KCR Sarkarnama
विश्लेषण

Telangana Election Result 2023 : केसीआर हॅटट्रिक करणार का ? काँग्रेसने 'असे' दिले आव्हान...

Sunil Balasaheb Dhumal

Telangana Assembly Results in Marathi : आंध्र प्रदेश राज्यात तेलंगणा भूमीकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत वेगळ्या राज्याची मागणी करण्यात आली. यात तत्कालीन तेलंगणा राष्ट्र समिती व सध्याचे भारत राष्ट्र समिती (बीआरएस)चे प्रमुख के. चंद्रशेखर राव (केसीआर) आघाडीवर होते. केसीआर यांनी आपले वचन पूर्ण करून पूर्वीच्या आंध्र प्रदेशातून वेगळे तेलंगणा राज्यनिर्मितीत मोठा वाटा घेतला. याचे फळ म्हणून २०१४ पासून दोन्ही टर्म तेलंगणाच्या जनतेने केसीआर यांना मुख्यमंत्री म्हणून निवडले गेले.

तेलंगणा निर्मितीनंतर राज्यात तिसरी निवडणूक होत आहे. या वेळी मात्र केसीआरविरोधात जनमत जात असल्याचे एक्झिट पोलमधून समोर आले आहे, तर काँग्रेस राज्यात ७० हून जास्त जागा मिळवून सत्ता स्थापन करेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. परिणामी यंदा केसीआर मुख्यमंत्री म्हणून हॅटट्रिक करणार का, याकडे देशाचे लक्ष लागले आहे, तर राज्याच्या निर्मितीत प्राण पणाला लावणाऱ्या केसीआर यांच्यापुढे काँग्रेसने कसे आव्हान दिले, याचीच चर्चाही सध्या सुरू आहे.

राज्यातील 119 जागांपैकी, काँग्रेसला बहुमतापेक्षा जास्त जागा मिळतील, तर बीआरएसची ८८ वरून ४४ जागांपर्यंत घसरण होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. भाजप-जनसेना युतीला सात आणि एआयएमआयएमला पाच जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. दरम्यान, 30 नोव्हेंबरच्या निवडणुकीत राज्याचे मतदान 71.34 टक्के होते. हे मतदान 2018 च्या तुलनेत दोन टक्क्यांनी कमी आहे.

सत्ताधारी बीआरएसने राज्यात अनेक कल्याणकारी योजना राबवल्या आहेत. त्या योजनांच्या जोरावर आपण तिसऱ्यावेळी सत्ता स्थापन करू, असा केसीआर यांना विश्वास आहे. बीआरएसच्या वतीने शेतकऱ्यांसाठी रायथू बंधू आणि रायथू विमा, वंचित वर्गासाठी दलित आणि बीसी बंधू आणि गरिबांना घरे देण्यासाठी गृह लक्ष्मी या आकर्षक योजनांचा समावेश आहे.

पक्षाच्या वतीने कायम राज्यात रोजगारनिर्मिती आणि जीडीपी वाढीबाबत कायम चर्चा करण्यात आली. मात्र, याबाबतच राज्यातील अनेक वर्गांनी तक्रार केली आहे. राज्यात रोजगारनिर्मितीवर बोट ठेवले गेले, काही योजनांच्या अंमलबजावणीत स्थानिक आमदारांचा अडथळा येत असल्याचे आरोप झाले.

काँग्रेसची रणनीती

राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी काँग्रेस आणि भाजप या पक्षांनी अनेक मोहिमा राबवल्या. केंद्रातील सत्ताधारी पक्षाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेकांनी रॅली आयोजित केल्या. मात्र भाजपने मात्र तेलंगणातही काँग्रेसलाच लक्ष्य केले. तसेच दिल्लीतील लिकर घोटाळ्यात सहभागाचा ठेपका असलेल्या केसीआर यांची मुलगी खासदार कविता यांना अटक करणे टाळल्याची चर्चा आहे. परिणामी भाजप आणि बीआरएस हे पक्ष राज्यात एकमेकांची बी-टीम असल्याचा आरोप काँग्रेसने केले.

तत्कालीन केंद्रातील यूपीए - २ सरकारच्या अंतर्गत तेलंगणाला राज्याचा दर्जा मिळण्यात मोठी भूमिका असल्याचा दावा काँग्रेसने केला. तसेच टीडीपीतील आक्रमक नेते आणि केसीआर यांचे कट्टर विरोधक रेवंत रेड्डी यांची प्रमुख म्हणून नियुक्ती केली. रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली, काँग्रेसने राज्यात आक्रमक मोहीम राबविल्याचे दिसून येत आहे. त्यांनी थेट कामरेड्डी मतदारसंघात केसीआर यांच्या विरोधातच निवडणूक लढविण्याची तयारी दर्शवली.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही राज्यात अनेक रॅलींना संबोधित केले. त्यांनी मुख्यमंत्री यांना "बाय-बाय, केसीआर" असे ठणकावून सांगितले होते. त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. तसेच काँग्रेसने मतदारांना सहा हमी दिल्या आहेत. कर्नाटकामध्ये सत्ता स्थापन केल्यानंतर काँग्रेसने वचनपूर्ती केली. याची मदत तेलंगणातही विजय मिळवण्यास होण्याचा अंदाज आहे. राज्यात पक्षाची सत्ता आल्यास महिलांसाठी दरमहा अडीच हजार, महिलांसाठी मोफत बस प्रवास, पाचशे रुपयांत गॅस सिलिंडर, दोनशे युनिट मोफत वीज, शेतकऱ्यांना 24 तास वीज आणि पात्र ज्येष्ठ नागरिकांसाठी चार हजार मासिक पेन्शन यांचा समावेश आहे.

भाजपचे गणित फसले

भाजपने तेलंगणातील ज्वलंत राज्य प्रमुख, बंदी संजय कुमार यांच्याकडून जबाबदारी काढून घेतली. कुमार यांची हकालपट्टी झाल्यानंतर आणि त्यांच्या जागी केंद्रीय मंत्री जी किशन रेड्डी यांची नियुक्ती केली. दरम्यान, पक्षाने बीआरएसच्या विरोधात आपली भूमिका मवाळ केल्याचे दिसून आले. 2018 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने फक्त एक जागा जिंकली होती. यानंतर कुमार यांनी पक्षाला 2020 मध्ये ग्रेटर हैदराबाद महानगरपालिकेत मोठे यश मिळवून दिले होते. तसेच दोन पोटनिवडणुकीत पक्षाच्या विजयातही त्यांचा मोठा वाटा होता. कुमार यांची तीव्र भाषणे आणि मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्यावरील थेट हल्ल्याने राज्यात पक्षाचा पाया मजबूत झाला होता. त्यांच्या हकालपट्टीचा भाजपला फटका बसणार असल्याचे सांगितले जात आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT