Sunetra Pawar Sarkarnama
विश्लेषण

Sunetra Pawar In Beed : अजित पवारांचे अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्याचं ध्येय अन् 'राष्ट्रवादी' समोर संकटांचा डोंगर, सुनेत्रा पवार पहिल्यांदाच बीडमध्ये!

Sunetra Pawar NCP Politics Visits Beed : अजित पवाराच्या दुर्दैवी निधनानंतर राज्याच्या राजकारणात मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या. आता तीन महिन्यानंतर आज (ता.1) महाराष्ट्र दिनाच्या ध्वजवंदनासाठी सुनेत्रा पवार बीडमध्ये येणार आहेत.

Datta Deshmukh

Beed Political News : बीडचे पालकमंत्रीपद स्वीकारत दिवंगत नेते अजित पवार यांनी येथील जनतेला विकासाचे स्वप्न दाखवले. या स्वप्नाच्या पुर्तीकडे वाटचाल करत असतानाच एका दुर्दैवी विमान अपघातात अजित पवारांची दुर्दैवी एक्झीट झाली. आभाळा एवढे दुःख पचवत सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारली. त्यासोबतच बीड जिल्ह्याचे पालकत्व घेत अजित पवारांनी बीडकरांसाठी पाहिलले विकासाचे स्वप्न पूर्ण करण्याचा विश्वासही त्यांनी दिला.

अजित पवारांच्या दुर्दैवी निधनानंतर राज्याच्या राजकारणात मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या. आता तीन महिन्यानंतर आज (ता.1) महाराष्ट्र दिनाच्या ध्वजवंदनासाठी सुनेत्रा पवार बीडमध्ये येणार आहेत. बीडचा त्यांचा हा दौरा अनेक अर्थाने महत्त्वाचा ठरणार आहे. बीडकरांच्या विकासकामाला गती देतानाच जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची घडी विस्कटणार नाही यांची खबरदारही सुनेत्रा पवार यांना घ्यावी लागणार आहे. या दौऱ्यानंतर सुनेत्रा पवार या पालकमंत्री म्हणून वारंवार बीडला येतील आणि इथले प्रश्न सोडवतील, असा विश्वास या निमित्ताने बीडकरांना वाटतो.

अजित पवारांनी बीडचे पालकमंत्री पद स्वीकारले तेव्हाची जिल्ह्यातील राजकीय, सामाजिक परिस्थिती बिकट होती. यावर मात करत त्यांनी बीडच्या विकासाला वेग दिला. वाढती गुन्हेगारी, गुंडगिरी, वाळुमाफिया, खून, दरोडे अशा वातावरणातून बीडला विकासाच्या ट्रॅकवर आणण्याचे शिवधनुष्य अजित पवारांनी उचलले होते. पण त्यांच्या अचानक अपघाती जाण्याने या सगळ्या प्रक्रियेला ब्रेक लागला. परंतु सुनेत्रा पवार यांनी ही जबाबदारी आता आपल्या खांद्यावर घेतली आहे. आजचा त्यांचा बीड दौरा अनेक दृष्टीने महत्त्वाचा ठरणार आहे.

अजित पवारांनी जिल्ह्याच्या विकासासाठी अखलेला रोडमॅप प्रत्यक्षात उतरवण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा आणि पक्षाचे लोकप्रतिनिधी, पदाधिकाऱ्यांशी संपर्क, चांगले काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना पाठबळ आणि खाबुगीरी करणाऱ्यांना वठणीवर आणण्यासाठी कडक भूमिका घ्यावी लागेल. दुष्काळी पार्श्वभूमी, पाणीटंचाई आणि शेतकरी प्रश्नांचा विचार करून त्यांना जिल्ह्यावर विशेष लक्ष केंद्रीत करावे लागेल.

अधिकाऱ्यांवर वचक राहणार

विमानतळ, सीट्रीपलआयटी, तारांगण असे नाविण्यपूर्ण प्रकल्प हाती घेत अजित पवारांनी प्रशासनातील खाबुगीरीवर वचक बसवला. साडेपाच लाखांवर ठेवीदारांना फसवणाऱ्या आर्थिक संस्थांमधील कारवायांना वेग दिला. नित्याने प्रमुख अधिकाऱ्यांना संपर्क करुन 'कोणाचाही मुलाहीजा ठेवू नका, जे नियमात आहे तेच करा, भलेही कोणी माझ्या पक्षाचा असला तरी नियम मोडला तर मला अजिबात चालणार नाही', अशी सक्त ताकीद अजित पवारांची असायची.

परिणामी चांगले काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना पाठबळ मिळून गैरकारभार करणाऱ्यांना चाप बसला होता. अजित पवारांच्या कामाचा हाच पॅटर्न सुनेत्रा पवार बीडमध्ये पुढे राबवतील, अशी अपेक्षा आहे. राजकीयदृष्ट्या विचार केला तर जिल्ह्याने कायम पवार कुटूंबियांची साथ दिली. जेष्ठ नेते शरद पवार व त्यानंतर दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या शब्दाचा जिल्ह्यातील मतदारांनी मानच वाढविला. निधी, विकास प्रकल्प आणि पदांच्या माध्यमातून पवारांनीही उतराई केली.

पक्ष संघटन मजबूत करण्यावर लक्ष

मागच्या विधानसभा व नगरपालिका निवडणुकीत महायुतीत राज्यात भाजप मोठा भाऊ ठरला असला तरी जिल्ह्यात पवारांचाच पक्ष वरचढ ठरला. कारण, पक्षात ताकदीचे नेते आहेत. मात्र, अलिकडे संघटनात्मक पातळीवर पक्षाची घडी विस्कटत आहे. जिल्हाध्यक्षांची जिल्ह्यात एंट्री केवळ पालकमंत्री येण्याच्या वेळीच असते. पदाधिकाऱ्यांच्या बैठका, पक्षाच्या शाखा यांचा जणू विसरच पडला आहे. बड्या नेत्यांची तोंडेही चार दिशेला झाली आहेत. यावरही सुनेत्रा पवारांना लक्ष घालावे लागणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT