Supriya Sule Latest News Updates
Supriya Sule Latest News Updates Sarkarnama
विश्लेषण

'फडणवीस पळपुटे, तर राज ठाकरेंचा महाराष्ट्र पोलिसांवर विश्वास नाही काय?'

प्रमोद बोडके

सोलापूर : अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी तीनशे कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केला होता, हा आरोप त्यांनी एकदाच केला, त्यानंतर ते याबद्दल काहीच बोलले नाहीत. फडणवीस पळपुटे आहेत, असा टोला खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी लगावला. मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांना मतांसाठी, राजकारणासाठी मराठी लोक चालतात, मग सुरक्षेसाठी महाराष्ट्र पोलिसांवर त्यांचा विश्‍वास नाही का? दिल्ली पोलिसांवर त्यांचा एवढाच विश्‍वास असेल तर त्यांनी महाराष्ट्रातून चालते व्हावे आणि दिल्लीत जाऊन राजकारण करावे, असा थेट इशाराही त्यांनी दिला. (Supriya Sule criticizes Devendra Fadnavis and Raj Thackeray)

सोलापूरच्या दौऱ्यावर आल्यानंतर खासदार सुळे यांनी सोलापुरातील सुशील रसिक सभागृहात खासदार सुळे यांनी शहर व ग्रामीण राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी आमदार यशवंत माने, माजी आमदार राजन पाटील, माजी आमदार दीपक साळुंखे, जिल्हाध्यक्ष बळिराम साठे, कार्याध्यक्ष उमेश पाटील, शहराध्यक्ष भारत जाधव, प्रदेश सचिव संतोष पवार, माजी महापोर महेश कोठे, निरिक्षक सुरेश घुले, माजी शहराध्यक्ष महेश गादेकर, कल्याणराव काळे, भगिरथ भालके, महिलाच्या निरीक्षक दीपाली पांढरे, महिला जिल्हाध्यक्षा सुप्रिया गुंड, महिला शहराध्यक्षा सुनीता रोटे यांची प्रमुख उपस्थिती होती. (Supriya Sule Latest News Updates)

खासदार सुळे म्हणाल्या, राज ठाकरे यांना महाराष्ट्रात राजकारण करायचे असेल येथील मराठी जनतेवर व महाराष्ट्र पोलिसांवर विश्‍वास ठेवावाच लागेल. राजकारण मराठी माणसांच्या मतांवर करता आणि त्यांच्यावरच अविश्‍वास दाखविता, वाह रे पठ्ठ्या असे म्हणत खासदार सुळे यांनी जोरदार फटकेबाजी केली. भोंगा रहिला काय आणि राहिला नाही काय? याने महागाई, बेरोजगारी हे प्रश्‍न सुटणार आहेत का? ज्यांना भोंग्याचा त्रास होतो त्यांना जाऊन विचारा? सर्वसामान्यांना का त्रास देता असा सवालही त्यांनी व्यक्त केला.

सोलापूरचा पुढचा महापौर राष्ट्रवादीचा करणार असल्याचा शब्द तुम्ही द्या, विजयाचा गुलाल खेळायला मी सोलापूरला येईन, असा शब्दही राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिला. सोलापूर महापालिकेवर राष्ट्रवादीचा महापौर व जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादीचा अध्यक्ष करण्यासाठी आतापासूनच कामाला लागा अशा सूचनाही सुळे यांनी दिल्या. विकासाची कामे बघायची असतील तर आवर्जून इंदापूरला भेट द्या असे आवाहनही त्यांनी केले.

खासदार सुळे म्हणाल्या, देशात महागाई प्रचंड वाढत आहे. युवकांनी आंदोलन करण्याची आवश्‍यकता आहे. गरिबांना मोफत गॅस देतो म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेकांना गॅस सबसिडी सोडायला लावली. आमच्यासह सर्वांनी सबसिडी सोडली आता गरिब असो की श्रीमंत सर्वांनाच एकाच भावात गॅस मिळतो, मग आमची सबसिडी गेली कुठे? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT