच होते. पण परिस्थिती काय उद्भवू शकते, हे देखील समजून घेणे गरजेचे होते.
वरपे कुटुंबियावर झालेल्या अन्यायाविरोधात त्यांनी आवाज उठवला पाहिजे हे योग्य आहे. त्याबद्दल दानवे यांनी जिल्हा पोलिस प्रमुख यांची कानउघडणी केली. जर जिल्हा प्रशासन दबावाला बळी पडत असेल तर विरोधी पक्ष नेता म्हणून दानवे यांनी जिल्हा पोलिस प्रशासनाची कान उघडणी करणे गरजेचं आहे. येथेपर्यंत सर्वकाही झाले असताना अंबादास दानवे यांनी राजेंद्र वरपे यांना आम्ही तुमच्या घरी चहा प्यायला येणार असल्याचे सांगितले.
वरपे यांचे घर क्षीरसागर यांच्या समोरच असल्याने दोन्ही गट आम्ही सामने येण्याची भीती होती. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी वरपे यांच्या कुटुंबियांना भेट घेण्याचे जाहीर करताचं इकडे राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या कार्यकर्त्यांनी देखील त्यांच्या घराबाहेर गर्दी केली. शिवसेनेचे दोन्ही गट आमने-सामने येणार या भीतीने जिल्हा पोलिस प्रशासनाने योग्य काळजी घेत वारंवार दानवे यांना वरपे कुटुंबाकडे न जाण्याची विनंती केली. मात्र तरीही दानवे आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. तिकडे क्षीरसागर यांचे कार्यकर्तेही मोठ्या प्रमाणात जमले होते.
दानवे यांना प्रत्युत्तर देण्यासाठी शिरसागरांची कार्यकर्त्यांची फौज तयार होती. परिसरात कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये यासाठी जिल्हा प्रशासनाने तात्काळ हालचाली करत त्या ठिकाणी ज्यादा कुमक मागून घेतली. जवळपास 300 पेक्षा अधिक पोलिसांचा गराडा शिवगंगा अपार्टमेंट जवळ होता. अचानक झालेल्या प्रकारामुळे सर्वसामान्य नागरिकही भयभीत झाले होते. शेवटी व्हायचं ते झालं. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे वरपे यांच्या घरी गेले. त्यांच्याशी गप्पा करून एक कप चहा घेऊन आले. पण दानवे यांच्या या भूमिकेमुळे शनिवार पेठेत जाणारे रस्ते पोलिसांनी बंद केले होते.
शिवाय पोलिसांनाही वेठीस धरले होते. त्याचा नाहक त्रास सर्वसामान्यांना सहन करावा लागला. शिवसेनेत दोन गट पडल्यानंतर सहाजिकच ठाकरे गट आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट यांच्यात वादाचे प्रसंग घडले आहेत. दोन्हीही गट कोल्हापूर शहरात एकमेकांना पाण्यात बघत आहेत. अशा परिस्थितीत कायदा आणि सुव्यवस्था बिघडला असता तर त्याची जबाबदारी कोण घेणार होतं ? ठाकरे गट आणि शिंदे गट राजकारण करत राहील. पण सर्वसामान्य नागरिकांचे नुकसान झाले असते तर त्याला जबाबदार कोण ? याचे उत्तर अंबादास दानवे देणार का ?
(Edited By-Ganesh Thombare)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.