

Nationalist Congress Party update : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अधिवेशन मागील आठवड्यात मुंबईत पार पडले. अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाल्यानंतर महिनाभरातच पक्षाचे अधिवेशन झाले. त्यामुळे या अधिवेशनाला महत्व प्राप्त झाले होते. अधिवेशनाच्या काही दिवस आधीच सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यंत्रिपदाची शपथ घेतली होती. तेव्हापासून त्यांच्याकडे पक्षाच्या अध्यक्षपदाची धुराही येणार, हे सांगितले जाऊ लागले होते. त्यावर अधिवेशनात शिक्कामोर्तबही झाले. त्या पक्षाच्या अध्यक्षा झाल्या. महाराष्ट्राच्या राजकारणातील ही मोठी घडामोड होती. याच अधिवेशनात इतर महत्वाच्या घडामोडीही घडल्या असून पक्षाच्या पातळीवर त्याला प्रचंड महत्व प्राप्त झाले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फुट पडल्यानंतर अजित पवार यांनी पक्षाचा कारभार जोरकसपणे सांभाळला होता. लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर त्यांच्याच नेतृत्वाखाली पक्षाला विधानसभा निवडणुकीत मोठे यश मिळाले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही पक्षाने अनेक ठिकाणी गुलाल उधळला. पण या रणधुमाळीतच २८ जानेवारीला अजितदादांवर काळाने घाला घातला. त्यांच्या आकस्मिक जाण्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासह संपूर्ण महाराष्ट्र हादरला. पक्षातील अनेक नेते जणू कोलमडून गेले. पण पक्ष कोलमडू नये, यासाठी तातडीने काही निर्णय घेण्यात आले. त्यामध्ये सुनेत्रा पवार यांचा उपमुख्यमंत्रिपदाचा शपथविधी आणि पक्षाचे अध्यक्षपद हे दोन सर्वात मोठे निर्णय होते.
अजितदादांनी उभ्या केलेल्या राष्ट्रवादीला अधिक मजबूत करण्यासाठी सुनेत्रा पवार यांना मोठी कसरत करावी लागणार आहे. हे काम एवढे सोपे नाही. त्यासाठी पक्षातील इतर नेत्यांसह पार्थ पवार आणि जय पवार यांची सोबतही महत्वाची ठरणार आहे. यापार्श्वभूमीवर अधिवेशनात पार्थ पवार यांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर करत पक्षाने त्यांची पुढील राजकीय दिशा स्पष्ट केली आहे. देशपातळीवरील राजकारणात पार्थ पवार यांना पाठवत ती पोकळी भरून काढण्याचा प्रयत्न पक्षाने केला आहे. सुनेत्रा पवार यांना आता राज्यसभा सोडावी लागणार आहे. त्यामुळे पार्थ पवार यांच्यारुपाने पक्षाने दिल्लीच्या राजकारणात तरूण चेहरा उभा करत पक्ष संघटनेला अधिक बळ देण्यासाठी मोठे पाऊल उचलले आहे.
अधिवेशनामध्ये आणखी एक मोठी घडामोड घडली. अजितदादांचे धाकटे पुत्र जय पवार हे पहिल्यांदाच पक्षाच्या अधिवेशनात व्यासपीठावर आणि तेही पहिल्या रांगेत बसले होते. सुनेत्रा पवार या भाषण करण्यासाठी उठल्यानंतर जय हे त्यांच्यासोबत त्यांचे भाषण घेऊन माईकपर्यंत गेले होते. याकडे राजकीय चष्म्यातून पाहिले तर ते नव्या राजकीय नेतृत्वाचे पडघम असल्याचे म्हणायला हरकत नाही. यामागचे कारणही तसेच आहे. सुनेत्रा पवार यांनी आपल्या भाषणामध्ये पक्षातील तरुण कार्यकर्त्यांना संधी देऊन त्यांच्या पाठिशी बळ उभे करण्याचे काम आपल्याला करायचे आहे, असे म्हटले आहे. पुढील काळात पक्षाच्या घटनेनुसार, सभासद नोंदणीसह सर्वच निवडींची प्रक्रिया केली जाणार आहे. या महत्वाच्या कामात आपली ताकदीने साथ मिळावी, असे आवाहन करत सुनेत्रा पवार यांनी आपले भाषण संपविले होते.
सुनेत्रा पवार यांनी पक्षात आगामी काळात तरूणाईला संधी दिली जाईल, असे थेट संकेत दिले आहेत. अर्थात त्यामध्ये जय पवार यांना पक्षामध्ये एखादे पद देत राज्याच्या राजकारणात सक्रीय करण्याची रणनीतीही असू शकते. पुढील काही दिवसांत त्याबाबतचे चित्र स्पष्ट होईल. पण पार्थ यांना दिल्लीत धाडल्यानंतर जय यांना राज्याच्या राजकारणाचा तरूण चेहरा बनविण्यासाठी पक्षातील नेतेही उत्सुक असतील, यात शंका नाही.
अधिवेशनामध्ये पक्षातील आणखी दोन नेत्यांची नावे प्रकर्षाने घेतली गेली. ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांनी सध्याचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडे पुन्हा हे पद द्यावे, असा प्रस्ताव मांडला. त्यामुळे पक्षातील ज्येष्ठ नेत्यांचा पाठिंबा तटकरे यांच्या मागे असल्याचे स्पष्ट झाले आहे. तेच पुन्हा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष होतील, असे संकेत अधिवेशनात मिळाले. दुसरे मोठे नाव म्हणजे प्रफुल पटेल. पक्षातील ज्येष्ठ नेते व मंत्री छगन भुजबळ यांनी आपल्या भाषमादरम्यान पटेलजी, तुम्ही कार्याध्यक्ष आहात. तर यापुढेही कार्याध्यक्ष राहूनच त्यांची (सुनेत्रा पवार) साथ द्या. त्यांना एकट्या सोडू नका. आपली बहीण लवकरच अजितदादांप्रमाणे पक्षाचे काम सांभाळतील. तोपर्यंत त्यांची पूर्ण साथ तुम्ही द्या, असे आवाहन केले.
वळसे पाटील आणि भुजबळ यांची विधाने जाणीवपूर्वक केलेली असावीत. पक्षाची पुढील दिशाच त्यांनी यानिमित्ताने सांगून टाकली आहे. सुनेत्रा पवार या पक्षाच्या राष्ट३य अध्यक्षा असल्या तरी त्यांना पक्षसंघटना चालविण्याचा अनुभव नाही. त्यांना राज्यात तटकरे आणि देशपातळीवर पटेल यांच्यासारख्या अनुभव सहकाऱ्यांची मोठी मदत होणार आहे. पटेल यांच्यासारखा देशपातळीवरील अनुभव सध्यातरी राष्ट्रवादीत कुणाकडे नाही. तर तटकरे यांनी राज्यातील पक्षसंघटनेला बळकटी देण्यासाठी अजितदादांच्या नेतृत्वाखाली कष्ट घेतले होते. त्यामुळे त्यांचा अनुभव राज्यात कामी येऊ शकतो. पक्षात युवकांची मोठी फळी आहे. जय पवार यांच्या रुपाने युवा नेतृत्व पुढे आणत पक्षाकडून तरूणाईला बळ देण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी शक्यता आहे. त्यामुळे पुढील काळात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुनेत्रा पवार, पार्थ पवार, जय पवार, प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे या पाच नावांभोवती राजकारण फिरू शकते.